अतिरेक व्हेगन डाएटचा..

0

लोकशाही विशेष लेख 

सध्या सगळीकडेच व्हेगन डाएटचे फॅड सुरू आहे. डायबिटीसचे रुग्ण, ओबेसिटीमध्ये वजन कमी करण्यासाठी, फिटनेससाठी व्हेगन डाएट सुरू करा म्हणून सांगितले जाते. आपल्याकडे हे नेहमीचच आहे परदेशातून एखादी गोष्ट आपल्याकडे आणली जाते आणि आपण सर्व तिच्या मागे धावतो मग ती एखादी फॅशन असो कपडे असो किंवा खाण्यापिण्याविषयी असो.

परदेशातून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा उदो उदो करणे  यातच आपण धन्यता मानतो आणि आपली संस्कृती ही विसरतो. आता हेच पहा ना व्हेगन डाएटचे किती प्रस्थ वाढले आहे. व्हेगन आणि शाकाहार यातही फरक आहे बर का. व्हेगन डाएट म्हणजे फक्त भाज्या व फळे ते ही बहुतेक वेळा कच्चेच खातात (फक्त वनस्पतीजन्य पदार्थाचा समावेश यात असतो. कोणत्याही प्राणिजन्य पदार्थ जसे की दूध दही तूप लोणी मध इ्. चा यात समावेश नसतो). आपल्याकडे शाकाहारी लोक भाज्या व फळे याबरोबरच दूध लोणी दही ताक, पनीर, चीज व मध या गोष्टींचा आहारात वापर करतात.

परंतु सध्या हे वेगळं डायट प्रचलित झाले आहे आणि त्यामध्ये फक्त फळे व भाज्या खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यात इतर प्राणीजन्य पदार्थ पूर्णपणे वर्ज्य केले जातात. काही दिवसांपूर्वी तुम्ही सोशल मीडियावर एक बातमी वाचली असेलच झान्ना समसानोवा या व्हेगन आहार घेणाऱ्या स्त्रीचा कुपोषण व जंतुसंसर्गामुळे मृत्यू झाला. ही झाना फक्त कच्च्या भाज्या व फळे खात होती. यामुळे तिच्या शरीरात प्रोटीन्सची खूप कमतरता झाली होती आणि त्यामुळे तिला जंतुसंसर्गही झाला होता यातूनच तिचा मृत्यू झाला.

अति तेथे माती ही म्हण आपल्याकडे सर्वश्रुत आहे. या उक्तीप्रमाणे जेव्हा कोणतीही व्यक्ती फक्त भाज्या व फळे एवढेच खात असेल तर त्यामुळे शरीराला आवश्यक असणारे घटक अर्थातच मिळत नाहीत आणि शरीराचे कुपोषण होते. शरीराच्या योग्य पोषणासाठी कर्बोदके, प्रथिने, विटामिन्स, मिनरल्स, फॅट्स इत्यादी सर्वांची योग्य प्रमाणात आवश्यकता असते. फक्त भाज्या व फळांमधून या सर्व आवश्यक गोष्टींची पूर्तता होत नाही. यामुळे प्रोटीन्स कॅल्शियम विटामिन बी ट्वेल कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स यांची कमतरता शरीरात होते. ही कमतरता भरून आणण्यासाठी रोजच्या आहारात दूध व दुग्धजन्य पदार्थांचा वापर हा हवाच.

आपला भारत देश हा दुध दुभत्याचा देश आहे. संपूर्ण भारतात दूध दही, ताक लोणी तूप खाण्याची प्रथा आहेच. रोजच्या जेवणात दही, ताक लोणी तसेच दुधापासून बनवलेला एखादा गोड पदार्थ हे भाजी पोळी भाकरी वरण भात या बरोबर असतात आणि यामुळे शरीराचे योग्य पोषणही होत असते. शरीरास आवश्यक असे सर्व घटक यातून मिळत असतात. अगदी तान्ह्या बाळापासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना हे पदार्थ खाता येतात. आयुर्वेदानुसार दुधामुळे शरीराला बल मिळते ते रसायन आहे तसेच लोणी तूप हे बलदायक, बुद्धीवर्धक, स्मृतीवर्धक, वर्ण्य आहेत. लोण्यामध्ये डीएचएचे प्रमाण भरपूर आहे ते मेंदूच्या विकासासाठी अत्यावश्यक आहे आपल्याकडे लोणी व खडीसाखर खाण्याची प्रथा आहे. घरी बनवलेले, योग्य पद्धतीने लावलेले दही जर खाल्ले तर त्याचेही अनेक फायदे आहेत.  जेवणानंतर ताजे ताक घेतल्याने पचनाचे विकार मलावष्टंभ मूळव्याध, ग्रहणी, आयबीएस यासारख्या व्याधींमध्ये उपयुक्त आहे. शाकाहारी लोकांसाठी पनीर चीज हे प्रोटीन्स कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहेत अर्थात पनीर आणि चीज हे रोज खायचे नाहीये. मध हे कफजन्य विकारात सर्दी खोकला मेदो रोग यामध्ये अत्यंत उपयोगी आहे. म्हणजेच बघा ना या सर्व पदार्थांचा आपल्या शरीरासाठी किती उपयोग होतो ते आणि हेच सगळे पदार्थ जर आहारातून वर्ज्य केले तर नक्कीच शरीराची झीज होणार आहे.

