आयुक्तांवरील अविश्वास प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या महासभेत मागे घेणार

0

गिरीश महाजन ,गुलाबराव पाटील, आयुक्त आणि  नगरसेवकांमध्ये सकारात्मक चर्चा; 

जळगाव;- येथील महापालिका आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांच्यावर अविश्वास प्रस्ताव मांडण्यात येणार होता .मात्र ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील मनपा आयुक्त विद्या गायकवाड आणि नगरसेवक यांच्यामध्ये आज अजिंठा विश्रामगृहात चर्चा होऊन समझोता झाला त्यानुसार मंगळवारी महापौर यांनी आयोजित केलेल्या महासभेत आयुक्तांवरील अविश्वास प्रस्ताव मागे घेणार आहे.

महापालिकेच्या आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्याविरोधातभाजप, सत्ताधारी शिवसेना (ठाकरे गट),एमआयएम, शिवसेनाशिंदे गटाच्या ५६ नगरसेवकांनी अविश्‍वास प्रस्ताव सादर केला होता. महापौरांनी त्या प्रस्तावानुसार १ ऑगस्ट रोजी महासभेचे आयोजन केले होते.

मात्र,भाजप नेते मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापालिका आयुक्त विद्या गायकवाड व भाजपच्या नगरसेवकांच्या बैठकीतील चर्चेनंतर समझोता होऊन आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्यावर आणण्यात आलेला अविश्‍वास प्रस्ताव उद्या सभेत मागे घेण्यात येणार आहे.

आयुक्त डॉ.विद्या गायकवाड या जळगाव महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून रूजू झाल्या होत्या. त्यानंतर त्यांची महापालिकेतच आयुक्तपदावर नियुक्ती शासनाकडून करण्यात आली होती. मात्र, काही महिन्यातच त्यांची बदली होऊन नवीन आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली होती.

त्या बदलीविरोधात त्यांनी मॅटमध्ये अर्ज दाखल केला होता. मॅटमध्ये त्यांच्या बाजूने निर्णय लागल्याने त्यांची आयुक्तपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या पुन्हा नियुक्तीला एक वर्ष होत असतानाच त्यांच्यावर अविश्‍वास प्रस्ताव देण्यात आला होता मात्र राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार असल्याने आणि जिल्ह्यात दोन मंत्री असल्यावर महापालिकेत आयुक्तांवर अविश्वास प्रस्ताव आणला गेल्याने याबाबत राज्याच्या राजकारणात चर्चा रंगली होती.

भाजपच्या नगरसेवकांनी महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्यावर अविश्‍वास प्रस्ताव सादर केला होता. त्यावर मंगळवारी रोजी मतदान घेण्यात येणार होते.  शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट व एमआयएमच्या नगरसेवकांनीही पाठिंबा दिला होता.

मंगळवारी होणाऱ्या महासभेत प्रस्ताव सादर होत असल्याने याबाबत सोमवारी मोठ्या राजकीय उलथापालथी होऊन सायंकाळी जळगाव येथील अजिंठा विश्रामगृहावर पालकमंत्री गुलाबराव पाटील भाजप नेते व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण , आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत  नगरसेवक तसेच महापालिका आयुक्त यांची संयुक्त बैठक झाली. त्यानंतर समझोता होऊन आयुक्तावरील अविश्‍वास ठराव मागे घेण्याचा निर्णय झाला.

या बैठकीनंतर बोलताना राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. महापालिका आयुक्त व नगरसेवक यांच्यात विकासकामांवरून वाद होते. याबाबत बैठकीत चर्चा झाली. विकासकामांबाबत सुधारणा करण्यास आयुक्तांना सांगण्यात आले आहे. त्यानुसार त्या कामात सुधारणा करणार आहेत. त्यामुळे शहरात विकासाची कामे वेगाने होतील. तसेच या बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये नगरसेवकांचेही समाधान झाल्याने हा अविश्वास प्रस्ताव मागे घेण्यात येणार आहे.

विधानसभा अधिवेशन चालू असल्यामुळे आम्ही त्याठिकाणी होतो, त्याचदरम्यान, नगरसेवक व आयुक्तात मतभेद झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती. यापुढे असे मतभेद होणार नाहीत असेही मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.