लोकशाही न्यूज नेटवर्क
मागील दोन आठवड्यांपासून देशाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या तामिळनाडूमध्ये पावसानं थैमान घातले असून, हे चित्र नव्या आठवड्याच्या सुरुवातीलासुद्धा कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. किंबहुना तामिळनाडूला पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट जर करण्यात आला आहे. कन्याकुमारी, तिरुन्नेलवेल्ली, थूथकुडी आणि तेनकसी या जिल्यांसाठी हा इशारा लागू असेल. इथं महाराष्ट्रात मात्र दक्षिणेकडील हवामानापेक्षा जास्त प्रभाव उत्तरेकडी शीतलहरींचाच असल्याचं पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या या शीतलहरींचा परिणाम राज्यातील तापमानावर होताना दिसत आहे. निफाडमध्ये थंडी वाढली असून, ११.३ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पुढच्या दोन दिवसांत निफाडसह राज्याच्या विदर्भ पट्ट्यामध्ये थंडीचा तडाखा वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
विदर्भात बहुतांश जिल्ह्यांतील किमान तापमान 14 अंशांवर पोहोचेल. तर, उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढणार आहे. दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्र मात्र या थंडीच्या वातावरणाला अपवाद ठरत असून, इथं तूर्तास किमान तापमानात कोणतीही घट होण्याची चिन्हं नसल्याची बाब समोर येत आहे.