श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

0

अभंग- १०

सुखे येतो घरा नारायण

नामसंकीर्तन साधन पैं सोपें I
जळतील पापे जन्मांतरे IIध्रु II
न लागती सायास जावें वनांतरा I
सुखें येतो घरा नारायण II १ II
ठायींच बैसोनि करा एकचित्त
आवडी अनंत आळवावा II२II
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
मंत्र हा जपावा सर्वकाळ II३II
याहूनि अनेक नाहीं पै साधन
वहातसें आण विठोबाची II४II
तुका म्हणे सोपें आहे सर्वांहूनि I शहाणा तो धणी घेतो येथें II५II

अभंग क्रमांक २४४८

कलियुगात नामस्मरण हे प्रभावी व सर्वश्रेष्ठ भक्ती मार्गातील साधन आहे. सर्व संतांनी याचा प्रकर्षाने पुनरुच्चार केला आहे. यज्ञ, तप, दान, व्रतवैकल्य हे कष्टसाध्य साधन आहेत. वेळ द्यावा लागतो. अर्थात पैशाचे सहाय्य घ्यावे लागते. पण नामस्मरण हे सोपे साधन आहे. हुकमी एक्का असावा तसेच आहे. कुठेही जायचं नाही. घर-दार, नोकरी-धंदा, नातेवाईक यांचा त्याग करायचा नाही फक्त मुखाने नाम घ्यायचे. ते सद्प्रेमाने सद भावाने, विवेकाने व निष्कामतेने घेत राहायचं. मुखात नाम व हतात काम असे सतत अनुसंधान हवे. हे अवघड काम आहे.

“ठायिचं बैसोनी करा एकचित्त I आवडी अनंत आळवावा II

पण आवड असेल तर हे काम सोपे बनून जाईल. आपले चित्त मात्र नामाच्या ठिकाणी हवे नाहीतर हातातील जपमाळ फिरते व आपले मन ही त्याबरोबर फिरते असे व्हायला नको.

“राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा” हा मंत्र सर्वकाळ जपा असा संत शिरोमणी तुकोबाराय सर्वांना त्यांच्या जीवाच्या जिवलग विठ्ठलाची आण म्हणजे शपथ घेऊन सांगत आहेत. किती ही हमी, किती ही ग्वाही व विश्वास. त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आपण नामाचा छंद घेऊया. प्रथमतः हे लक्षात घेऊ संकटकाळी, बिकटकाळी आपण देवाचा धावा करतोच यातूनच रामराया आपल्याला सखा वाटायला लागतो आपण त्याचे दास बनून जातो.

ही नामाची व्यापकता आपल्याला उत्तम साधक, सदभक्त, सत्पुरुष यांच्या ठायी दिसते. नाम त्यांच्या अंतर्यामी मुरलेले असते.

चालता बोलता न मोडे आसन I न भंगे ते मौन कदाकाळी I

हे मौन म्हणजे अबोला नाही तर त्यांचे नामाचे अनुसंधान, बैठक कधीही ढळत नाही.भगवंताचे नाम किती प्रभावी आहे याबाबत एक दाखला दिला जातो. आपण पडून नाम घेतले तर भगवंत ते बसून ऐकतो .आपण बसून नाम घेतले तर भगवंत पुढे उभे राहून स्वागत करतो. आपण उभे राहून नाम घेतले तर भगवंत प्रत्यक्ष प्रेमाने नाचायला लागतो व आपण प्रभू प्रेमात रंगून नाचायला लागतो. तर देव व भक्त एकच होऊन जातात जसे संतश्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात ना “नाचू कीर्तनाचे रंगी” तेव्हा त्यांची ती स्थिती याहून वेगळी नसते किंवा संत मीराबाई कशा म्हणतात “मेरे तो गिरधर गोपाल दुसरा ना कोई” इथं वृत्तीच कृष्णमय, वृत्तीच राममय होऊन गेलेली.षड्रिपू आपोआप कमी होतात. हा अभ्यास आहे. एक दिवस, एक महिना, एक वर्ष नाही छत्तीस वर्ष धैर्याने व योग्य मार्गाने नामस्मरण करावे लागते तर आपल्यालाही प्रचिती येते, “सुखे येतो घरा नारायण”

जिथे नारायणच प्रत्यक्ष घरी आला आहे तिथं इतर कसली तमा? कल्पतरूचा वृक्ष, अमृताचे घर मग कसली कमतरता असणार ?माता-पिता, बंधू ,सखा सारेच नारायण हा भाव. मग अस्वस्थता, नैराश्य, अपूर्णत्व, चिंता, क्लेश, तळमळ, व्यग्रता हे शब्दच हद्दपार.

सर्व सुखो ल्यालो, सर्व अलंकार यातूनच ही अवस्था तुकोबारायांनी अनुभवली. आनंदनिर्भर झाले. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे आकाश मंडप झाला, पृथ्वी आसन झाली, साधनेने इतकी झेप घेतली. “तु का आकाशाएवढा” ही उक्ती त्यांनी सार्थ करून दाखविली.

समर्थ रामदास स्वामीही म्हणतात, “राम आकाश पाताळी, राम नांदे भूमंडळी” ज्ञानेश्वर माऊलींनीही “एक तत्त्व नाम दृढधरी मनाI हरीशी करुणा येईल तुझी”. “ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद” अशीच भगवंताला साद घातली. “जयाचा जन्म जगी नामार्थ झाला” असे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज स्पष्ट सांगतात. “जयाने सदा वास नामात केला त्याच लीळा चरित्रातील हाच प्रमुख भाग होता स्वरूप स्वामी स्वरूपानंद पावस चे म्हणतात,

” कैची आधी कैची व्याधी
अवघी संपली उपाधी
नित्य निवांत निर्भय
स्वामी झाला राममय”

नामासारख्या सोपे सुलभ वाटणाऱ्या साधनेची ही परिणीती आहे. अर्थात संतकृपा, सद्पुरुष आशीर्वाद व आपली पुण्याई, आपली प्रामाणिक कर्तव्ये यानेच हे घडते.

आता थोडंसं शहाणपण आपणही संपादन करूया. नाहीतरी संसारात अनेक परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आपण सचोटीने, शहाणपणानेच प्रयत्न करतो. संत तुकोबारायांचे सांगणे ऐकू या व म्हणायला सुरुवात करूया ‘राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा’

श्रीकृष्ण शरणं मम् ….

लेखिका -भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.