मनपा प्रशासकांची शहर विकासात कसोटी

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

१७ सप्टेंबर २०२३ रोजी जळगाव शहर महापालिकेतील लोकनियुक्त प्रतिनिधींचा कार्यकाळ संपला आणि १८ सप्टेंबर पासून आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी प्रशासक पदाची सूत्रे हाती घेतली. गेल्या पाच वर्षाच्या लोकनियुक्त प्रतिनिधींच्या कार्यकाळात जळगाव शहराच्या विकासाचे तीन तेरा झाले आहेत. त्याला विविध कारणे कारणीभूत आहेत. अडीच वर्षे महानगर पालिकेत निर्विवादपणे भाजपची सत्ता होती. ७५ पैकी भाजपचे ५७ नगरसेवक असे पाशवी बहुमत होते. जवळजवळ एक वर्षभर राज्यात भाजपची सत्ता होती. केंद्रात सुद्धा भाजपचेच सरकार होते. जळगाव शहराचे आमदार सुद्धा भाजपचेच होते. शहराचा जलद गतीने विकास करणे सुखकर आणि सोयीचे व्हावे म्हणून आमदार राजू मामा भोळे यांनी धर्मपत्नी सीमा भोळे यांना महापौर करण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आग्रह करून बहुसंख्य नगरसेवकांचा सौ. सीमा भोळे यांना विरोध असताना, तो विरोध डावलून गिरीश महाजन यांनी आमदार राजू मामा भोळे यांचे म्हणणे मान्य केले. शहराचे आमदार आणि महापौर हे एकाच घरातले असल्याने या डबल इंजिनचा शहर विकासात फायदा होईल या आशेने गिरीश महाजन यांनी महापौर करण्याचा निर्णय घेतला. एका वर्षभरात शहराच्या विकास झाला नाही, तर जळगाव शहर आमदारकीच्या निवडणुकीत मी मते मागायला तुमच्याकडे येणार नाही, असे आश्वासन मनपा निवडणुकीत गिरीश महाजन यांनी दिले होते. परंतु भाजप शिवसेनेच्या युतीमुळे राजू मामा भोळे विजयी झाले असले, तरी गिरीश महाजन यांनी दिलेली दिलेले आश्वासन पाळू शकले नव्हते. ही खंत त्यांच्या मनात होती. जळगाव शहर विकासात डबल इंजिनचा फायदा होईल, ही अपेक्षा खोल ठरली. आमदार राजू मामा भोळे आणि महापौर सीमा भोळे यांच्या कारभाराबाबतीत बहुसंख्य नगरसेवकांनी उघड उघडणाराजी व्यक्त केली. विकास कामांऐवजी टक्केवारी वसुलीची जोरदार चर्चा सुरू झाली. भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडे नगरसेवकांच्या तक्रारींचा पाढा वाचला जाऊ लागला. परिणामी गिरीश महाजन यांनी सौ. सीमा भोळे यांची महापौर पदाची अडीच वर्षाची कारकीर्द संपण्याआधीच त्यांना महापौर पदावरून पाय उतार केले, आणि नव्या महापौर म्हणून सौ. भारती सोनवणे यांची उर्वरित कालावधीसाठी महापौर पदी निवड केली. सौ. भारती सोनवणे यांच्या काळात मनपाच्या कारभाराला गतिमानता आली जनतेच्या तक्रारीकडे लक्ष दिले जाऊ लागले. परंतु सौ भारती सोनवणे यांच्या महापौरपदी कारकीर्द संपल्यावर आगामी अडीच वर्षासाठी नव्या महापौरांची निवड होण्याआधीच भाजप नगरसेवकांनी बंड करून शिवसेनेशी हात मिळवणे करून सेनेचा महापौर म्हणून जयश्री महाजन आणि फुटीर भाजप गटाचे कुलभूषण पाटील यांची उपमहापौर पदी निवड झाली. परंतु एक वर्षभरातच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वात सरकार डगमगले, आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार अस्तित्वात आल्याने महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर पक्षावर पक्षांतर करण्याचा दबाव येऊ लागला. त्या दबावाला ते बळी पडले नसले तरी परिणामी शासनातर्फे मिळणाऱ्या विकास निधीला आडकाठी लागली. सहकार्य मिळेनासे झाले. जळगाव शहरातील रस्त्यांची चाळणी झाली होती. ते रस्ते करण्यासाठी अनेक अडथळे निर्माण झाले. दरम्यान पावसाळा आला. त्यानंतर लोकप्रतिनिधींची सत्ता संपली…

शहरातील बहुतेक रस्त्यांच्या कामांचे कार्यादेश निघालेले आहेत. आता लोकनियुक्त नगरसेवक मनपात नाहीत. प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांचे समोर आता विकास कामाचे फार मोठे आव्हान आहे. शहरातील रस्त्यांची दर्जेदार कामे करण्याची जबाबदारी आता फक्त प्रशासक विद्या गायकवाड यांची आहे. आगामी २०२४ मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील रस्त्यांची कामे झपाट्याने होणे भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. जळगाव शहरातील इतर नागरी सुविधा, जसे पिण्याचे पाणी, स्वच्छता, गटारींची सोय, विजेचा पुरवठा तसेच जळगाव शहरातील वाढते अतिक्रमण याला आळा घालून समस्यामुक्त जळगाव शहर करण्याची खरी कसोटी प्रशासकांची आहे. कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे मनपा प्रशासन गतिमान करून सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी आणि कर्मचारी यांचेत सुसूत्रता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. सध्या अधिकारी राज असल्याने एक एका डिपार्टमेंटचे अधिकारी दुसऱ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांकडे बोट दाखवून कामे करण्यात चालढकल करण्यात येत असल्याचा नागरिकांना अनुभव येत आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.