श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

0

अधिकमास विशेष लेख

अभंग -१२

सर्व सुखाचे भांडार

चला पंढरीसी जाऊंI
रखुमादेवीवर पाहूं II१II
डोळे निवतील कान I
मनात तेथें समाधान IIध्रुII
संत महंता होतील भेटी I
आनंदे नाचों वाळवंटी II२II
तें तीर्थांचे माहेर I
सर्व सुखाचे भांडार II३II
जन्म नाहीं रे आणिक I
तुका म्हणे माझी भाक II४II

अभंग क्रमांक १७००

आजही सात ते आठ लाख भाविक वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरला विठू माऊलीच्या दर्शनास येतात. ऊन- वारा-पाऊस कधी अनुकूलता तर कधी प्रतिकूलता कोणत्याही परिस्थितीला तोंड देत एक वर्ष नाही वर्षानुवर्षे पंढरीसी येत राहतात. पिढ्यान पिढ्या हा वारीचा प्रवास वडिलांकडून मुलाकडे, मुलाकडून नातवंडाकडे असा संक्रमित होत राहतो.अशी हजारो मंडळी विठूमाऊली साठी वर्षानुवर्षे येत राहणे ही केवळ एक श्रद्धा नाही तर सश्रद्ध असा चमत्कारच आहे.

विठुरायाच्या दर्शनाची ओढ भक्तांच्या मनाची तळमळ, त्यांची श्रद्धा,निष्ठा, प्रेम यामुळे हा सोहळा घडतो. यात लहान-थोर, सुशिक्षित- अशिक्षित, गरीब -श्रीमंत, देशातील- विदेशातील सर्वजण सहभागी होतात. हा सोहळा खरंच तुकोबारायांच्या शब्दात म्हणावे तसा “अनुपम्यच” असतो.

त्रिविध तापात पोळलेला संसारी जीव या वाटेवर चालत गेल्यावर विठूचरणाशी विसावतो समाधान पावतो तो अवघा सुखरूप होऊन जातो व केवळ या जन्मीचे नाही तर जन्मोजन्मीचे दुःख विसरून जातो. म्हणून तर म्हणतात, “पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी” सगळीकडे तिथे निव्वळ आनंदच आनंद आहे. नामाच्या गजरात भीमेचा तीर, आसमंत अगदी गर्जुन जातो. वारकरी मंडळींची स्थिती तर ‘विठ्ठल किती गावा विठ्ठल गती गावा विठ्ठल उभा पहावा विटेवरी’ यासाठी तन- मन झोकून सिद्ध असते. त्यांच्या तृप्तीला, आनंदाला, समाधानाला नुसता पूर आलेला असतो. ‘आनंदे भरीन तिन्ही लोक’ असेच झालेले असते.

तहानलेला जीव जसा पाणी पिल्यावरच शांत व तृप्त होतो. तहानलेल्या जीवाला अन्न देऊन चालत नाही तसेच भुकेल्यावेळी नुसते पाणी देऊन भागत नाही. व्यक्तीची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, शारीरिक स्थिती उत्तम असली तरी त्याला अधिक काही हवे असते ते समाधान, शाश्वत म्हणजे न संपणारा आनंद. तो त्याला त्याच्या माहेरी ‘पंढरीस’ आल्यावरच मिळतो. तिथे सगळ्या वैष्णवांचा खेळ चालू असतो. जात-पात वय या साऱ्या गोष्टी विसरून भक्तगण एकमेकांना लोटांगणी येत असतात. भवसागर तरुन जाण्यासाठी ही सोपी पायवाट शोधून काढली आहे. वस्तूतः भक्ती ही कठीण आहे पण भक्ती सोपानच्या या पायऱ्या हळूहळू चढत गेले तर कळसाचे दर्शत निश्चित होते. जन्मोजन्मीचे पुण्य फळास आले तरच पंढरीत जाण्याची व विठू माऊलीला भेटण्याची इच्छा निर्माण होते.

