श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

0

लोकशाही विशेष लेख

उद्यापासून अधिक मास आरंभ सुरू होत आहे. या विशेष महिन्याच्या निमित्ताने लोकशाहीच्या वाचक रसिकांसाठी श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या अभंगांचे विश्लेषण प्रसारित करीत आहोत. संतोष श्रेष्ठ श्री तुकोबा यांच्या अमृतवाणीतून निर्माण झालेल्या अभंगांना अनुभवण्याचा हा खास योग. हा सबंध अधिक मास या अमृतगंगेचा अनुभव आपण या माध्यमातून करू शकणार आहात त्याचीही प्रस्तावना…

पुरुषोत्तम मास हा सर्वश्रेष्ठ व अलौकिक असे महत्त्व असणारा अनन्यसाधारण मास आहे. आपला ऐहिक पारत्रिक अभ्युदय व्हावा यासाठी प्रत्येक व्यक्तीचा प्रयत्न चालू असतो. यथाशक्ती यथामती त्यानुसार आचरणही ती व्यक्ती करत असते. त्यास अधिकांस अधिक फल देणारा हा अधिक मास, पुरुषोत्तम मास लोकमानसात अतिशय लोकप्रिय आहे. आतुरतेने त्याच्या आगमनाची वाट पाहिली जाते.

येत्या वर्षात १८ जुलैला अधिक श्रावण महिना येत आहे व त्याची समाप्ती १६ ऑगस्टला होत आहे. दर तीन वर्षांनी हा मास येतो. अधिक मास असा तीन वर्षांनी का येतो? शास्त्रकर्त्यांनी याची निर्मिती का केली? याकडेही थोडं लक्ष द्यावेसे वाटते.

कालचक्राची काही अशी पूर्वकल्पना आपणा सर्वांनाच असते. पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यातूनच दिवस व रात्र निर्माण होतात. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो त्यातून मास निर्माण होतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवतीही फिरते त्यातून वर्ष निर्माण होते. हे सौरवर्ष 365 दिवसांचे असते तर चंद्रवर्ष ३५५ दिवसांचे असते. दरवर्षी त्यात दहा ते अकरा दिवसांचा फरक होतो. सौरवर्ष व चंद्रवर्ष यांचा परस्परमेळ बसावा म्हणून शास्त्रकर्त्यांनी या महिन्याची निर्मिती केली व समतोल साधला. हा अधिक मास किंवा १३ वा मास म्हणून रुढ झाला. या मासात सूर्याचे संक्रमण कोणत्याही राशीतून होत नाही म्हणून या मासाला “मलमास” म्हणून प्रतिपादित केले गेले आहे.

असा हा मलमास लौकिक कार्यासाठी त्याज्य मानला गेला व यासाठी स्वतः श्री महाविष्णुंनी या मासाचे दायित्व स्वतःकडे घेतले म्हणून या मासाला “पुरुषोत्तम मास” असेही नामाभिधान दिले.

या मासात नवीन गृहप्रवेश,वास्तुशांती नवीन वस्तूंची खरेदी, मुंज, बारशे, विवाह अशी मंगलकार्ये व्यर्ज्य मानली जातात व या सर्व शुभकाऱ्यांसाठी लागणारा वेळ, खर्च, श्रम, धन यांचा आपण अंतरंग साधनेसाठी उपयोग करू शकतो.

हिंदू धर्मात प्रत्येक तिथी, मुहूर्त, मास, दिन, नक्षत्र हे महत्त्वाचे मानून कार्यास प्रारंभ होतो. त्यातून आनंद व अभ्युदय यांचाच उत्कर्ष होतो. तसाच हा पुरुषोत्तम मास श्रीकृष्णाची षोडोपचारे पूजा ही अग्रगणी मानून अनेक उपासना, साधना, व्रतवैकल्यही केली जातात. आपल्या मनाला व देहाला वळण लावून संयमाचा बांध घालून शिस्त बहाल करून या मासात काही अनुष्ठाने केली जातात.

यात केवळ फलाहार करणे, एकभुक्त राहणे, जमिनीवर झोपणे, दान करणे, विष्णुसहस्त्रनामाचे पठण करणे, रामरक्षा स्तोत्र पठण करणे अशा अनेक उपासना पद्धतींचा अवलंब करून ३३ अनारसे किंवा बत्तासे पुरोहिताला दान करणे, जावई परमात्मा स्वरूप मानून त्यासाठी दान दिले जाते. दीपदान अतिशय श्रेष्ठ मानले जाते. तप, व्रतवैकल्ये,अनुष्ठान हे सारे “श्रीकृष्ण शरणं मम” या भावनेने केले जाते.

तीर्थास जाणे व स्नान करणे हे अतिव पुण्यप्रद मानले जाते. पहाटे उठून ब्रह्ममुहूर्तावर स्नान केले जाते. अशा वाटेवरून चालता चालता या अधिक मासात आपण एका आगळ्या वेगळ्या पण सर्वश्रेष्ठ अशाच तीर्थाला जाऊया. ज्या इंद्रायणीच्या तीरावर संत शिरोमणी तुकाराम महाराज गाथेच्या रूपात चिरंतन आहेत ती गाथा एक अमृतगंगा आहे. अधिक मासातील प्रत्येक दिवशी त्या गाथेतील एका अभंगात आपण डुबू व सुरुवात करू या. अभंगाचा आस्वाद व अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया व त्या स्नानात तळाशी जे मोती मौलिक सापडतील ते वेचुया. श्रीकृष्ण शरणं मम या भावनेने त्याची लयलूट करूया व आनंदाचे डोही आनंद तरंग अनुभवत आपण पवित्र व पावन होऊया.

एका अभंगाचे चिंतन हे आकाशाएवढे व्यापक आहे. त्यामुळे केवळ मतितार्थ म्हणजे एक तरंग त्याचाच अनुभव घेऊया. कारण हा तरंग सिंधूहून भिन्न असणारा नाही आहे म्हणून हे स्नान करण्यास त्याच्याच शब्दात म्हणूया,
“या या रे अवघे जन I भलते याति नारी नर……”

 

 

 

 

 

भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे
मो. 8412926269

Leave A Reply

Your email address will not be published.