श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

0

अभंग- 26

शुभ काळ अवघ्या दिशा

अवघा तो शकुन I
हृदयी देवाचे चरण II1II
येथें नसतां वियोग I
लाभा उणें काय मग II II
संग हरीच्या नामाचा I
शुचिर्भुत सदा वाचा II2II
तुका म्हणे हरीच्या दासां I
शुभकाळ अवघ्या दिशा II3II

अभंग क्रमांक – 1512

शकुन अपशकुन याचे संस्कार बालपणापासून होतात. कोणाच्यातरी बोलण्यातुन, ऐकण्यातुन मोठ्यांच्या अनुभवातुन ते दृढ होतात. मांजर आडवी गेली काम होणार नाही,दारात कावळा काव काव करू लागला पाहुणे येणार, भारद्वाज दिसला सुंदर शुभप्रद घटना, मुंगूस दिसणे ही चांगले, पाल पडणे म्हणजे अशुभ असे नाना संकेत मन आनंदित व उदासीन करतात. शकुनाच्या गोष्टीही म्हणून सणाला आंब्याच्या डहाळीचे तोरण बांधतात .नारळ तर अग्रगणी असतो व कल्पवृक्षच तो. त्याचा झाड अंगणात हवेच.दिशा व काळ याबाबतही शास्त्र असते. अमुक दिशेला पाय करून झोपावे, अमुक दिशेला झोपू नये, ईश्वराची पूजा ईशान्येला करावी, प्रमुख दार पूर्वेला असावे. शास्त्रधाराने हे बरोबर असते पण वास्तवात पूर्ण पालन शक्य नसते. मग मन अजुन दुषित होते व भयग्रस्त होते,साशंक होते.
“अवघाची संसार सुखाचा करीन I आनंदे भरीन तिन्ही लोक I” ही तर ज्ञानराजांची प्रार्थना. सगळीकडेच सुख. अमुक काळात, अमुक दिशेला, अमुक वाराला असा काही सुखानुभव असतो व इतर वेळेस नसतो हे संतांना मान्य नाही. ‘अवघा तो शकुन’ देवाचे चरण व त्याचे ध्यान आपण अखंड करीत असु तर अमुकच वर्ष भरभराटीचे व प्रगतीचे असे नसते. सगळाच काळ सुवर्णकाळ ठरावा. भगवंताचा योग अखंड हवा.

“सदा सर्वदा योग तुझा घडावा I तुझे कारणी देह माझा पडावा I उपेक्षू नको गुणवंता अनंता I रघुनायका मागणे हेचि आता II” असेच मागणं समर्थ रामदास स्वामी मागतात. व्यापारी असतील तर वहीवर “शुभ लाभ’ लिहूनच त्याची पुजा करतात. लक्ष्मीचे पूजन होते. कुबेराचे पूजन होते. आनंद व उत्साहात दीपावली. साडेतीन मुहूर्तावर आपण नवीन वस्तूची खरेदी व पूजन करतो. लाभ वृत्तिंगत असावा हीच आपली इच्छा असते. संतांच्या जीवनाला भक्तीचा रंग असतो व तो दिवसेंदिवक व्यापक होत जातो. “अवघा रंग एक झाला I रंगी रंगला श्रीरंग” असे होता होता त्यांचा अवघा देहच ब्रह्मरूप होतो. त्यामुळे लाभाची कमतरता त्यांना जाणवत नाही. “काय उणे आम्हा पांडुरंगा पायी ” असा तेच उलट प्रश्न करतात इतके ते आनंदातअसतात.

