श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

0

अभंग- 23

कन्या सासुरासि जाये I

 

मागे परतोनी पाहे II1II

तैसें जालें माझ्या जिवा I

केव्हां भेटसी केशवा II ध्रु II

चुकलिया माये I

बाळ हुरु हुरु पाहे II2II

जीवन वेगळी मासोळी I

तैसा तुका तळमळी II3II

 

अभंग क्रमांक 266

 

‘माहेर’ हे असे असते की कुठल्याही वयात त्याची जीवाला लागून राहिलेली अनामिक ओढ कधीही कमी होत नाही. पूर्वीच्या काळी तर खेळण्याबागडण्याच्या व शिकायच्या वयातच विवाह होत. सहाजिकच लहानगी नवरी तिचा पाय अडकणारच व ती पुन्हा पुन्हा मागे बघणार. आपली माहेरची माणसं,घर,गाई- म्हशी, गोठा ,बाल- मैत्रिणी, झाडाला टांगलेला झोका या गोष्टी तिला डोळ्यात साठवाव्याशा वाटणारच किंबहुना ती जरा बळजबरीनेच सासरी जाणार.

संत तुकाराम महाराज काय किंवा अन्य कोणतेही संत पहा हे प्रपंच आपला बळजबरीने करत असतात. म्हणजे प्रपंच कसातरी करत नाही. पण तिथे त्यांना विशेष गोडी किंवा विशेष त्यांचे लक्ष नसते. याच जन्मात त्यांना भगवंताचे दर्शन घ्यायचे असते. ते त्याची वाट पाहत असतात म्हणून तर माऊली म्हणते,” पैल तो गे काऊ कोकताह शकुन गे माये सांगताहे” पंढरीचा राया त्यांना भेटायला येणार म्हणून ते अतिव आतुर होतात.तर रामदास स्वामी म्हणतात, “कसा मला सोडून गेला राम…. रामाविण जीव व्याकुळ होतो, नाही जीवासी आराम.” कसा मला सोडून गेला राम ‘श्रीरामासाठी’ ते व्याकुळ होतात, तळमळतात. त्यांना बाकीचा सारा शीण वाटतो म्हणून ते त्यांच्या परमदैवताला हाक मारतात,” धाव रे धाव आता” अशीच तळमळ तुकोबारायांना लागून राहिली. माहेराची आस मनात कायम असते. तशी पंढरीरायाची आस त्यांच्या जीवाला अस्वस्थ करून सोडते. कधी एकदा पंढरीरायाचे दर्शन होईल तो मला प्रेमाने कुरवाळेल, जवळ घेईल, मला थोपटेल यासाठी मी खूप कासावीस झालो आहे. लहान मुलांना आई जर क्षणभर दृष्टी आड झाली तरी चालत नाही. बाकीचे अन्य कितीही नातलग त्यांनी अनेक लाड पुरवले तरी ते लाड करून घेते पण आई हेच त्याचे दैवत असते. ती नजरेस दिसली नाही तर चौफेर ते तिचाच शोध घेते व शेवटी आई दिसली की त्याला समाधान वाटते.

अभंग गाथेत ‘बाळ’ हा शब्द अनेक वेळा येतो कारण तुकोबाराय विठ्ठलाचे निसिम भक्त होते व ते स्वतःला देवाचे बाळ असा उल्लेखही करत होते. या लेकराचे हित माऊलीच करणार हे त्यांना ठाऊक होते.पण ही भेट कधी होणार हे निश्चित नसते. भगवंताची अपॉइंटमेंट अमुक वेळेस, अमुक दिवशी, अमुक महिना, साल व स्थळ असे मिळत नसते. त्याला वर्षानुवर्षे उपासना करावी लागते. भक्त प्रल्हाद व ध्रुव बाळ यांच्या गोष्टी आपण ऐकल्या आहेत.

भेटीलागी जिव I लागलेली आस”

“पाहे रात्रंदिसं Iवाट तुझी “

तुकोबारायांनीही अशी वाट पाहिली रात्रंदिवस एक नामाचा छंद घेतला “झडझडोनी वहिला रीघ इया भक्तीच्या वाटा लाग” असे माऊली म्हणते त्याप्रमाणे ते त्या मार्गावरून चालले काही काळ साधक अवस्थेत गुरुदेव रानडे म्हणतात त्याप्रमाणे Dark night of soul प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात येऊनच जाते. पण ती एक परीक्षा असते. रामकृष्ण परमहंस देवदर्शनासाठी रडत. कालीमाते समोर रडत. त्यांच्या उषा अश्रुंनी भिजुन जात. इतकी उत्कटता भक्तीत लागते. देवाशी बोलायचं, भांडायचे, प्रेमाने रुसायचे अशी अतिशय भावपूर्ण जवळीक अखंड असावी लागते. त्याच्या भेटीसाठी जीव नुसता आसुसलेला चालत नाही. खंत व खेद वाटावा लागतो. त्याच्या दर्शनासाठी आपले बाहु आतुर लागतात. नयन त्याचे मुख बघण्यासाठी उत्सुक लागतात.कान त्याचेच गुणवर्णन ऐकण्यास तयार असतात.एकूणच मनाची सर्व धाव विश्वंभराकडे हवी.

 

आपली धावाधाव दिवसभर वेगळ्याच कारणासाठी असते हा अनुभव आहे. उपवासाच्या दिवशीही आपला वास भगवंताजवळ न राहता साबुदाणा खिचडी, शिंगाड्याचे थालीपीठ, लाल भोपळ्याचे रायतं, उपवासाच्या पापड्या, राजगिरा वडी व केशरी मसाला दूध याचा आस्वाद घेण्यातच जातो.

 

आपली सारी धावा धाव ऐहिक संपन्न होण्यासाठी असते. त्यासाठी जीव तळमळत राहतो. तर उत्तम नोकरी, उत्तम स्थळी विवाह, उत्तम घर व उत्तम वृद्धापकाळ हे अपेक्षित असते. यात चूक नाही पण त्याच बरोबर काही उपासना विशिष्ट वेळेस, थोडा काल निश्चित पण तळमळीने, मनापासून व थोडी निग्रहाने करावी.

 

तुकाराम महाराजांचे साधनेतील तळमळ पराकोटीची होती. मासा जसा पाण्याचा बाहेर काढला तर जिवंत राहु शकत नाही तशी आपली स्थिती होईल असे ते म्हणतात व नुसते बोलून ते थांबत नाहीत तर निग्रह त्यांच्या ठायी दिसतो.

सात दिवसांचा जरी झाला उपवासी I तरी किर्तनासी टाकू नये II1II

फुटो हे मस्तक तुटो हे शरीर I

परि नामाचा गजर सोडू नये II2II

शरीराचे होत दोनी ते ही भोग I

परि किर्तनाचा रंग सांडो नये II3II

तुका म्हणे ऐसा नामी ज्या निर्धारि I

तेथे निरंतर देव वसे II4II

 

स्वतः तुकारामांच्या प्रचितीचा हा प्रांत होता म्हणून तर नि:संदेह पणे म्हणु शकले “आमुचे गौरव आम्ही करू” असे म्हणताच डोळ्यासमोर येतात ते संत तुकाराम यांचे चरण. आरंभी ज्ञानेश्वर माऊलीचा नाम गजर झाला की पाठोपाठ येतात “ज्ञानोबा माऊली तुकाराम” “ज्ञानोबा माऊली तुकाराम”

 

श्रीकृष्ण शरणं मम्………

लेखिका-भाग्यरेखा पाटोळे 

            कोथरूड,पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.