आपल्याच वहिनीवर अ‍ॅसिड फेकायला कोणी सांगितलं होतं?- नारायण राणे

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक आणि सुटका या घडामोडींनंतर जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. यावेळी नारायण राणे यांचा आक्रमक बाणा तसाच असल्याचा दिसला.

यावेळी त्यांनी राज्यातील सरकार आणि विशेष करून शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच काही जुन्या प्रकरणांना हात घालत गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी एका अ‍ॅसिड प्रकरणाचा दाखला देत खळबळ उडवून दिली. नाव न घेता नारायण राणे यांनी हा आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा या प्रकरणाची चर्चा रंगू लागली आहे.

‘आपल्या बंधूच्या पत्नीवर म्हणजे वहिनीवर अ‍ॅसिड फेकायला कुणी सांगितलं पोराला. काय संस्कार? आपल्याच भावाच्या पत्नीवर अ‍ॅसिड फेकलं. ही प्रकरणं मी टप्प्याटप्प्याने काढणार. सुशांतची केस संपली नाही आहे. दिशा सालियान प्रकरण अजूनही बाकी आहे. आम्ही भारतीय नागरिक आहोत. तुम्हाला जो कायदा तो आम्हालाही आहे. दादागिरी करू नका. तो तुमचा पिंड आहे. तुम्ही आम्हाला अनुभवलं आहे. आमच्या वाटेला जाऊ नका. आता पूर्वीसारखा दोन दिवसात आवाज खणखणीत झाल्यानंतर वाजवणार.’ असा देखील ते म्हणाले.

‘विधायक विकासाची काम आम्हाला करायची आहेत. आम्हाला घरात बसून कारभार नाही करायचा. धमक्या नारायण राणेंना नका देऊ. माझ्याकडे पुष्कळ मसाला आहे. मी ३९ वर्षे होतो सोबत. जवळून सर्व माहिती आहे. त्यामुळे आमच्या वाटेला येऊ नये.’, असा इशाराही त्यांनी दिला.

नारायण राणेंनी १९ ऑगस्टला मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली होती. या यात्रेचा समारोप सिंधुदुर्गमध्ये होणार आहे. रायगडमध्ये नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली लावण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याने शिवसेना-भाजपा आमने-सामने आले आणि राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते.

नारायण राणेंचा अटकपूर्वी जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक करून, महाडच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. या ठिकाणी सुनावणीवेळी त्यांच्या जामीनासाठी राणेंच्या वकीलाकडून जोरदार युक्तीवाद करण्याता आला. तर, पोलिसांकडून सात दिवसांसाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या या सुनावणीत नारायण राणेंना जामीन मंजूर करण्यात आला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.