प्रवाश्यांकडून अधिकचे भाडे आकारणी न‌ करण्याचे परिवहन विभागाचे आवाहन

...अन्यथा ट्रॅव्हल्स कंपनी मालकांवर होणार कारवाई

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खासगी वाहतूकदारांनी प्रवाशांकडून निर्धारित केलेल्या भाड्यापेक्षा अधिक भाडे आकारणी करू नये. भाडे आकारणी बाबतचा तक्ता प्रत्येक ट्रॅव्हल्स कार्यालयाच्या बाहेर लावण्यात यावा.‌ असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.

खाजगी प्रवासी बसेसची सेवा पुरविणारे वाहतूकदारांनी संबंधित मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने वाहतूक सेवेकरीता आकारण्यात येणाऱ्या भाड्याच्या कमाल दीडपट पर्यंत भाडे आकारता येईल. त्यापेक्षा अधिक भाडे आकारणी करणाऱ्या खासगी बसेसवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश मोटार वाहन निरीक्षक यांना देण्यात आलेले आहेत.

जळगाव शहरातील खासगी बसेस या पुणे, मुंबई, नागपूर, सुरत, अहमदाबाद या ठिकाणी ये-जा करीत असतात. या कार्यालयाद्वारे खासगी ट्रॅव्हल्स मालकांना प्रवाशांकडून किती भाडे आकारावे. याबाबतचा तक्ता तयार करुन प्रवाशांच्या सोयीकरीता प्रत्येक खासगी ट्रॅव्हल्स कंपनी कार्यालयात फलक माहिती लावणेबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

अधिक भाडे आकारल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा आढळून आल्यास अशा वाहतूक पुरवठादारांवर मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांतर्गत खटला दाखल करण्यात येणार आहे,  असा इशारा‌ही  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.लोही यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.