जिल्ह्यातील प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; मतदारांनी आपले नाव तपासून सहकार्य करावे – जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

जळगांव जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांच्या मतदान केंद्राची यादी व प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून मतदारांनी या याद्यांचे अवलोकन करून हरकती असल्यास 9 डिसेंबर 2023 पर्यंत त्या नोंदवाव्यात, असे आवाहन जळगांव जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

मतदान केंद्र आणि प्रारुप मतदार यादीबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेस उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार जितेन्द्र कुंवर, श्री विनोद  पाटील, जिल्हा माहिती अधिकारी जळगांव तसेच विविध दैनिक वृत्तपत्रांचे तसेच Live  Media प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

मतदार यादीबाबत माहिती देताना श्री.आयुष प्रसाद म्हणाले की, दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत भारत निवडणूक आयोगाने जळगांव जिल्ह्यातीत 11 विधानसभा मतदारसंघातील एकूण 3564 मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. या मतदान केंद्रांची यादी तसेच प्रारुप मतदार यादी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्या www.ceo.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर तसेच जळगांव जिल्हयांच्या http://jalgaon.nic.in/ संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जळगांव जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदार संघ कार्यालयातील सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदारांनी या मतदार यादीचे अवलोकन करून दावे व हरकती असल्यास विहीत अर्ज नमुना क्रमांक सहा, सात व आठ भरून दि. 9 डिसेंबर 2023 पर्यंत संबंधित विधानसभा मतदार संघामध्ये नोंदवाव्यात.

या प्रारुप मतदार यादीतील एकूण मतदारांची संख्या 34 लाख 81 हजार 677 एवढी आहे. प्रारुप मतदार यादीतील पुरुष मतदारसंख्या 18 लाख 05 हजार 531 तर स्त्री मतदार संख्या 16 लाख 68 हजार 004 इतकी आहे. ऑक्टोबर 2023 मधील यादीमध्ये एक हजार पुरूषांच्या मागे 846 स्त्रिया असून तृतीयपंथी समुदायाची ऑक्टोबर 2023 मधील संख्या 127 इतकी असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बूथ लेवल ऑफिसर (बीएलओ) यांनी घरोघरी जाऊन मतदार यादी अद्ययावत केली आहे. याद्वारे सुमारे 98 टक्के काम पूर्ण झाले असल्याचे श्री.आयुष प्रसाद यांनी सांगितले.

लोकसंख्येच्या प्रमाणात 18 ते 19 वर्षे वयोगटाच्या तरुणांचे प्रमाण सुमारे तीन टक्के आहे. तथापि, मतदार यादीतील त्यांचे प्रमाणे अर्धा टक्के आहे. यासाठी जळगांव जिल्ह्यामध्ये युवा मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ‘उत्कृष्ट मतदार मित्र महाविद्यालय पुरस्कारा’चे आयोजनही करण्यात आले आहे. शंभर टक्के मतदार नोंदणी केलेल्या आणि मतदार जागृतीचे उपक्रम राबविणा-या महाविद्यालयांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. महिला मतदारांचे प्रमाण वाढणे देखील आवश्यक असून यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांना आवाहन करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद यांनी सांगितले.

सर्व पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत यावीत यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. तथापि, मतदारांनी प्रारुप यादी तपासून त्यात नाव असल्याची खात्री करून सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.