संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा (भाग अंतिम : समारोप)

0

लोकशाही विशेष 

 

संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा.. हे सदर गेल्या महिनाभरापासून अधिक मासाच्या निमित्ताने वाचकांसाठी प्रसारित केलं जात होतं. अधिकमासाचं वैदिक काळापासून फार महत्त्व आहे. या मासाला पुरुषोत्तम मास असं देखील म्हटलं जातं. वैज्ञानिक दृष्ट्या सौर कालगणना आणि चंद्रकाल गणना यांचा एकमेकांशी ताळमेळ साधला जाऊन काही दिवसांचा फरक पडत असतो. तो फरक आणि ते काळ अंतर भरून काढण्यासाठी दर तीन वर्षांनंतर तीस दिवस अधिक घेतले जातात. आणि हेच ते 30 दिवस म्हणजे अधिक मास होय..

प्राचीन काळापासून याला एक विलक्षण असे महत्त्व आहे. या काळात मंगल कार्य करण्याला अधिक महत्त्व दिले जाते. बऱ्याच ठिकाणी भागवत पुरणाचे वाचन, भागवत कथा सप्ताह आयोजित करून त्याचं महत्त्व वाढवलं जातं. भक्तीच्या प्रवाहात न्हाऊन निघण्याचा हा काळ.. पुणे येथील अभ्यासक व लेखिका भाग्यरेखा पाटोळे यांनी या अधिकमासाच्या निमित्ताने दैनिक लोकशाहीच्या माध्यमातून श्री संत तुकाराम महाराज यांच्या निवडक अभंगांची अमृतगंगा वाचकांच्या विचारप्रवाहातून दुथडी भरून वाहू घातली.

मानवी विचारांच्या प्रवाहाला जोड मिळाली शब्दामृतगंगेची, तिचा मुख्य आधार ठरले संत शिरोमणी तुकोबा आणि त्याला निमित्त ठरल्या पुण्याच्या भाग्यरेखा पाटोळे. तुकोबांच्या शब्दामृतांना भाग्यरेखा पाटोळे यांनी अत्यंत सोप्या आणि आधुनिक शब्दांमध्ये विश्लेषित करून सांगितले.

या सदराचे एकूण 33 भाग म्हणजेच 33 तुकोबांचे अभंग विश्लेषणात्मक पद्धतीने प्रसिद्ध झाले. अधिक महिन्यात 33 या शब्दाला विशेष महत्त्व आहे. कारण अधिक महिना हा 32 महिने १६  दिवस आणि ८ तासानंतर सुरू होत असतो. यामध्ये दान करावं अशी देखील प्रथा प्रचलित आहे. त्याचा उल्लेख ‘तीस तीन’ असा होतो. त्याचप्रमाणे हिंदू संस्कृतीत 33 कोटी देव असल्याचे देखील बोलले जाते. त्यामुळेच या 33 साधारण मधून 33 अभंग विश्लेषणात्मक स्वरूपात भाग्यरेखा पाटोळे यांनी समजावून सांगितले.

नुकतीच हे भाग संपले. आज त्याचा समारोप प्रसिद्ध करीत आहोत. भाग्यरेखा पाटोळे यांनी विश्लेषित केलेल्या या अभ्यासपूर्ण सदराची फक्त जिल्ह्याच नव्हे, महाराष्ट्राच नव्हे देशच नव्हे तर संपूर्ण भारताच्या बाहेरून देखील दखल घेतली गेली. त्यासंदर्भातील प्रतिक्रिया देखील प्रसारित होत गेल्या. त्याच  प्रतिक्रिया आम्ही आज वाचकांसाठी पुनःप्रसारित करीत आहोत…

 

******

दहावी परीक्षेचा निकाल जेव्हा लागतो तेव्हा गुणवत्ता यादीत मुलं चमकतात. ती मुले नववीपासून अभ्यासासाठी तयारी करतात. कुठलीही सुट्टी किंवा वेळ वाया न घालता अभ्यासाचे वेळापत्रक, विषयाचे नियोजन, पालकांचे सहकार्य, गुरुवरांचे सहाय्य, स्वतःची शरीर प्रकृती संभाळणे, शिवाय स्वतः घेतलेली मेहनत या सर्वांच्या एकत्रित साह्याची परिणीती म्हणजे हे उत्तम यश असते. मग जीवनाची परीक्षा उत्तम तऱ्हेने उत्तीर्ण व्हायचे असेल तर आयुष्यभर कर्मही तशीच उत्तम लागतात.

