येत्या काही दिवसात तापमानात होणार वाढ

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात तापमानात चढ-उतार कायम असून, उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात पुन्हा थंडीत वाढ झाली आहे. राज्यात निचांकी तापमान जळगाव येथे ८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.मात्र, गुरुवारपासून यात वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. पुणे शहरातही बुधवारी किमान तापमान ८.४ अंश सेल्सिअस इतके होते.

गेल्या तीन दिवसांपासून उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातील उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात मोठी घट झाली होती. किमान सरासरी तापमानाच्या तुलनेत जळगाव येथे ४ ते ४.५ अंश सेल्सिअसने तापमान घसरले होते. परिणामी, बुधवारी जळगाव येथे किमान तापमान ८ अंशांपर्यंत आले. त्याचा प्रभाव पुण्यातही दिसून आला. गेले दोन दिवस पुण्यात किमान तापमान एकअंकी नोंदविले गेले. याबाबत हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ.अनुपम काश्यपी म्हणाले, ‘उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे ही वाढ झाली होती. जळगाव येथे ही थंडीच्या लाटेसारखी परिस्थिती होती. मात्र, गुरुवारपासून बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या पूर्वेकडील वाऱ्यांमुळे राज्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे सायंकाळी काहीसे ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी, किमान तापमानात हळूहळू वाढ होण्यास सुरुवात होईल. ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहील.’

Leave A Reply

Your email address will not be published.