श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

0

अधिकमास विशेष लेख

 

अभंग-६

 

तुवा मुद्दल गमवलें

जन्मा येऊनी काय केले I
तुवां मुद्दल गमविलें IIध्रुII
कां रे न फिरसी माघारा I
अझुनि तरी फजितखोरा II१II
केली गांठोळीची नासी I
पुढें भिके चि मागसी II२II
तुका म्हणे ठाया I
जाई आपुल्या आलिया II३II

अभंग क्रमांक २२४४

मनुष्य जन्म मिळणे मुमूक्षत्व असणे व महानपुरुषांचा, सत्पुरुषांचा आश्रय लाभणे या तिन्ही गोष्टी दुर्लभ असतात. म्हणून तर रामदास स्वामीही म्हणतात, नरदेह हा लाभलेले घबाड पुन्हा तो मिळेलच याची काय खात्री नाही. त्यामुळे विवेकानं त्याचा उपयोग करून घ्यावा. भगवंतांनी कृपाळूपणे दोन हात, दोन पाय दिलेत तिथे कुठलाही भेद नाही पण प्रत्येकाचे मन व वृत्ती ही मात्र निरनिराळी आहे. त्यामुळे काहींचे जीवनविषयक तत्त्वज्ञान खाऊ, पिऊ,मजा करु असे आहे. जीवनाचा पूर्णपणे आनंदच घ्या असे असते. मग मागचा पुढचा विचार न करता बेधुंद आयुष्यात मस्तीत जगणे स्वीकारले जाते.

संतश्रेष्ठ तुकोबाराया अशा माणसांना जागे करतात. उठवितात, अरे बाबा! तुझी फजिती होईल. यमयातना कठीण आहेत. जन्माला येऊन तू काय करतोस? तुझे लक्ष आहे का?

जन्मा आल्याचे फळ I अंगा लागो नेदी मळ II

देहाची स्वच्छता आपल्याला सर्वपरिचित आहे. देह देवाचे मंदिर आहे. ते स्वच्छ व सुंदर ठेवलेच पाहिजे. आपले कपडे, आपले घर, घराचा परिसर सर्वच आपण प्रयत्नपूर्वक प्रतिदिवशी स्वच्छ करतो. अशा निर्मळ देहात आपोआपच देवाचा वास राहतो. पण एवढेच पुरे नसते. आपल्या हृदयात भगवंताचा वास राहण्यासाठी आपल्याला काम, क्रोध, लोभ, मोह, मद,मस्तर हे षड्रिपू आधी घालवावे लागतात. तसा प्रयत्न करावा लागतो. केवळ साबण लावून बाह्रअंग स्वच्छ होते पण अंतरंगाचे काय?

हे काम क्रोध प्रत्येक वेळेस आपल्या आड येतात व तो अनंत पैलतीरीच राहतो. कारण काम क्रोध जिंकणे सोपे नसते.वैराग्याच्या गोष्टी जोवर बोलल्या जातात जोवर प्रलोभने पुढे नसतात. सध्या तर बाय वन गेट वन फ्री चा जमाना आहे. खूप सावधपणे व कटाक्षाने जीवन व्यतीत करावे लागते. धनाचा, मानाचा ,स्त्रीचा, शिक्षणाचा, नावलौकिकता, विद्वत्त्येच्या वलयात आपण कधी गोवले जाऊ, फसले जाऊ हे सांगता येत नाही.आपण इथे कशासाठी आलो आहोत, आपल्या जीवनाचे ध्येय काय? याचा सर्वांगाने विचार करावा लागतो. या पार्श्वभूमीवर जगा व जगू द्या या न्यायाने वागणारे काही मंडळी असतात. काही जण माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे या न्यायाने चालणारे असतात. पुण्य, परउकार, पाप ते परपीडा असे वागणारे साधू वृत्तीचे सज्जन असतात. काही समाजकार्य करतात तर काही देशसेवा करतात. त्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावणारी व्यक्तिमत्व असतात. इतिहास आपल्याला याची साक्ष देतो व ते गौरवास्पद आहे. हे सार करत असुनही आपण काही नेम,काही भक्ती, काही उपासना नियमित करणं अभिप्रेत आहे.

“परमार्थ तो राज्यधारी I परमार्थ नाही तो भिकारी II”

असे रामदास स्वामी हे स्पष्ट म्हणतात. तुकोबारायही जागे करून तू भक्ती न करता राहिलास तर भीक मागण्याखेरीज काही राहणार नाही असे सांगत आहेत. मग जे दैन्यवाणे जिणे असा याचा अर्थ.कारण तुम्ही कितीही कमावले तरी जाताना दोन्ही हात मोकळे असतात हे सत्य नाकारून चालत नाही. यासाठी ते मार्गदर्शन करतात ना पुढे म्हणतात, तु जिथुन आलास तिथेच परत जा याचा अर्थ अवघड आहे. त्यासाठी संतचरणाचे धुळ माथ्यावर लावावी लागते. सद्गुरूची भेट झाली तर सहीसलामत मार्ग मोकळा होतो. कारण त्यांच्या सहवासात वासनेचे बीजच जळून जाते. वासनेपोटी येणारे सारे अवगुण आहेत. देहबुद्धी नकळत सुटते ती जादू असते व सद्गुरू हे जादूगार असतात. ते जन्म- मरणाच्या चक्रातून सुटका करतात.त्यांच्या ठायी इतके सामर्थ्य असते की आपल्या सत् चित् आनंद स्वरूपाची अखंड भेट ते आपल्याला घडवून देतात. असे सद्गुरु भेटायला हवेत व त्यांचा सहवास लाभायला हवा. संसारात देहबुद्धी दृढ होण्याचे प्रसंग वारंवार येतात अधिकाधिक येतात.

पण तसे होऊन न देता विवेक व वैराग्यचे बळ आपण संपादित केले पाहिजे. जन्माला येताना जी निरागसता होती तिच वय वाढली तरीही टिकून राहिली पाहिजे. निखळ सुखरूप जीवन जगण्याची कला अवगत झाली पाहिजे व तुकोबारायांच्या मार्गदर्शनानुसार जीवन कृतार्थ केले पाहिजे.

श्रीकृष्ण शरणं मम्….

-भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे
मो. 8412926269

Leave A Reply

Your email address will not be published.