मोठी बातमी.. शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाची धाड

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

शिवसेनेचा (ShivSena) आणखी एक नेता केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आहे. मुंबईच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरी तपास यंत्रणेकडून चौकशी सुरू आहे.

येत्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीपूर्वी होत असलेल्या या कारवाईमुळे चर्चांना उधाण आले आहे. आयकर विभागाकडून (Yashwant Jadhav Income Tax Raid) ही चौकशी सुरू असल्याची आता माहिती समोर आली आहे. मुंबई मनपात भ्रष्टाचार झाल्याचे अनेक आरोप गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत आहेत. मुंबई मनपात शिवसेना सत्तेवर आहे आणि यशवंत जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत त्यामुळे भाजपच्या आरोपांनुसारच तपास यंत्रणांकडून ही चौकशी सुरू आहे की अन्य प्रकरणात चौकशी सुरू आहे याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये.

यशवंत जाधव यांच्या घरी तपास यंत्रणांकडून चौकशी यशवंत जाधव हे शिवसेनेचे नेते आहेत. यशवंत जाधव हे गेली काही वर्षे मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. मुंबई महानगरपालिकेचे कंत्राट आणि अन्य व्यवहारांत स्थायी समितीची भूमिका विशेष महत्त्वाची असते आणि त्याच स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आहेत. यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या भायखळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या आमदार आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर कोविड घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.

यशवंत जाधव यांच्यावर कोणते आरोप?

यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी कोलकाता येथील शेल कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार केल्याचं आयकर विभागाच्या यापूर्वीच्या तपासात समोर आलं असल्याची माहिती आहे. यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शेल कंपन्यांबरोबरच्या व्यवहारातून पैसे कमवल्याचा आरोप आहे. यामिनी जाधव यांनी प्रधान डीलर्स नावाच्या कंपनीकडून 1 कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याचा निवडणूक प्रतिज्ञापत्रात उल्लेख, तपासात ही शेल कंपनी असल्याचं उघड झालं.

यामिनी जाधव यांनी कर्ज घेतल्याचं दाखवलेलं आहे पण हा पैसा कर्जाचा नाही तर त्यांचाच असल्याचं आयकर विभागाचं म्हणणं आहे. आयकर विभाग एका हवाला एजंटचा तपास करत असताना त्याच्या मार्फत 15 कोटी रूपये काही रोख रक्कम आणि चेक स्वरूपात जाधव कुटूंबियांकडे आल्याचे दिसून आले. या उत्पन्नाची माहिती ही जाधव कुटूंबियांनी लपवली आणि त्यावर कर चुकवला नाही असा आयकर विभागाला संशय आहे. शिवसेनेचे हे नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आमदार प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री अनिल परब, खासदार भावना गवळी, आनंदराव अडसूळ हे आहेत.

तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने दोन दिवसांपूर्वी अटक केली. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र येत काल (25 फेब्रुवारी 2022) मुंबईत मंत्रालय परिसरात महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. या आंदोलनात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे नेते एकत्र दिसून आले. त्यानंतर आता दुसऱ्याच दिवशी शिवसेनेचे नेते आणि मुंबई मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू झाली आहे. यामुळे शिवसेनेला एक मोठा झटका बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.