आजच्या जागतिक वाढत्या लोकसंख्येत भारत

0

लोकशाही विशेष लेख

जागतिक लोकसंख्या हा दिवस ११ जुलै १९८७ रोजी जगातील पाच अब्जावे बाळ युगोसाल्विया या देशात जन्माला आले. यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येविषयी जगात जन-जागृती होणे गरजेचे होते. म्हणून युनो ने हे लक्षात घेऊन १९८९ या वर्षापासून हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून घोषित केला. आज जगाची लोकसंख्या जवळपास ८ अब्ज इतकी आहे. या वाढत्या लोकसंख्येनुसार विकासाबाबत आपण तुलना केली, तर जगातील काही देश हे विकसित तर काही देश हे विकसनशील तसेच अल्प विकसित किंवा अविकसित असे संबोधले जातात. त्यामध्ये जगात सर्वात जास्त लोकसंख्या ही विकसनशील आणि अल्प-विकसित देशांमध्ये आपल्याला आढळते. आज जगातील बहुतांश देशांमध्ये बेरोजगारी, दारिद्र्य, उपासमार अशा मूलभूत समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या जागतिक लोकसंख्येत आपण भारताचा विचार केला तर सर्वाधिक वाटा हा भारतीय लोकसंख्येचा आपल्याला दिसतो. यामध्ये आपण भारताचा वाटा बघितला तर सुमारे १ अब्ज ३४ कोटी इतकी भारताची लोकसंख्या आहे.

भारताचा आज जागतिक लोकसंख्येत सर्वात जास्त वाटा नक्कीच आपल्याला बघायला मिळतो. मात्र आज आपण लोकसंख्या वाढीबाबत विचार करणे गरजेचे आहे. कारण भारतात हा लोकसंख्येचा विस्फोट भारतीय अर्थव्यवस्थेला घातक न ठरणार पाहिजे. भारतात उदयास येणारी श्रमशक्ती आणि रोजगार निर्मिती करणारे औद्योगीकरण यांचा मेळ बसणे आज तरी कठीण आहे. आज आपण भारतात बेरोजगारीचा दर विचारात घेतला तर तो ८.११% इतका आहे, तसेच जागतिक उपासमार निर्देशांकाच्या यादीत भारताचा क्रमांक हा २०२० मध्ये ९४ आणि २०२३ मध्ये १०७ इतका आहे. म्हणजेच साधारणतः १३ क्रमवारीने आपण वर फेकले गेलो. तसेच आपण जागतिक मानव विकास निर्देशांकाच्या यादी १९१ देशांच्या यादीत आपण १३२ व्या स्थानी आहोत.

सर्वांगीण जर आपण विचार केला तर कुठेतरी आपण विकास तर करीत आहोत मात्र लोकसंख्या वाढीनुसार या विकासाला खिळ बसताना दिसत आहे. म्हणून आज वाढत्या लोकसंख्येचा विचार करून योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे या सर्व समस्यांवर आपण उपाय म्हणून स्वातंत्र्यप्राप्तीपासून जवळपास या ७५ वर्षांमध्ये विकासासाठी वेगवेगळी ध्येय-धोरणे तसेच लोकसंख्या नियंत्रणासाठी वेगवेगळे लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम, योजना आपण राबविल्या.
मात्र आज सुद्धा आपली कृषी प्रधान अर्थव्यवस्था सर्वात जास्त लोकांचे पोट भरण्याचे काम करीत आहे. जवळपास जगातील विकसित देशांचा इतिहास बघितला तर यांनी आधी कृषी क्षेत्राच्या विकासावर लक्ष केंद्रित केले नंतर हळूहळू औद्योगीकरणाच्या विकासावर भर दिला. मात्र आपल्या देशात आज सुद्धा कृषी क्षेत्राला वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

कृषी क्षेत्रावर असलेला अतिरिक्त रोजगार वाढवा कमी करायचा असेल तर वाढणाऱ्या लोकांना रोजगार संधी उपलब्ध होणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात विकासाच्या अनेक अडथळ्यांना आपल्याला सामोरे जावे लागेल कारण २०११ च्या लोकसंख्येनुसार सरासरी वार्षिक लोकसंख्या वृद्धी दर हा १.६४ % इतका आहे. मात्र बेरोजगारी दर, उपासमार, दारिद्र्य यांची लोकसंख्येची तुलना केली. तर आज आपण लोकसंख्या वाढीनुसार दिवसेंदिवस यामध्ये भर टाकत आहोत. म्हणून वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी आज योग्य त्या सुधारणा करणे गरजेचे आहे. लोकसंख्या शास्त्रीय संक्रमण सिद्धांतानुसार भारतात लोकसंख्या वाढीची ही तिसऱ्या अवस्थेची स्थिती आहे असे वाटते. म्हणजेच जन्मदर आणि मृत्युदर हे दोन्ही कमी होत आहे. त्यासोबत लोकसंख्या वृद्धीदर सुद्धा कमी होत आहे. मात्र याचा चांगला परिणाम अर्थव्यवस्थेवर करून घ्यायचा असेल तर आज देशातील वाढणाऱ्या लोकसंख्येला नियंत्रित करणे गरजेचे आहे. मात्र आज आपण वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार केला तर रोजगार पुरविणारे इतर पर्याय सक्षमतेने आज आपल्या देशात तरी दिसत नाही.

लोकसंख्या नियंत्रण करणे गरजेचे आहे जेणेकरून विकासात्मक कार्यक्रम राबवित असताना सरकारला जास्तीत जास्त विकासात्मक खर्चाची तरतूद करणे सोपे होईल मात्र हे तेव्हा शक्य आहे जेव्हा देशात बहुतांश बेरोजगारीचा दर कमी देशातील लोकांचे दरडोई उत्पन्न उच्च पातळीला असेल अशा स्थितीमध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने विकासाचा मार्ग मोकळा करता येईल. म्हणून वाढणारी लोकसंख्या आणि अर्थव्यवस्थेत भविष्यात येऊ घातलेले बदल यांच्यात सकारात्मक परिणाम होणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात अर्थव्यवस्थेला विपरीत परिणामांचा सामना करावा लागेल.

निलेश रविंद्र कोळी
संशोधक विद्यार्थी
कवयित्री बहिणाबाई चौधरी,
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव.
८००७७६०६८१

Leave A Reply

Your email address will not be published.