श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

0

लोकशाही विशेष लेख

अभंग-१

देव सुखाचा सागर

जाऊं देवाचिया गांवां I
देव देईल विसांवा II
देवा सांगो सुखदुःख I
देव निवारील भूक II
घालूं देवासिच भार I
देव सुखाचा सागर II१II
राहों जवळी देवापाशी I
आतां जडोनी पांयासी II२II
तुका म्हणे आम्ही बाळे I
या देवाची लडिवाळे II३II

– अभंग क्रमांक १८६५

‘गेट-टुगेदर’ हा शब्द अलीकडे सारखा बोलण्यात व ऐकण्यात येतो. तसेच हा दिवस साजरा ही केला जातो. पंचवीस वर्षांपूर्वी एका शाळेत असणारे मित्र मैत्रिणी एकत्र जमतात, भूतकाळात रमतात, जुन्या आठवणीने आनंदतात, एकमेकांचे सुखदुःख एकमेकांना सांगतात. याची गरज सुद्धा असते. समाधान वाटते. परस्परांना आनंदही होतो. मन हलकी होतात. एकूणच काय फ्रेश वाटतं. पण दोन मैत्रिणींची स्थिती एकादशीच्या घरी महाशिवरात्र अशीच असते. सुख व दुःख कमी जास्त प्रमाणात सारखेच असतात त्यामुळे पूर्णपणे विसावा, विश्रांती संभवतच नाही.

देवाच्या चरणाशी किंवा संतांच्या पायाशी जाताच आपल्याला पूर्ण सुख समाधान, शांती व विश्रांती मिळते हा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा स्वानुभव आहे. कारण देव व संत सामर्थ्यवान असतात.आपल्यापेक्षा अधिक असे त्यांच्याकडे असते. यशश्री, ऐश्वर्य, औदार्य, वैराग्य, अभय अशा अनेक गुणांची त्यांच्याकडे रेलचेल असते किंबहुना ते सुखाचे सागर असतात.

वस्तूतः सुखप्राप्तीमागे दुःख व दुःखापाठीमागे सुख ही सारी भगवंताची लीला असते. कृपाळूपणे देव आपल्याला दुःखानंतर सुख देतो. आपले अवगुण आपला अहंकार यामुळे कितीतरी दुःख आपण निर्माण करतो. काही दुःख प्रारब्धाने भोगावे लागतात तर काही आपल्या स्वभावामुळे निर्माण होतात. एकूणच ही गोळा बेरीज पाहिली तर ‘सुख पाहता जवाएवढे दुःख पर्वताएवढे’ हे त्रिकाल बाधित सत्य आहे. हे तुकोबारायांचे वचन प्रमाण ठरते. कारण त्यामागे स्वप्रचिती असते म्हणून संतवचने नुसती ऐकली तरी जीव निश्चिंत होतो.

दया-क्षमा- शांती तेथे देवाची वसती

कलियुगात असे संत म्हणजे वैकुंठीचे राजे असतात. असंख्य दरिद्री जीवांना नृपवंत करतात म्हणून भाग्यवशात असे संत- सद्गुरू लाभले तर त्यांच्या गावाला जावे म्हणजे भेटावे, त्यांना आपली सुखदुःख सांगावीत जेणेकरून आपल्याला शांती, समाधान, आनंद, तृप्ती याचा अल्पांशाने का होईना पण लाभ होईल.
गोंदवले येथे ‘ब्रह्मचैतन्य’ आहेत.

काही नाही त्यांचे घरी I
पण कुबेर लाळे दारी II
तो वाटेल तेव करी I
ऐसा नाही पाहिला II

म्हणजेच ते देवासमान समर्थ आहेत व आपण त्यांचा हात धरला तर ते कधीही सोडणार नाहीत हे निश्चित आहे. मग आपोआपच आपल्याला लागणार विश्रांती व विसावा म्हणूनच ब्रह्मचैतन्य महाराज हे भगवंतच होत. त्यांच्या चरणाशी जावं व निवांत बसावं.

तव चरकमली मन हो निजू दे I
तव सेवेलागी तनू ही झिजु दे II
ऐसे भावे करुनी प्रार्थना I
पदी मस्तक मी ठेवणार II

असे अनन्यभावाने शरण आलेल्या बेळगावच्या कलावतीआई आपल्याला स्वतःच्या आईसारख्या परमश्रेष्ठ वाटतात किंबहुना अधिक श्रेष्ठ वाटतात. त्या आपल्याला पैलपार नेतील असा विश्वास वाटतो व श्रांतजीव या माऊली चरणी विसावून जातो. माऊलीला एकच करता येते ‘क्षमा’ अशी सर्व जगताची आळंदी येथे राहिलेली ‘ज्ञानेश्वर माऊली’ इथं खरंच सातशे पंचवीस वर्षानंतरही विसावा लाभतो. ‘प्रतिवर्षाची वारी देवा पंढरीसी जावो, तुझिया समचरणांचा प्रेम वाढत की जावो’.
ही समचरणांची प्रेमा दासगुणमहाराजांनी स्वतः अनुभवली होती. त्यामुळे त्या पावनचरणांशी शांतीचा अनुभव आला नाही तर नवलंच.

उदारा जगदाधरा देई मजा असा वर

स्वस्वरूपानसंधानी चित्त नमो निरंतर ही निरंतर साधनेची, निरंतर अभ्यासाचा, निरंतर अभ्यासाची खुण स्वतः अनुभवून साधक विश्वाला मार्गदर्शन करणारे स्वामी स्वरूपानंद म्हणजे शांतीचा साक्षात पुतळा. त्यांच्या पवित्र वास्तव्याने पावसचा परिसरच शांतीने व प्रसन्नतेने व्यापून गेला आहे. तिथे जातात खरंच श्रांत जीव विसावून जातो.

एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा I
हरिकृपे त्याचा नाश आहे II

असे म्हणणारे शांती ब्रह्मा एकनाथ महाराज अखिल विश्वाला सनाथनत्व देतात. ज्यांच्या स्मरणाने ही प्रपंच व परमार्थ एकरूप करण्याची प्रेरणा सर्वसामान्य जीवात निर्माण होते असे रामदास स्वामी असंख्य दासांचे विश्रामाचा विश्राम ठरतात. ‘बोलविता धनी वेगळाची’ असे स्पष्ट कबुली देणारे संतशिरोमणी हे विठ्ठलाचे नि:सीम परमभक्त व लाडके भक्त म्हणून तर आपण या भगवंताची बाळे आहोत हा त्यांचा भाव आहे.

आपण ही या सर्व संतश्रेष्ठींचे लाडके होण्याचा प्रयत्न करूया. त्यांना आवडेल असे आचरण करूया. हात जोडून त्यांना सुखदुःख कथन करूया. ते आपला प्रेमळ अंत:करणाने सांभाळ करतील व सर्व सुखेही प्रदान करतील.

श्रीकृष्ण शरणं मम्….

 

 

 

 

 

भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे
मो. 8412926269

Leave A Reply

Your email address will not be published.