कर्म करण्याची हातोटी, त्यातील कौशल्य, भक्ती- उपासना मार्गातील प्रामाणिकपणा हा आपल्याला संत विचारातून समजून घ्यावा लागतो व तसे मार्गक्रमण करावे लागते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून याबाबत अतिशय नेमके मार्गदर्शन केले. त्यामुळे नित्य परिचयाचे असलेले व अगदी जवळीक साधणारे असे सुलभ अभंग यासाठी निवडले कारण संपूर्ण अभंग गाथा ही एक ज्ञानगंगा आहे व ती आकलण्यासाठी तशीच ताकदही हवी.

पण ही अवीट अशी अमृतगंगा सर्वांनाच भावली. काही वाचक वर्गाचे फोन आले की, “डोळ्यात अंजन घालणारी मालिका आहे”. हे संत विचारांचे सामर्थ्य आहे. कारण ते सर्व काही मार्गदर्शन करतात. अनेक भगिनी वर्गाने ही नियमित वाचन केले व या अधिक मासानिमित्त केलेल्या चिंतनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. अनेक संत येथे झाले. येथील भूमि भक्तीसाठी सुपीक आहे. त्यामुळे परदेशात जरी व्यक्ती असली तरी तिची नाळ आपल्या मायभूमीशी, माय भूमीतील संतांशी, संत विचारांशी जोडलेलीच असते. त्यामुळे परदेशातील, परप्रांतातील व्यक्तींनाही अमृतगंगा आपलीशी वाटली व तिचे कौतुक झाले.

“ठेविले अनंते तैसेची रहावे I चित्ती असो द्यावे समाधान I” हे अभंगापुरते मर्यादित न राहता त्यावरून थोडी तरी पाऊल आपली पडावीत म्हणून हा लेख प्रपंच केला. जसे आपण पदवी, प्रतिष्ठा, नावलौकिक व पैसा कमवतो तसेच समाधानही मिळवायचे आहे.

संत तुकाराम महाराजांसारखे आनंदाच्या कोटी आपल्याला जमलं नाही तरी आनंद निर्भर, आत्मनिर्भर जीवन जगण्याचा प्रयत्न आपण नक्की करूया. संतांनी संस्कृतीचे, समृद्धीचे, भक्तीचे मळे पिकवलेले आहेत. उदंड पीक या भूमीत आहे. नवीन वर्षाच्या पार्ट्या करण्याइतपतच आनंदाची कल्पना राहू नये, तर ब्रह्म रसाचे भोजनही आपण संत साहित्याच्या चिंतनात करू शकतो व धन्य होऊ शकतो. हा दृष्टिकोन लोकशाही दैनिक या वृत्तपत्रात आपण तुकारामांच्या अमृतगंगेतून त्याचा आस्वाद घेतला. त्यात सहभागी असलेल्या सर्वांनाच मनःपूर्वक धन्यवाद…

 

जय जय राम कृष्ण हरी

भाग्यरेखा पाटोळे  

 

*******************

वाचकांच्या प्रतिक्रिया 

आपल्या महाराष्ट्राला संतांची थोर परंपरा लाभली आहे. त्यांची वचने आजही आपल्याला शिकवण देतात. आपल्या संतांनी षडरिपूवर मात करायला सांगितले आहे. मद मोह मत्सर इ. मिळवलेल्या संपत्तीचा गर्व करु नका. दुसऱ्याच्या प्रगतीने मनात इर्षा ठेऊ नका. परस्त्री मातेसमान माना. गरजूंना वेळ प्रसंगी मदत करा. हे संतांच्या वचनांचे सारं आहे. ते आचरणात आणणे हे आपले कर्तव्य आहे.

प्रो.  नीता शेळके कोष्टी

न्यू जर्सी, अमेरिका

 

***********************

सप्रेम नमस्कार ताई, 

रामकृष्ण हरी, आजचा आपला दै. लोकशाही वृत्तपत्रातील संत तुकाराम महाराजांच्या अभंगावरील विवेचन वाचले आणि खूप आनंद झाला. लेख फारच अभ्यासपूर्ण आहे.

