वेळेचे व्यवस्थापन

0

लोकशाही विशेष लेख

वेळ ही सर्वाना समान पद्धतीत मिळालेली एकमेव अशी गोष्ट आहे जी वापरली तरच उपयोग होतो. अन्यथा काळाच्या गतीचक्रात ती निघून जाते. मग सामान्यपणे असे म्हटले जाते की हे करायचे होते… ते करायचे होते… पण वेळच नाही म्हणून वेळेचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. प्रत्येकाकडे वेळेचा कोटा सारखाच असतो, मात्र त्याचा योग्य वापर करता येणे हे प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळे असते. कारण प्रत्येकाचे त्यासाठी लागणारे “वेळ कौशल्य” हे वेगळे असते. पण वेळेच्या योग्य व्यवस्थापनासाठी योग्य नियोजन, इच्छाशक्ती, ज्या कामासाठी वेळ वापरायचा त्यासाठी आवश्यक कौशल्ये, शारीरिक व मानसिक स्थिती या प्रमुख घटकांवर भर देणे किंवा लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते..

आलेल्या संधीचे सोने कार्याचे असल्यास वेळ गमावून चालणार नाही, तर तत्परतेने त्यासाठी योग्य ती पाऊले उचलावी लागतील. हे कळणे म्हणजे समयसूचकता व तात्पतेने केलेली कृती. म्हणजे काळानुरूप कृतिशीलता ही दोन सूत्रे जरी आचरणात आणली, तरी वेळेचे व्यवस्थापन बऱ्याच अंशी करता येईल. पण त्यासाठी आपली सर्वार्थाने इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. कधी आपली इच्छा किंवा मनस्थिती असते, तर कधी नसते.. कधी प्रसन्नता असते, तर कधी उदासीनता असते.. हे मनाचे चक्र सारखे फिरतच राहणार, पण त्यापुढेही जाऊन कायमच वेळ कशी उपयोगात आणली जाऊ शकते याचाच ध्यास घेणे व त्या प्रमाणे कृती करणे म्हणजे यशस्वितेकडे वाटचाल करणे होय..

म्हणून ‘वेळेचा आदर करा व यशस्वी व्हा’, हे लक्षात ठेवावे. अन्यथा वेळ कोणासाठीही थांबत नाही. ती निघून जाते. व गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून आजच वेळेचा सदुपयोग करणे, हे केव्हाही हितकारकच आहे.. प्रत्येक बाबीचे किंवा कामाचे वेळापत्रक बनवणे व त्याप्रमाणे ते काम पार पडणे हे वेळेच्या व भविष्याच्या दृष्टीनेही महत्वाचे आहे. म्हणून वेळेचे नियोजन असणे हे केव्हाही अधिकच चांगले असते..

प्रा नितीन मटकरी
जळगाव
९३२६७७८३२९

Leave A Reply

Your email address will not be published.