कडक चहाचा मसाला बनवा घरच्या घरी

0

खाद्यसंस्कृती विशेष

थंडीचा पारा वाढू लागला ना.. अशा थंडीमध्ये सकाळी सकाळी उठल्यावर मस्त वाफाळलेला कडक चहा आल्हाददायक वाटतो. चहाच कढण जरी घरात ठेवलं तरी त्याचा घरभर दरवळ पसरलेला असतो आणि इथूनच आपली सर्वांची पहाट आणि दिवस सुरू होतो. आतापर्यंत तुम्ही नेहमीप्रमाणे चहा करता तसाच चहाचा आस्वाद घेतला असाल. पण मी तुम्हाला घरीच भन्नाट अशा चहाचा मसाला देणार आहे. कारण थंडी सुरू झाली की आपल्याला सर्दी, पडसं, खोकला, ताप असे आजार सुरु होतात आणि हा मसाला चहा तुम्ही घरीच बनवून रोज घ्याल तर आजारपण तर‌ जवळ येणारच नाही आणि एक ऊर्जा तुम्हाला मिळत जाईल. घ्या तर ‘मसाला चहा’ ची पद्धत लिहून.

चहा मसाला 

 

साहित्य:

३½” दालचिनी, १ मसाला वेलची, ३५ ते ४० हिरवी वेलची, १ जावेत्री, १ जायफळ, १ चक्रीफूल, १ चमचा काळीमीरी, १ चमचा लवंग, एक छोटी जुडी सुकलेली गवती चहाची पाने, ५० ग्रॅम सुंठ, ३ चमचे बडीशेप.

 

कृती: 

१) प्रथम गरम पॅनमध्ये मंद आचेवर गवती चहा सोडून बाकी सर्व मसाले ३ मिनिटे भाजून घ्या.

२)  त्यानंतर यात गवती चहा घालून हलका परतावा. (गवती चहा फक्त शेक लागे पर्यंत भाजावा)

३) आता सर्व मसाले खलबत्त्यात कुटून घ्यावे आणि नंतर मिक्सरला बारीक वाटून घ्यावे.

४) तयार मसाला हवाबंद बरणीत भरून ठेवावा. हा मसाला ५ महिने आरामात टिकतो.

५) चहा बनवताना थोडी तुळस पाने सुद्धा धुवून टाकल्यास अजून छान चव येईल.

(मार्केटमध्ये मिळणाऱ्या चहा मसालापेक्षा घरगुती चहा मसाला सर्वात उत्तम)

 

– अपर्णा स्वप्निल कांबळे – नांगरे

पत्रकार/फुड ब्लॉगर

 

९८९२१३८१३२

Leave A Reply

Your email address will not be published.