खाद्यसंस्कृती: व्हेज कोल्हापुरी अंगारा

0

लोकशाही विशेष लेख

श्रावण महिना सुरू आहे, तर केळीच्या पानावरचा साग्रसंगीत भोजणाचा आस्वाद याच महिन्यात घेता येतो. सर्व काही शाकाहारी पदार्थांची मेजवानी, खमंग फोडणीच्या आमटी, हिरव्या पालेभाज्या, उसळ, पापड, लोणचे, आणि गोडधोड असा लवाजमा श्रावणात रोजच्या जेवणात असतो. रोज रोज श्रावण महिन्यात पालेभाज्या खाऊन घरातले सुद्धा कंटाळा करतात म्हणूनच आज तुमच्यासाठी हिरव्या पालेभाज्यांच्या व्यतिरिक्त एका नवीन रेसिपी आहे. चला तर मग तयारीला लागा.

साहित्य:

१ वाटी फ्लॉवर, १ वाटी बटाटे, १/२ वाटी गाजर, १/२ वाटी सिमला मिरची, १/२ वाटी फरसबी, १/२ वाटी मटार, कांदे ३, टोमॅटो ३, काजू बी १०/१२, आलं-लसूण पेस्ट २ चमचे, १/२ चमचा जीरे, १ चमचा कसूरी मेथी, दिड चमचा कोल्हापूरी तिखट, १/२ चमचा हळद, २ चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर, १ चमचा गरम मसाला, कोथिंबीर, १ चमचा तूप, गरजेनुसार तेल, फ्रेश क्रिम आवश्यक असल्यास

कृती:

१) सर्व फळभाजी स्वछ धुऊन एकसारखे चौकोनी आकारात कापून घ्यावे.
२) फ्लॉवर, बटाटे, गाजर, सिमला मिरची, फरसबी, मटार, काजू बी, आणि १ कांदा कमी तेलात या भाज्या शॅलो फ्राय करून घ्यावे.
३) एका कढईमध्ये २/३ चमचे तेल गरम करून जीरे फोडणीसाठी घालून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा परतवून घ्यावा.
४) कांदा लालसर रंगावर झाला की त्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून तेल सुटेपर्यंत परतवून घ्यावे.
५) आता त्यामध्ये काजूची पेस्ट करून घालावी व नंतर आलं-लसूण पेस्ट घालून मिश्रण तेल सुटेपर्यंत परतवून घ्यावे.
६) आता त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला पावडर आणि कोल्हापूरी तिखट घालून मसाला एकजीव करावा.
७) सर्व भाज्या मसालामध्ये घालून परतवून घ्यावे. व एक ग्लास पाणी घालून भाजी शिजू द्यावी.
८) भाजी शिजत असताना त्यामध्ये कसूरी मेथी व कोथिंबीर घालून परतवून घ्यावी.
९) भाजी शिजली की एक वाटी मधोमध ठेवून त्यामध्ये एक दोन गरम केलेल्या कोळशाचे तुकडे ठेवून त्यावर १ चमचा तूप ओतून झाकण बंद करून ठेवावे.
१०) गरमागरम ‘व्हेज कोल्हापूरी अंगारा’ फ्रेश क्रिम पसरवून रोटी किंवा नान सोबत खायला तयार आहे.

श्रावणात सुद्धा एकदम झणझणीत आणि रसरशीत रेसीपींचा आस्वाद घेता येत असेल तर मग रोजच मेजवानीचा बेत आखता येईल.

अपर्णा स्वप्निल कांबळे/नांगरे
मो. ९८९२१३८१३२
पत्रकार/फूड ब्लॉगर

Leave A Reply

Your email address will not be published.