घडावी संगती पुस्तकांची….!

0

लोकशाही विशेष लेख 

२३ एप्रिल हा दिवस दरवर्षी जगभरातील साहित्य संबंधित संस्थांकडून जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक पुस्तक दिनासोबतच याच दिवशी कॉपीराईट दिवस देखील साजरा केला जातो. ‘युनेस्को’ कडून हा दिवस विल्यम शेक्सपिअर, मिगुएल सर्व्हंटेस आणि इंका गार्सिलासो डे ला यांसारख्या सुप्रसिद्ध लेखकांना आदरांजली देण्यासाठी  साजरा करण्यात येतो. १९९५ साली युनेस्कोच्या पॅरिसमधील सर्वसामान्य साली जगभरातील लेखक आणि पुस्तकांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी ‘जागतिक पुस्तक दिन’ साजरा करण्यास सुरूवात झाली, तर भारत सरकारने देखील २००१ साली २३ एप्रिल या दिवशी जागतिक पुस्तक दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.

या दिनाचे अवचीत्त्य साधून हा लेख आपणा समोर सादर करीत आहे. ग्रंथालयशास्त्र या विषयाचा विद्यार्थी, संशोधक आणि व्यवसायिक असल्यामुळे पुस्तकांबद्दल असलेला जिव्हाळा काहीसा अधिक आहे. ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विषयाच्या अभ्यासात आम्ही पुस्तक निर्मितीचा प्रवास जवळून अभ्यासलेला असल्याने चित्रलिपी पासून ते आजच्या ऑडिओ बुक पर्यंतची वाटचाल देखील अगदी बारकाईने अभ्यासलेली आहे. इंटरनेटच्या मदतीने एका क्लिकवर सहज उपलब्ध होणारे आधुनिक युगातील पुस्तकाचे स्वरूप आजच्या वाचकांना जरी अगदी सहज आणि सोपे वाटत असले तरी पुस्तकाच्या या आधुनिक स्वरूपाला अस्तित्वात येण्यासाठी खूप मोठा प्रवास करावा लागला आहे. खरं तर पुस्तक निर्मिती आणि त्याचे आधुनिक स्वरूप यांच्या विकासात अनेक घटक सुद्धा कारणीभूत असून यांत प्रामुख्याने लिपीचा शोध, शाईचा शोध, कागदाचा शोध, छपाई तंत्राचा (मुद्रण कलेचा) शोध, इंटरनेटचा वापर इत्यादींचा समावेश होतो.

पुस्तक निर्मितीचा प्रवास हा असामान्य आणि जटील आहे. पुस्तकांनी संपूर्ण जगाला ज्ञानाचा अविरत वारसा उपलब्ध करून दिला आहे. संपूर्ण जगाच्या संस्कृतीला आणि इतिहासाला जोपासण्याचे अद्वितीय कार्य पुस्तकांनी केले आहे. मात्र त्याच पुस्तकांचा इतिहास आजच्या नवीन पिढीला हवा तसा ज्ञात नाही असे जाणवते. ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विषयाच्या अभ्यासकांना देखील या संपूर्ण इतिहासाला अभ्यासणे फार गरजेचे आहे. ग्रंथांचा महिमा अपार असून पुस्तकांचे महत्व हे आपल्या सर्वांच्या जीवनात अगदी लहानपणापासूनच सुरु होते. ज्याप्रमाणे ग्रंथांनी आपला इतिहास, आपली संस्कृती आणि ज्ञानाचा वारसा जोपासला आहे त्याचप्रमाणे आपणही पुस्तकांचा इतिहास आणि प्रवास जपून ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य मानले पाहिजे.

पुस्तक हे केवळ वाचून ज्ञान मिळविण्याचे साधन नसून पुस्तकांचा योग्य वापर केल्यास पुस्तके आपले खरे मित्र ठरू शकतात. चला तर मग आपण जाणुन घेवूया पुस्तकांचा मानवी जीवनातील प्रवास. अगदी लहानपणापासून विचार केला तर रंगांची, चित्रांची, शब्दांची ओळख करून देण्यासाठी पुस्तके आपणांस मदत करतात. शब्दांचे आकार, उच्चार आणि अर्थ समजण्यास देखील ते उपयोगी पडतात. हळू हळू जसे आपण  वाढत जातो पुस्तके ही त्यांची भूमिका बदलत जातात आता रंग, चित्र आणि शब्द समजविणारे पुस्तके हे अधिक वाचनासाठी भर देऊ लागतात. वाचन ही असे की ज्यातून आम्हाला विविध गोष्टींचा बोध होतो., ज्यातुन आम्हाला आमची संस्कृती समजते, ज्यातून मनुष्य, प्राणी आणि निसर्ग इत्यादींचा बोध होतो, ज्यातून आम्हाला गोळा बेरीज समजते, ज्ञान विज्ञान समजते आणि ज्यातून आम्ही आता सज्ञान होतो. पुन्हा एकदा आपल्या सोबत पुस्तके ही मोठी होऊ लागतात आकाराने आणि ज्ञानाने सुध्दा.

