श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

0

अधिकमास विशेष लेख

अभंग- 25

वाचा बोलों वेदनीती

 

धर्म रक्षावया साठीं I

करणें अटी आम्हांसि II1II

वाचा बोलों वेदनीती I

करूं संतीं केलें तें II ध्रु  II

न बाणता स्थिति अंगी I

कर्म त्यागी लंड तो II2II

तुका म्हणे अधम त्यासी I

भक्ति  दूषी हरिची II3II

 

अभंग क्रमांक 260

 

रामकृष्णादि  अवतारी पुरुष झाले ते दुर्जनांचा संहार करण्यासाठी व सृष्ट  लोकांचे संरक्षण करण्यासाठीच.  “संभवामि युगे युगे” असे ते भुतलावर येतात व लीला करतात. ज्ञानेश्वर माऊलीलाही आपण “ज्ञानेशो भगवान विष्णू” असेच संबोधतो. संत तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आलो ते “धर्माचे पाळन I करणे पाषाण खंडन I आहमा करणे काम I बीज वाढवावे नाम I” जो धारणा करतो तो धर्म. धर्मामुळे व्यक्ती व समाजाचे एकुणच देशाची सुद्धा जडणघडण होते. संत लोक धर्माच्या रक्षणासाठी स्वतःच्या देह-मान-बुद्धीची आटणी करतात. म्हणजेच चंदनाप्रमाणे ते झिजतात. त्रास सहन करतात कारण त्यांनाही दृष्ट लोकांमध्ये मिसळूनच राहावे लागते व कार्य करावे लागते.”उदंड धिक्कारुनि बोलती I तरी चळों न  द्यावी शांती I दुर्जनसी मिळून जाती I धन्य ते साधु I ” त्यांच्या अवतीभवती नेहमीच अनुकूलता असते असे नाही बहुतांश प्रतिकुलताच  असते. प्रतिकूल व्यक्ती किंवा समाज मानस यांनाही ते दूर करत नाहीत जवळ करतात उपदेश करतात पण सदैव  सगळ्यांचेच कल्याण त्यांना अपेक्षित असते. रामदास स्वामी तर प्रार्थना करताना म्हणतात, “कल्याण करी रामराया I जनहित विवरी I तळमळ तळमळ होतचि  आहे I हे जन हाती धरी I” तळागाळातल्या व्यक्तींनाही ते वर आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांना पोटाशी धरतात. “जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले I तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा I” अशी वाच्यताच ते करतात वेदांचा खरा अर्थ त्यांनाच ठाऊक असतो त्यामुळे छातीठोकपणे ते म्हणतात,”वेदांचा तो अर्थ आम्हासिच ठावा इतरांनी व्हावा भार माथा” म्हणजे त्यांच्याकडे शास्त्रप्रचिती गुरुप्रचिती व आत्मप्रचिती तिन्ही असते. त्यामुळे त्यांचे वाड्मय  हे सर्वसामान्यांना समजेल असे असते.  अगदी गहन विषय ते सोपा करून मांडतात. ‘अमृतानुभव’ लिहिलेल्या ज्ञानेश्वर माऊलीन पुन्हा ‘हरिपाठ’ लिहिलाच. अर्थात माऊलीचे सांगणे एकच “विश्व हे मद्रूप मोनोनी पांडवा Iकरी माझी सेवा जीव भावे I ” म्हणून संत होणे हे तर अवघडच पण त्यांची शिकवण अंगी बाळगणं हे ही अवघडच. म्हणून तर तुकाराम महाराज सावध करतात ‘न बाणता स्थिती अंगी’ आपण कर्म सोडणे उपयुक्त नाही. ‘बन चुके हम’ असे कधीही होत नाही. तीन चार तप साधना व्हावी लागते. ‘बनत बनत बन जाए’असेच इथं असते. आज नामस्मरण व उद्या साक्षात्कार असे घडत नसते. त्यामुळे थोड्या कठोर व अर्वाच्या शब्दात महाराज दुषण देतात. व रोजचे नित्य नैमत्तिक संसारिक जबाबदाऱ्या व कर्तव्य पार न पाडणाऱ्या व्यक्तींना दूषण देतात. परमार्थ या नावाखाली कुठेही गबाळेपणा,कामचुकारपणा, गलथानपणा त्यांना नकोय. आपल्यात काही खरंच चांगले गुण असतील तर लोकच त्याचा गौरव करतील. ‘भला रे भला’ म्हणून कौतुक करतील व पोचपावती देतील.

