दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीच्या सजावटीवर कारवाई

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीवर सुशोभीकरण केल्याने नवा वाद उफाळला आहे. १९९३ बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेननला ७ वर्षापूर्वी मुंबईच्या बडा कब्रिस्तान इथं दफन करण्यात आले होते. याच याकूबची कबर मार्बल आणि लायटिंगनं सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यावरून भाजपानं मागील महाविकास आघाडी सरकारला दोषी धरत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

हे देशद्रोही कृत्य- बावनकुळे

याकूबची कबर सुशोभिकरणासाठी ज्यांनी मदत केली त्यांचे नावे समोर आणा. हे देशद्रोही कृत्य असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. तत्कालीन सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होते. कट्टर हिंदुत्ववादी स्वत:ला म्हणवणारे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी तडजोड का केली? याचं स्पष्टीकरण जनतेला दिले पाहिजे. या प्रकारासाठी सरकारमध्ये कोण कोण समाविष्ट होते ते समोर आले पाहिजे असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

प्रकरणाची चौकशी करणार

याकूब मेननच्या कबर सुशोभिकरणावरुन राज्यात नवा वाद होण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलीस उपायुक्त याकूब मेमन प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. एल. टी. मार्ग पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक तपास अधिकारी असतील. तसेच वक्फ बोर्ड, महानगरपालिका, चॅरिटी कमिश्नर यांच्याकडूनही सदर प्रकरणाची माहिती घेतली जात आहे.

कबरीवरच्या एलईडी लाईट्स हटवल्या

याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करून त्यावर रोषणाई करण्यात आल्याची बातमी झळकल्याने पोलिसांनी याकूबच्या कबरीवरच्या एलईडी लाईट्स हटवल्या आहेत. १८ मार्च २०२२ रोजी कबरीवर लाईट्स लावल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. शब ए बारातच्या दिवशी लाईट्स लावण्यात आल्याची माहिती आहे. या दिवशी लोक पूर्वजांच्या कबरीवर प्रार्थनेसाठी जातात. त्यावेळी कबरीवर लाईट्स लावण्यात आले अशी माहिती तपासात समोर आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.