अभ्यासासोबतच पुस्तके आता आपल्याला विषयाचे सखोल ज्ञान देऊ लागतात जीवन जगण्याचे विविध कौशल्ये शिकवितात. राष्ट्रासोबतच  जगाचा देखील परिचय करून देतात जेणेकरून आपण सामाजिक जीवनात आपले स्थान निर्माण करण्यास सक्षम होऊ शकतो. शैक्षणिक जीवनाचा टप्पा ओलांडता ओलांडता पुस्तके आता आपल्याला मूर्त रूप देऊ लागतात आता आपण पुस्तकातून मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष वापर करून आपले अस्तित्व निर्माण करण्यास नवी वाटचाल करणार आहोत आपले औपचारिक शिक्षण जरी संपले असले तरी पुस्तकांचा आपल्या जीवनातील प्रवास निरंतर सुरु राहतो मात्र यावेळी त्यांची भूमिका पुन्हा बदललेली जाणवते आता पुस्तके प्रेरणा आणि आत्मविश्वास निर्माण करण्यास मदत करतात मिळालेली जवाबदारी आणि त्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यात देखील पुस्तके खऱ्या मित्राच्या भूमिकेत दिसू लागतात इतकेच नव्हे तर नैराश्य, अपयश, नकारात्मकता, व्देष, घृणा इ. मानवाच्या अवगुणांना संपवण्यासाठी देखील पुस्तके निदानात्मक कार्ये करतात. पुस्तकांच्या मदतीने मानवाच्या नकारात्मक दृष्टीकोनाला बदलता येणे शक्य असून ही बाब फक्त तात्विक नसून ग्रंथोपचार सारख्या शास्त्रशुद्ध पद्धतीने सिद्ध करण्यात येत आहे. अनेक मानसोपचार तज्ञ काही प्राथमिक निदानासाठी ग्रंथोपचार पद्धती सुचवितात. म्हणजेच काय आपल्या आयुष्यातील कठीण काळात देखील पुस्तके आपल्याला साथ देतात मग “जो दुःखात साथ देईल तोच खरा मित्र” ही म्हण पुस्तकांना सार्थकी ठरते. मानवी जीवानातच नाही तर मानवाचे जीवन सुरु होण्यापूर्वीच पुस्तकांचे महत्व लक्षात आले असून पुस्तकांचा वापर करून “गर्भसंस्कार” सारखे सोपस्कार येणाऱ्या नवजात बाळावर केले जाते.

मनुष्य यशस्वी असेल तर त्यांच्यावर पुस्तके लिहिली जातात आणि यशप्राप्त करू इच्छित असेल तर इतरांवर लिहिलेली पुस्तके मनुष्याला प्रेरणा देतात. जीवनाच्या विविध टप्प्यात पुस्तके नेहमीच सोबतीला असतात अगदी निवृत्तीच्या काळात देखील पुस्तके आध्यात्मिक, धार्मिक आणि तत्वज्ञान अशा विषयांवर आधारित पुस्तके उर्वरित आयुष्य सकारात्मकतेने घडविण्यास सहारा देतात. पुस्तके कधीही आपणांस एकटे पडू देत नाही याउलट पुस्तकांचा योग्य उपयोग केल्यास पुस्तके आपणांस विश्वनिर्माण करण्याची ताकद देतात. याची  अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येईल. भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी संपूर्ण जगात आपली किर्ती प्रस्थापित केली असून त्यांच्या यशाचे श्रेय हे नेहमीच त्यांनी पुस्तकांना दिले आहे त्याचप्रमाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तकांवर असलेले प्रेम आणि जिव्हाळा देखील संपूर्ण विश्वाला सर्वश्रुत असून आजही त्यांच्या ग्रंथ संपदेतून आपणास ही बाब प्रकर्षाने जाणविते. मुंबईमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान “राजगृह” पुस्तकांसाठी असून या पवित्र ऐतिहासिक वास्तूचा समावेश ‘वारसा वास्तूमध्ये’ (हेरीटेज) झाला आहे. दररोज अनेक लोक ‘राजगृहाला’ भेटी देतात. पुस्तकांच्या सानिध्यातून घडलेले असे अनेक व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी पुस्तकांनाच आपला मित्र, आदर्श आणि प्रेरणा मानले आहे. पुस्तके म्हणजे ज्ञानाचा अविरत वाहत जाणारा असा झरा आहे, जो नेहमीच ज्ञानाची तृष्णा भागवितो.

आपण देवाची भक्ती करतो त्याच भावनेने पुस्तके देखील वाचावी ज्याप्रमाणे घरात देव असून सुध्दा देवालयात (मंदिरात) जाऊन भक्ती करावी असे वाटते त्याचप्रमाणे ग्रंथालयात जाऊन वाचन करावे जेणेकरून त्या वास्तूच्या पवित्र वातावरणाने वाचनाचा प्रभाव आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर पडू लागतो. म्हणूनच या ठिकाणी पुन्हा सांगावे असे वाटते ‘घडावी संगती पुस्तकांची’ पुस्तके ही सर्वांसाठी असून जीवनाचे उद्देश सार्थ करण्यासाठी खूप महत्वाची ठरतात. आधुनिक युगात देखील पुस्तकांचा गोडवा आपण सर्वांनी जपावा आणि आपल्या जीवनाला नेहमीच योग्य दिशा दाखवावी हीच आजच्या दिनाची आपल्या सर्वांकडून अपेक्षा.

जागतिक पुस्तक दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!                                                                             

– प्रा. हितेश गोपाल ब्रिजवासी, ग्रंथपाल,

विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत के.ए.के.पी वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जळगाव

मो.क्र. ९६०४००९९९७

[email protected]

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.