हरिनामाचा छंद त्यांना लागलेला असतो.”ऐसा घेई छंद,जेणे तुटे भवबंध” हे मान्य करून ते रात्रंदिवस नामसंकीर्तन करतात त्यामुळे त्यांचा संपूर्ण देह पवित्र होतो. संत सेवा घडली नाहीत तर काही लाभ नाही हे त्यांना ठाऊक असते. कारण पवित्रात पवित्र हा संत सहवास असतो, मंगलात मंगल नामस्मरण ठरते, भाग्यात भाग्य म्हणजे सद्गुरु कृपा होय,सुखात सुख म्हणजे परमात्मा अनुभूतीच परम सुख व आनंदात आनंद म्हणजे ब्रह्मानंद.म्हणून तर ते देवाचा वियोग काय कामाचा? हा प्रश्न आपल्याला विचारतात, “हाट भरला संसाराचा I नफा पहावा देवाचा I” हा नफा कसा साधायचा तर चंद्रभागेला जायचं स्नान करायचे व सर्व तीर्थांचाच लाभ एका चंद्रभागेत मिळवायचा. पंढरीला जायचे. पांडुरंगाचे दर्शन घ्यायचे. अवघे पाप दिगंतरा घालवायचे. पुंडलिकाकडे दृष्टी लावून न्याहाळायचं व अवघेच संतांचे दर्शन घ्यायचे. अवघ्या सुखाच्या राशी पंढरीस अनुभवाच्या व श्रीमंत व संपन्न होऊनच बाहेर निघायचे. मोठ्या प्रेम भावनेने साधना साधुन उत्तुंग व्हायचे.

“परमार्थ तो राजधारी I परमार्थ नाही तो भिकारी I ” या परमार्थाची सरी कोणास द्यावी. ही प्रचिती असते. ज्याने त्याने आपल्या शक्ती, भक्ती व युक्ती वर घ्यायाची. पण ओंजळ कधीच रिकामी राहणार नाही हे निश्चित.

हरिनामाचा संग मात्र सोडायचा नाही. वैखरीने सतत ‘राम कृष्ण हरी’ असा मंत्र म्हणायचा व “हरी बोला देता हरि बोला घेता” असे होऊन हरिमय स्वरूप नर-नारी पहायचे. अशा हरीच्या दासाला कोणतेही चिंता करायची नाही. कारण हरी म्हणजे साक्षात स्वानंद, साम्राज्याचा चक्रवर्ती. चक्रवर्तीच्या राज्यात कुठला अशुभकाळ असणार. हा मुहूर्त काही ठीक नाही, लागणार नाही असं चिंतनही तिथे नसणार.”हृदयामध्ये मी राम I असता सर्व सुखाचा आराम I” मग त्यापुढे विषयांचा हव्यास तो किती राहणार? हवे -नको पण किती राहणार व लाभ-हानी तर किती परिणाम करणार. सर्व संतांच्या हृदयात अचल व निवांत असा भगवंत विराजमान असतो. जसे हनुमंताच्या हृदयात श्रीरामाचे दर्शन आपण पाहतो. तसेच आपणही आपले आराध्य दैवत व सद्गुरु यांना हृदयातच जागा द्यावी. माऊली तर म्हणते,”आता हृदय हे आपले चौफाळी निया भले वरी बैसवू पाऊले श्रीगुरुची” षड्रिपूनपासून मुक्त असेल स्वच्छ हृदय मात्र लागते. मग भक्तीच्या या प्रांतात कशाचीही ‘वाणवा’ राहत नाही. ‘देता किती घेशील दो कराने?’ अशीच अवस्था होणार. “मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो आहे” असा भाव बनून जातो. “सहज समाधी सापडले धन लाचावले मन तया ठायी” संसाराचा त्याग न करता केवळ प्रामाणिकपणे कर्तव्यपूर्ती कर्माची केली व उरलेला सर्व वेळ नाना छंदात घालविण्यापेक्षा हरिनामाच्या संगात घालविला तर चोर कधीही चोरून नेणार नाही अशा धनाचा आपल्याला लाभ होतो. आपण सुखरूप होतो. प्रत्येक दिवस सुदिन ठरतो. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात “लाभ नाही यापरता”

श्रीकृष्ण शरणं मम् …

लेखिका -भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.