यावल येथे १२० वर्षाची परंपरा श्री बालाजी महाराजांचा रथोत्सव व बारागाडया उत्साहात

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

हिन्दु मुस्लीम बांधवांच्या प्रमुख उपस्थितीत साजरे होणारे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेला व सुमारे एकशे विस वर्षांचा इतिहास लाभलेला येथील बालाजी महाराजांचा रथोत्सव यात्रा आज दिनांक ०६ एप्रिल २३ गुरूवार उत्साहाच्या वातावरणात सपंन्न झाले. यानिमित्ताने शहरात घरोघरी पाहुण्यांची मोठी वर्दळ असते. रथोत्सवानिमित्त येथील शहराला लागून असलेल्या हरीता नदीपात्रात यात्रेचे आयोजन केले जाते. यावेळी खंडेराव महाराजांच्या बारागाडयाही ओढण्याची जुनी प्रथा व परंपरा आहे .

सुमारे १९०५ मध्ये येथे शहरात हळपे यांनी रथोत्सवास सुरवात केल्याची आख्यायिका आहे. नंतरच्या काळात म्हणजे १९१४ मध्ये या बालाजी रथोत्सवाची जबाबदारी पांडूरंग धोडू देशमुख यांचेकडे आली. १९५७ मधे रथोत्सवाचे विश्वस्त मंडळ स्थापन करुन भाविकांकडून आलेल्या देणगीवर हा उत्सव आज अखेरपर्यंत साजरा केला जात आहे, १९१४पासून ते आज अखेर पर्यंत पांडूरंग देशमुख यांचे घराण्यातच या उत्सवाचे प्रमुखत्व आहे. सद्या माजी नगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आहेत.

सुमारे ११७ वर्षापुर्वी १९०५ मध्ये रामजी मिस्त्री यांच्या हस्ते तयार करण्यात आलेल्या नक्षीदार कोरीव कामाचे रथा चे१९७७ मध्ये रामजी मिस्त्रीच्या मुलांमार्फत पुनर्नुतनिकरण करण्यात आले. संपूर्ण सागवानी लाकडाचा कोरीव नक्षीदार काम असलेला रथ उत्कृष्ट कामगिरीीचा अप्रतिम नमुना आहे. या रथाची उंची २२ फूट असून रथाचे १८ टन वजन आहे. त्याची चारही चाके बाभळ्च्या लाकडाची आहेत. रथावर बालाजी महाराजांची मूर्ती असते. याशिवाय दोन अश्व, त्यांना हाकणारा सारथी, दोन्ही बाजूला दोन देवतांच्या मूर्त्या आहेत. रथाचे उंच मनोऱ्यावर हनुमान मूर्ति आरूढ आहे.

महर्षी व्यास मंदिराजवळ आज ६ एप्रील रोजी सायंकाळच्या सुमारास विश्वस्त समितीचे अध्यक्ष नगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख यांच्या उपस्थितीत मंदार चंद्रकांत देशमुख यांच्या हस्ते सपत्नीक रथाची पारंपारीक पद्धतीने विधिवत पूजा करण्यात आली यावेळी प्रा .मुकेश येवले , विजय सराफ , बापु जासुद यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते त्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत सायंकाळी हरीता नदीपात्रात खंडेरायाच्या बारागाडया ओढून झाल्यावर बालाजी महाराजांचा रथ शहरातील मुख्य रस्त्यावर मार्गक्रमण करीत पहाटच्या सुमारास रथयात्रा भाविकांच्या दर्शनासाठी सुरूच राहील.

भाविकांच्या मदतीने शहरात ओढला जाणारा रथ मुख्य रस्त्यावर येतांना त्याच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचे काम रथाच्या चाकांना मोगरी लावणारा करतो. ही मोगरी लावण्याची परंपरा रामजी मिस्त्री यांच्या वंशजा नंतर गंगाधर दांडेकर, बाबूराव सोनार, हरी मिस्त्री, अशोक लोहार यांचे सह सुतार लोहार घराण्यातील परंपरा आहे. सध्या दिलीप मिस्त्री, अशोक मिस्त्री, किशोर दांडेकर हे समर्थपणे सांभाळत आहेत.
बालाजी महाराजांचा रथ शहराच्या मुख्य रस्त्यावर आला असल्याची सूचना दर्शनार्थी भाविकांना देणारे विशेष पारंपारीक वेशात असलेले भालदार व चोपदार गल्लीबोळात फिरुन भाविकांना बालाजी दर्शनासाठी आले आहेत. आरती घेऊन चला, अशी हाक देत ते फिरत असतात. ही जबाबदारी शिवाजी चौधरी, राजू देशमुख, सुरेश वराडे पार पाडत आहेत.पूर्वी ही जबाबदारी  ज्योतीबा कदम पार पाडीत.
रथावर आरूढ बालाजी महाराजांना आरती दाखविणे, भाविकांच्या आरीतीच्या ताटात प्रसाद देणे आदी पौराहित्य काशीनाथ बयाणी यांचे नंतर १९४०ते १९७३दरम्यान वासुदेव बाबा बयाणी , राजाभाऊ नागराज यांनी केले.

रथ नदीवर धुवायला नेणे, त्याची रंगरंगोटी, तेलपाणी, फुलांच्या माळांनी, विद्दूत रोषणाईने सजविण्याचे काम सुरवातीपासून बरडीवरील रहिवासी लोकांकडे आहे. यात भागवत पवार, गोविंदा खैरे, माधव वराडे, भागवत ढाके हे प्रमुख आहेत.

सायंकाळी मार्गक्रमण करणारा रथ रात्रभर शहराच्या मुख्य रस्त्यावरून फिरुन पहाटे रेणूका देवीचे मंदिराजवळ आपल्या नियोजित स्थळी परततो. परिसरातील शेकडो नागरीकांच्या उपस्थित साजरे होणाऱ्या श्री बालाजी रथोत्सवाच्या मिरवणुकीसाठी विभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक प्रदीप बोरूडे , पोलीस उप निरिक्षक सुदाम काकडे , पोलीस उप निरिक्षक सुनिल मोरे , पोलीय उप निरिक्षक सुनिता कोळपकर , राखील पोलीस दलाचे पोलीस उपनिरिक्षक प्रविण उमाळकर यांच्यासह पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला .

 

Leave A Reply

Your email address will not be published.