आपला हितचिंतक

द्वारकाधीश दिगंबर जोशी. जळगाव

 

********************

संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, समर्थांचा दासबोध, नाथांचे एकनाथी भागवत व तुकोबारायांची अभंग गाथा हे चार ग्रंथ म्हणजे जणू चार वेद आहेत. हे जरी खरे असले तरी हे सर्वसामान्यांना बहुमोलाचे तेव्हाच ठरतील जेव्हा त्यातील ओव्या अभंगांचे विवेचन श्रीमती भाग्यरेखा पाटोळे यांच्या सारख्या विद्वान, गाढ्या अभ्यासकांकडून अशा रीतीने वाचायला मिळते. साध्या सोप्या शब्दात भाग्यरेखा ताईंनी प्रत्येक अभंगाचा अर्थ विविध विषयांच्या संदर्भाच्या कोंदणात घालून आणखी स्पष्ट केला आहे. त्यांची लेखमालिका खरोखरच संग्रही ठेवण्यासारखी झाली आहे. पुरुषोत्तम मासासाठी त्यांनी ही संत भक्तांना चांगलीच देणगी दिली आहे. संत तुकारामांच्या एवढ्या प्रमाणातील अभंगांवर इतक्या विस्ताराने, विविध अंगाने, पुनरुक्ती न होऊ देता अर्थपूर्ण लेखन क्वचितच बघायला मिळते. आता समारोप होतो आहे तर लेखमालेची उणीव रोज भासेल हे नक्की !!

लोकशाही या दैनिकाचे सुद्धा धन्यवाद. वृत्तपत्रातील लेखाची मांडणी सुबक व आकर्षक होती.

 

मीना खाडिलकर, बेंगलोर

 

*********************

भाग्यरेखा पाटोळे ताईंनी अधिक मासासाठी केलेला उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. दोन कारणांसाठी मी असे म्हणत आहे. पूर्वीचे लोक अधिक मासात नेहमी पेक्षा जास्त व्रत वैकल्ये करायचे. पण बुद्धिजीवी लोकांना लेखन वाचन हे जास्त आवडते. त्यामुळे स्वतः भाग्यरेखा ताई आणि वाचक दोघांनाही हा उपक्रम लाभदायक आहे. दुसरे म्हणजे त्यांनी निवडलेला विषय. संत तुकाराम यांना जगद्गुरू म्हणुन ओळखले जाते. त्यांची गाथा आणि सगळेच अभंग अविट गोडीचे आणि सामान्य माणसाला भक्तीचे महत्व पटवून देणारे, सहज शब्दात मोठी शिकवण देणारे आहेत. “खेळ मांडियला” घ्या किंवा “सुंदर ते ध्यान!”, “पुण्य पर उपकार पाप ते परपिडा” हे तर जागतिक स्तरावर सुभाषित म्हणुन नेमावे इतके दर्जेदार आहे. या सगळ्याचा रसाळ भाषेत परिचय आणि विश्लेषण करण्याची प्रेरणा मिळाली त्याबद्दल ताईंचे कौतुक आणि अभिनंदन करते.

या दर्जेदार लेखमालिकेचा आस्वाद घेण्यासाठी “दैनिक लोकशाही” या वृत्तपत्राने घेतलेली दखल ही स्तुत्य आहे. धन्यवाद.

प्रा. डॉ. अमिता धर्माधिकारी

संख्याशास्त्र विभाग प्रमुख (सेवानिवृत्त)

मॉडर्न कॉलेज

पुणे.

******************

आपल्या लोकशाही या दैनिक वृत्तपत्रातून अधिक महिन्यानिमित्त दिनांक 18 जुलै पासुन संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा ही लेखमाला प्रसारित करण्यात आली. ही लेखमाला खरोखरीच अतिशय आनंददायी व ज्ञानदायी आहे त्याबद्दल आपल्या वृत्तपत्राचे आभार.

