श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

0

अधिकमास विशेष लेख

अभंग- १३

भक्ती ते नमन

भक्ति तें नमन वैराग्य तो त्याग I ज्ञानब्रह्मीं भोग ब्रह्मतनु II१II
देहाच्या निरसनें पाविजे या ठाया I माझी ऐसी काया जंव नव्हे II ध्रु II
उदक अग्नि धान्य जाल्या घडे पाक I एकाविण एक कामा नये II२II
तुका म्हणे मज केले ते चांचणी I बडबडीची वाणी अथवा सत्य II३II

अभंग क्रमांक २१७७

संसदेत चाललेला मंत्रिमंडळाचा शपथविधी दूरदर्शन वर पाहण्याचा योग येतो. तेव्हा लक्षात येते पंतप्रधान किंवा राष्ट्रपती जेव्हा या शपथविधीत सामील होतात. तेव्हा त्यांच्या बोलण्याचा, बसण्याचा, चालण्याचा जो डौल असतो तो इतरांपेक्षा वेगळा असतो. ही साधीच गोष्ट. पण त्या पाठीमागे फार मोठी मेहनत असते. राजकारण म्हणजे डावे- उजवे असतेच. पण कोणतेही पद एखादी व्यक्ती भूषविते. तेव्हा खूप प्रयत्न, सातत्य, चिकाटी, व्यक्तिगत आयुष्याचे समर्पण या साऱ्या असतात. सबकुछ काही सोपे नसते. राजकारण, धर्मकारण, अर्थकारण व अध्यात्म हे सारे विषय निर्विवाद श्रेष्ठ आहेत. स्वतःच्या ठिकाणी काही चमक व धमक असल्याशिवाय येथे यशस्वी होणे अवघड असते. वि. दा. सावरकर, लोकमान्य टिळक, साने गुरुजी, बाबा आमटे, विनोबा भावे, सोनोपंत दांडेकर यासारखी मंडळी निर्माण होतात. संपूर्ण आयुष्याची तिलांजली दिली जाते तेव्हा उत्तुंग कार्य उदयास येते.
भक्तीचा प्रांत तर याला अपवाद कसा असेल. देवाला दोन हात व एक डोके टेकवले की झाले असे इथे होत नाही. सारे संत त्यांचा भक्तीभाव पाहिला, त्यांचे चरित्र अभ्यासले तर लक्षात येतेच. ज्ञानेश्वर माऊलीचे जीवन तर धगधगते अग्नीकुंड. समकालीन मंडळींनी किती त्रास द्यावा व माऊलीने याविरुद्ध एकही शब्द काढू नये ही गोष्ट ते ज्ञानरूप होते व ब्रह्मत्तत्वरूपच होते व त्यांच्या ठिकाणी मी देह हा देहभावच नव्हता. नव्हे त्यांचे पूर्णतः निरसन झाले होते हे सहज लक्षात येते. संत जनाबाई, संत सखुबाई, संत कान्होपात्रा, संत मीराबाई यांचे जीवन ही तावुन- सुलखुन, सर्व परीक्षा देऊन त्या भक्तीच्या प्रांतात अमर झाल्या. ‘भक्ती ते नमन’ मन नाही अशी अवस्था. इतकी त्यांची भक्ती व्यापक व अथांग होती.

स्वतः महाराजांच्या आयुष्यात असा प्रसंग घडला की शिवाजी महाराजांनी त्यांना नजराणा भेटवस्तू दिला तेव्हा ‘आम्हाला त्याचा काय उपयोग?’ असे म्हणून त्यांनी पुन्हा परत केला. हे धगधगीत वैराग्याचे उदाहरण होय. असेच रामकृष्ण परमहंस, एकदा ते झोपेत असताना कोणी त्यांच्या हातात पैसा ठेवला तो नकळत त्यांच्या हातातून घरंगळून पडला इतके दृढतर वैराग्य झोपेतही होते. कनक, कांता, कांचन यांचा त्याग याचे ते स्वतःच मूर्तीमंत उदाहरण होते. गोंदवलेकर महाराजांना दमा होता .नामात तल्लीन होऊन ते दोन अडीच कीर्तन करत नंतर त्यांना दम्याचा त्रास जाणवू लागे. इतके देहभावविवर्जित संत असतात.

