‘वेड’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) व जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांच्या ‘वेड’ (Ved) या मराठी सिनेमानं सर्वांना वेड लावलं आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन दिवसांत रितेशच्या या सिनेमाने बक्कळ कमाई केली आहे.

‘वेड’ या सिनेमात रितेश व जिनिलियाने मुख्य भूमिका सादरकेली आहे. रितेशने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. जिनिलिया या सिनेमाची निर्माती आहे, शिवाय हा तिचा पहिला मराठी सिनेमा आहे. रिलीजआधी या सिनेमाची जोरदार चर्चा होती. सिनेमाच्या गाण्यांनीही धूम केली होती. अशात कधी एकदा हा सिनेमा रिलीज होतो, असं चाहत्यांना झालं होतं. अखेर शुक्रवारी 30 डिसेंबर रोजी हा सिनेमा चित्रपटगृहात धडकला आणि या चित्रपटाला चाहत्यांनी प्रचंड पसंती दिली. या सिनेमाने तीन दिवसांत केलेल्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ‘वेड’च्या कमाईचे आकडे शेअर केले आहेत. पहिल्या दिवशी या सिनेमाने 2.25 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी हा आकडा 3.25 कोटींवर आणि तिसऱ्या दिवशी 4.50 कोटींवर पोहोचला. तीनच दिवसांत या सिनेमाने एकूण 10 कोटी कमाई केली आहे. ‘वेड’च्या कमाईचे हे आकडे मराठी चित्रपटसृष्टीत नवं चैतन्य निर्माण करणारे आहेत. येत्या दिवसांत हा चित्रपट कमाईचा आणखी मोठा आकडा पार करेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.