वाघोड प्राथमिक आरोग्य केंद्राकडे शासनाचे सपशेल दुर्लक्ष…..!

0

मोरगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

मोरगाव ता. रावेर येथून जवळच असलेल्या वाघोड या गावी परिसरातील गरीब व गरजू रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी व गरजू रुग्णांना तात्काळ मदत मिळावी या हेतूने वाघोड हे गाव सेंटर मानून या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहे. या ठिकाणी निवासी वैद्यकीय अधिकारी 24 तास कार्यरत असावा अशी तरतूद सुद्धा आहे. परंतु या ठिकाणी निवासी वैद्यकीय अधिकारीच काय इतर कर्मचाऱ्यांची सुद्धा वनवा दिसून येत आहे. या ठिकाणी 12 कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून सध्या वैद्यकीय अधिकारी धरून 11 कर्मचारी कार्यरत आहेत. रिक्त पदांमध्ये आरोग्य सेविका 8 आरोग्य सहायिका 1 आरोग्य सेवक 2 शिपाई 1 अशी एकूण 12 पदे रिक्त आहेत सहाजिकच या सर्व रिक्त कर्मचाऱ्यांच्या कामाचा लोड इतर कार्यरत कर्मचाऱ्यांवर आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे हजर असलेल्या कर्मचाऱ्यांची खूप मोठी तारांबळ उडत असते.

एकूण लोकसंख्या पाहता वाघोड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रांतर्गत 24 गावे व सुमारे 50 हजार लोकसंख्या असून, या सर्व गावांना व संपूर्ण नागरिकांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी अपूर्ण कर्मचाऱ्यांमुळे प्राथमिक आरोग्य केंद्राची मोठी तारांबळ उडत असते. तालुक्यातील सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून वाघोड प्राथमिक आरोग्य केंद्राची तालुक्यामध्ये ओळख आहे. असे जरी असले तरी, या ठिकाणी संपूर्ण आरोग्य केंद्राला एकच आरोग्य सेविका आहे. त्यांच्याकडे सुद्धा पाडले बुद्रुक येथील आरोग्यसेविकेचा चार्ज आहे. परंतु आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सेविका उपलब्ध नसल्यामुळे एस. एन. तडवी यांनाच आरोग्य केंद्राचे अतिरिक्त काम करावे लागत आहे. नियुक्तीच्या ठिकाणी त्यांना जाणे शक्यच होत नाही. त्यामुळे तेथील लोकांचा सुद्धा यांच्यावरच रोष असतो. सध्या शासनाने सर्व प्राथमिक ग्रामीण व सरकारी रुग्णालयांमध्ये कुठलीही फी न घेता मोफत उपचार सुरू केल्यामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. परंतु त्या प्रमाणामध्ये शासनाकडून रिक्त असलेल्या जागांची कर्मचारी भरती करण्यात आलेली नाही. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. शासनाचा शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा पुरविण्याचा जरी संकल्प असला तरी त्या प्रमाणामध्ये मनुष्यबळ असणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने त्वरित उपाययोजना करावी व गरजू व गरीब रुग्णांना शासनाच्या आरोग्य सेवेचा लाभ वेळेवर मिळावा अशी रास्त अपेक्षा जनतेमधून निघत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.