 

सूर्य प्रकाशतो त्याचा प्रकाश पाहण्यासाठी पुन्हा बॅटरी लागत नाही. तसेच संत व सद्गुरू स्वयंप्रकाशित असतात. निवृत्तीनाथ, रामकृष्ण परमहंस, स्वामी स्वरूपानंद व ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे ब्रह्मानंदात स्थित होते. शिष्य प्रबोधन करण्यास ते समर्थ असतात. मग आपली परंपरा किंवा संप्रदाय शुद्ध स्वरूपात चालू राहावा म्हणून ते काही साधन व नियम अधिकाराप्रमाणे शिष्यवर्गाला सांगतात. सारे शिष्य एका पात्रतेचे नसतात पण सर्वांवर ते तितकाच विश्वास टाकतात व प्रेमही करतात, चिंता वाहतात व या मार्गावरून चालवितात.

 

महानुभाव पंथ असो, नाथ संप्रदाय असो, रामदासी संप्रदाय किंवा वारकरी संप्रदाय व दत्त संप्रदाय प्रत्येकाची एक विशिष्ट नियमावली व आचरण प्रणाली घालून दिलेली असते. तसे वागणे घडले तर भक्त हे खरे भूषण ठरतात. संप्रदाय शुद्ध ठेवायचे जबाबदारी ते लीलया पेलतात. असे हरी भक्त अभिप्रेत असतात. अशा समर्थ अशा भक्तांनीच पृथ्वी सनाथ होते.

 

असे शिष्य उत्तम होण्यासाठी संतांच्या चरणावर माथा ठेवावा लागतो, साष्टांग दंडवत घालावा लागतो. त्यांचे सहज बोलणे हे हितोपदेश असतो.त्यांच्यावर भार टाकून रहावे. भक्ताचा महिमा भक्तांनाच समजतो त्यामुळे त्याचे वर्णन वाणीने होऊ शकत नाही. संताची ममता त्यांच्या देहावर नसते. ते देह कष्टवितात इतरांसाठी व शेवटपर्यंत जगाच्या कल्याणासाठी ते कार्य करीत राहतात. मग आपल्यासारख्या सामान्य माणसांनी कर्म त्याग करू नये. गीताही सांगते कर्मा शिवाय एकही क्षण माणूस जिवंत राहू शकत नाही. म्हणून आधी कर्म चांगले उत्तम करावे. हे कर्म प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळ आलेले असते गृहिणी, शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर ,कलावंत किंवा देशासाठी लढणारा सैनिक तो त्याचा स्वधर्म असतो व त्याने त्याची भूमिका व्यवस्थित पार पाडावी लागते.कबीर शेले विणत असत, सावता माळी भाजीची शेती करत,गोरा कुंभार कुंभाराचे काम करीत, जनाबाई दासी होती, माणकोजी बोधला लिंबूर हुरडा पिकवत असे, स्वतः तुकाराम महाराज  घरी सावकारी व्यवसाय होता. फक्त नामस्मरण करीत करीत ते व कर्म कृष्णा अर्पण करीत. त्यांचे जीवन परिपूर्ण झाले.म्हणूनच आपण संत ज्या मार्गाने गेले त्याच पावलावर पाऊल टाकत आपणही मार्गक्रमण करावे. ‘मुखी नाम व हाती काम” एवढा बोध पक्का मनात असावा. मग तो विठुरायाच मागेपुढे सांभाळतो, आघात निवारतो, योगक्षेम वाहतो, हाताला धरून वाट दाखवीतो व शेवटी ‘आपणची देव होय गुरु’ असा प्रेमभावही तोच पुरवितो.

श्रीकृष्ण शरणं मम्…..

लेखिका- भाग्यरेखा पाटोळे

कोथरूड पुणे

Leave A Reply

Your email address will not be published.