“काय महिमा वर्णू आता आता सांगू ते किती
कोटी ब्रम्हहत्या रूप पाहता जाती
एकीकडे राही एकीकडे रखुमाई
मयूर पीछे चामरं दळती ठायीच्या ठायी
तुका म्हणे दीप घेऊन उन्मनी शोभा
विटेवरी उभा दिसे लावण्य गाभा

असा हा लावण्याचा गाभा सर्व संतमहंतांना भावला. त्याचे गोड रुप व गोड नाम याचीच मागणी त्यांनी पुन्हा पुन्हा केली. संसारातल्या कोणत्याही गोष्टीची कितीही पूर्तता केली तरी त्या संपतच नाहीत त्यामुळे या विठुरायाच्या समचरणाशी जे सुख लाभले ते अनुभवल्यानंतर आम्हाला अधिक काही नको अशी स्पष्ट कबुली दिली. “तुका म्हणे आता न मागे I आणिक तुझे पायी सुख सर्व आहे I” बाप आणि आई माझे विठ्ठल रखुमाई इथपासून सर्वव्यापी भगवंताला आलिंगन देण्याचे सामर्थ्य जीवाला या समचरणाशीच लाभते. अखंड विठ्ठलभक्तीत जनाबाई, कान्होपात्रा, चोखामेळा, बंका महार, सावता माळी, संत सखुबाई न्हाऊन निघाले. याची साक्ष त्यांची चरित्रे आजही देतात.

हे पंढरीची वारी जन्म मरणाची वारी म्हणजे ये-जा संपवते “माझीया जिवीची आवडी Iपंढरपुरी नेईन गुढी I” असे ज्ञानेश्वर माऊली म्हणते. क्षणाक्षणाला हा नाशिवंत देह काळाच्या आधीन होत असतो त्यामुळे या मर्यादित आयुष्यात संसार व परमार्थ दोन्ही उत्तम संपादन करावयाचे आहे व त्यातच खरा पुरुषार्थही आहे.

“तुका म्हणे करून दावी I त्याचे पाय माझे जीवी I”

हे चॅलेंज आहे. संसार व्यवस्थित करत असताना शुद्ध भावान, सप्रेम भावान नाम घ्यायचे आहे. ध्यान करायचे आहे. भजन करायचं आहे. पंढरीची वारी करायची आहे. क्षणाक्षणाला हिशोब ठेवावा लागतो.”कोण समय येईल कैसा I याचा न कळे भरवसा II” निंदा-स्त्तुती, चर्चा ,वाद-विवाद, उगाचच भटकंती,तीर्थयात्रेसाठी वेळ दवडणे यातून हाती काही लागत नाही. म्हणून तर स्वतःच्याच मनबुद्धीवर अंकुश हवा. नाहीतर आद्य शंकराचार्य म्हणतात,” पुनरपि जननं I पुनरपि मरणं I” असे संसार चक्र चालूच राहते. संत शिरोमणी तुकोबाराय ही म्हणतात,” किती वेळा जन्मा यावे I किती व्हावे फजित I”

आपलं आयुष्य म्हणजे ‘बोलाचीच कढी बोलाचाच भात’ असं असतं. काय करायचं ? किती करायचं? कुठपर्यंत पोहोचायचं ? शिल्लक किती ठेवायचे आहे ? यामध्ये बराच वेळ खर्च होतो. प्रपंचातही विवेक व वैराग्याची गरज असते .”जोडोनिया धन उत्तम व्यवहारे” हेच खरं असतं. तरी एकदा तरी या पंढरीस भेट द्यावीच कारण “जाता पंढरीसी सुख वाटे जीवा” तो राजस सुकुमार मदनाचा पुतळा सकळ सुखाचे उगमस्थान आहे. हा घननीळ सावळा त्याचे श्रीमुख पाहण्यासाठी मी आतुर नाही अधीरच झालोय. ‘जळावेगळी मासोळी तैसा चुका तळमळी’ ही तळमळच भक्ताला, साधकाला सहज पैलपार नेते. म्हणून तर इथे तुकाराम महाराज शपथ पूर्वक सांगत आहेत की या पंढरीच्या वाटे सुखाचेच पाऊले पडतील व पुन्हा या संसारात तू येणार नाहीस.

श्रीकृष्ण शरणम मम् ….

लेखिका-भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.