आहार हा नेहमी परिपूर्ण चौरस असायला हवा. कोणताही एकच पदार्थ अति प्रमाणात घेणे हे चुकीचेच आहे त्यामुळे शरीरास आवश्यक असणारे सर्व घटक मिळत नाहीत. अति सर्वत्र वर्जयेत म्हणून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करूच नये. मांसाहार हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण पुन्हा सरसकट रोज मांसाहार नकोच. आहार हा संतुलितच हवा. आयुर्वेदानुसार मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य नाहीये पंचकर्मातील काही प्रकारात मांसरसाचा उपयोग करतात तसेच काही औषध बनवताना ही प्राणिजन्य पदार्थांचा वापर केला जातो. काही व्यक्तींमध्ये आजारातून बरे झाल्यावर, शरीर शक्ती भरून येण्यासाठी मांसरसाचा (सुप)  उपयोग केला जातो. परंतु आजकाल ज्या पद्धतीचे मांस मिळते त्यात प्राण्यांना दिली जाणारी विविध इंजेक्शन, पोल्ट्रीतील चुकीची व्यवस्था, फ्रोजन केलेले मांस या सर्व प्रकारांमुळे मांसाहार हा बंद सांगितला जातो. हीच गोष्ट दुधाच्या बाबतीतही दिसून येते त्यामुळेच बऱ्याच लोकांना दुधाची एलर्जी दिसून येते. गाई म्हशींना  जास्त दूध येण्यासाठी इंजेक्शन दिली जातात आणि असे दूध घेतल्याने त्याचे वाईट परिणाम शरीरावर दिसून येतात त्यामुळे आपल्या देशी गाईचे दूध हे आरोग्यासाठी उत्तम आहे.

सध्या दूध तूप लोणी ऐवजी अनेक पर्यायी पदार्थ जसे सोया मिल्क अलमंड मिल्क इत्यादी वापरले जातात परंतु त्यामध्ये दुधा तुपाचे गुण आणि पोषण नक्कीच येत नाही त्यामुळे हे पदार्थ खाऊन शरीराला तसा फायदा मिळणार नाहीये. आपल्याकडे पंचामृत रोज खायला सांगितले आहे अगदी गर्भिणी अवस्थेतही पंचामृताचे सेवन रोज करायला सांगितले जाते त्यामुळे गर्भाची वाढ उत्तम होते आणि आईलाही व्यवस्थित पोषण मिळते पंचामृत हे दूध दही तू मध साखर यापासूनच बनवतात.

श्रीकृष्णाला संपूर्ण भारत देशात मानले जाते. श्रीकृष्ण हा गोपाल होता गायगुरांची राखण करायचा आणि भरपूर दूध दही लोणी खायचा. आजही दहीहंडी सारखे उत्सव सर्वत्र साजरे केले जातात. जिथे साक्षात देव हे सगळे पदार्थ खातो तिथे आपणही हे खायलाच हवेत हो ना? आणि इथे कुठेही प्राण्यांना दुखावले जात नाही अगदी  प्रतीकात्मक दृष्ट्या जरी बघितले तरी हे सर्व पदार्थ आपल्या शरीराच्या पोषणासाठी अत्यावश्यक आहेतच.

तर तुम्ही शाकाहारी असाल तर दूध दुभत्याचा आहारात वापर नक्की ठेवाच फक्त व्हेगन होऊ नका कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका.  संतुलित आणि योग्य आहार, प्रकृतीनुसार आहार हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे.

 

डॉ. लीना बोरुडे

आयुर्वेदाचार्य पंचकर्म व वैद्यक योग तज्ञ

मोबाईल नंबर –   9511805298

Leave A Reply

Your email address will not be published.