स्वयंपाक करायचा असेल तर पाणी लागते, अग्नीही लागतो तसेच धान्याची गरज पडते. केवळ यातील एक वस्तू असेल व एक वस्तू नसेल तर पाकसिद्धी होणारच नाही इतकी समर्पक उपमा देऊन संत तुकाराम महाराज सांगत आहेत, भक्त म्हणवतो, उपासक संबोधतो, स्वतःला ब्रह्मज्ञान झाले असे प्रतिपादतो मग तुझ्या ठिकाणी नम्रता हवी, भक्ती हवी तसेच त्याग हवा, वैराग्य हवे. अहंभाव, देहभाव पूर्णपणे गळून पडलेला हवा. जसा डेरेदार वृक्ष पक्व फळांनी लगडलेला पूर्ण वाकून जातो पण सर्वांनाच त्यापासून आनंद मिळतो तसे व्हायला हवे. यासाठी केवळ काही दिवसांची नव्हे वर्षानुवर्षे साधना व्हावी लागते. नुसते बोलून चालत नाही. वृथा बडबड, चर्चा, विवाद, वितंडवाद, पोकळ पंडित्य या प्रांतात चालत नाही. दोन अधिक दोन बरोबर चार इतके स्वच्छ गणित असते.

एक सदगृहस्थ होते त्यांनी पोपट पाळला होता. त्या पोपटाला त्यांनी सोहम् सोहम् असे म्हणायला शिकविले होते. कोणी यजमान घरी आले तर तो त्याला ते म्हणायला लावत असे. तो सुद्धा लगेच बोले सोहम् सोहम्. अर्थात ही घोकमपट्टी होती एके दिवशी एका मांजराने अचानक पोपट वर झडप टाकली. त्याने टॅहम् टॅहम् करत प्राण सोडला. तात्पर्य हे अंतकाळी नामसाधना, उपासना याचे स्मरण हवे असेल तर आधी आयुष्यभर त्याची तयारी करावी लागते.

संतश्रेष्ठ तुकोबाराय हे अध्यात्मशास्त्रातले डॉक्टरेट मिळवलेले होते म्हणून तर म्हणतात, “तुका म्हणे मज कळो येते चाचणी I बडबडीची वाणी अथवा सत्य I”

“ब्रह्म सत्यं जगत्मिथ्या” हे श्रुती वचन आहे. ज्ञानासारखी पवित्र गोष्ट नाही. ज्ञान म्हणजे ‘आत्मज्ञान’. एक आत्मज्ञान संपादन करणे हाच सत्य संकल्प असू शकतो. या मार्गावरून चालताना पदोपदी सत्याचा आधार घेऊनच मार्गक्रमण होऊ शकते. अलक्ष अशा परमात्म्याकडे लक्ष ठेवून साधना करताना खूप दक्ष रहावे लागते. “पदीहून चळो नये I करावे नाना साधन उपाव I तरीच सापडे सोय अलिप्तपणाची I” असे ज्ञानेश्वर माऊलीही म्हणतात.

अगदी खरे बोलण्यापासून सुरुवात होते. प्रामाणिकपणे आपली संसारातील कर्म करणे तसेच नोकरी धंदा सचोटीने करणे. सद्भावनेने व सप्रेमाने नामस्मरण करणे. सर्व प्राणिमात्रांवर दया करणे. या छोट्या वाटणाऱ्या पण मोठ्या अशा गोष्टी आयुष्यभर करणे म्हणजे साधना होय. “विठ्ठलमात्रा घ्यावी तेणे पथ्य सांभाळावी परधन- परस्त्रीचा अभिलाष धरता येणार नाही. आपल्या स्वहितासाठी आपणच कटिबद्ध राहायला हवे तरच या विठ्ठल भक्तीत आपण खरे उत्तीर्ण होऊ. महाराजांच्या शब्दात सांगायचे तर, *”तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे I येरागबाळाचे काम नोहे I”

श्रीकृष्ण शरणं मम्…..

लेखिका-भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.