या लेखमालेतील प्रत्येक अभंग हा जीवनाचे मुल्य सांगुन जातो. तसेच भक्ती कशी असावी याविषयी मार्गदर्शन मिळते. खरंच भक्ती संत मीराबाईसारखी आर्त, श्री.संत ज्ञानोबासारखी शुद्ध, रामदास स्वामींसारखी प्रखर व संत तुकारामांसारखी समाज उपयोगी हवी. संसार व परमार्थ यांचा मेळ घालून हा भवसागर पार करणे सामान्य माणसाला शक्य होईल.

या लेखमालेच्या लेखिका श्रीमती भाग्यरेखा पाटोळे यांनी निवडलेले अभंग खरंच लोकमान्य आहेत. त्यांनी या अभंगांचे विवेचन फारच सुंदर शब्दात केले आहे. आपल्या जीवनातील रोजच्या घडणाऱ्या घटनांचा संदर्भ देऊन लेखमालिका आपलीशी वाटते. तसेच तुकाराम महाराजांच्या बरोबरच इतर संत जसे संत गाडगेबाबा, संत मीराबाई, संत श्री. ज्ञानेश्वर महाराज, समर्थ रामदास स्वामी, पावसचे स्वामी स्वरूपानंद व परमहंस रामकृष्ण यांचे वेळोवेळी दाखले देऊन सर्वच लेख अतिशय रंजक झाले आहेत.

या लेखमालिकेतून आपल्यासारख्या सामान्य जनांना हा भवसागर पार करण्यासाठी एक सुंदर मार्गदर्शन मिळाले. त्याबद्दल लेखिकेचे अभिनंदन व दैनिक लोकशाहीचे आभार.

 

सौ. सुगंधा पारनेरकर

सेवानिवृत्त प्राचार्य

गोखले एज्युकेशन सोसायटी

एच. ए. एल. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,

नाशिक

***********************

 

संत तुकाराम हे सतराव्या शतकातील वास्तववादी, निर्भिड आणि समाजातील दांभिकपणावर प्रहार करणारे संत होते. वेदांवर काही विशिष्ट वर्गाची असलेली मक्तेदारी मोडून आपल्या अभंगवाणीतून भागवत धर्माचा प्रसार केला. वारकरी, ईश्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. खेड्यांतील अशिक्षित लोकांच्या नित्य पाठात तुकोबांचे अभंग आहेत.

बहुजन समाजाला जागृत करून देवधर्मातील अनागोंदी, भोळ्या समजूती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला समाजातील अंधश्रद्धेचा पगड़ा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा दिली. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत. म्हणूनच तर म्हणतात “ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस

याच भागवतधर्माची पताका पुढे नेण्याचे काम “श्रीमती भाग्यरेखा पाटोळे” यांनी उत्तमपणे केले आहे. अधिकमासाचे निमित्त साधून रोज १ अभंग असे निवडक 33 अभंग सोपे आणि सुलभ करून सांगीतले आहेत. अनेक संतवचने, जीवनातील दाखले देत समजावण्याचा खूप मनापासून प्रयत्न केला. यानिमित्ताने सामान्यजनांना तुकारामांच्या गाथेची सार्थ ओळख करून देण्याचे सत्कार्य झाले आहे. त्यांना खुप धन्यवाद.

 

सौ वंदना प्र. पुराणिक,

पुणे

**********************************

सर्वप्रथम इतकी सहज सुंदर सोप्या भाषेत लेखमाला लिहिली त्याबद्दल भाग्यरेखा मावशींचे मनःपूर्वक अभिनंदन करते. तसेच ही लेखमाला आमच्यासारख्या परदेशात राहणाऱ्या वाचकांच्या हातात पोहोचविल्याबद्दल दैनिक लोकशाहीचे खुप खुप आभार.

या लेखमालेतील विचार आम्ही आमच्या मुलांपर्यंत पोहोचण्याचा निश्चित प्रयत्न करू. आजची सामाजिक परिस्थिती बघता अशा लेखमालेची, प्रबोधनाची आजच्या पिढीला, तसेच वयस्कर मंडळींना खुपच लाभदायक आहे. आजच्या काळाची ती गरज आहे. धन्यवाद.

 

डॉ. प्रेरणा सोमवंशी इंगळे.

पेडियाट्रिक कन्सल्टंट

रॉयल बर्क शायर हॉस्पिटल

रेडींग, लंडन

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.