वैचारिकता बदलली तर लवकर विकास साधता येईल : आमदार भोळे

जळगावातील युवक बाहेर जाता कामा नये, त्यांच्यासाठी जळगाव हीच जन्मभूमी आणि कर्मभूमी राहावी अशी अपेक्षा : माजी महापौर जयश्री महाजन

0

 

माझ्या स्वप्नातील जळगाव

 

शहरातील नागरिकांनी आपल्या वैचारिकतेत बदल केला आणि त्या दृष्टीने प्रयत्न केले तर अधिक लवकर विकास साधला जाईल. कारण प्रत्येकाचे विचार हे सकारात्मक आणि नकारात्मक या दोन गोष्टींवर अवलंबून असतात. जर माझ्या दारात आता साप आला तर मी त्याला कदाचित घाबरून मारेल किंवा पकडून दूर सोडून येईल. पण तोच साप जर मला नागपंचमीच्या दिवशी दिसला, तर मात्र मी त्याची पूजा करण्यासाठी पुढे सरसावेळ. अशी ही दुहेरी भूमिका आपण आपल्या परिस्थितीनुसार घेत असतो. त्यामुळे सकारात्मक विचार ठेवून जर नागरिकांनी विचार प्रयत्न केले तर लवकरात लवकर विकास साधला जाईल. प्रशासन त्यांच्या परीने काम करेल मात्र मी सुद्धा एक नागरिक म्हणून माझ्या कामातून किमान दहा टक्के योगदान हे समाजासाठी, माझ्या शहरासाठी आणि पुढे जाऊन राष्ट्रासाठी दिले तर विकास साध्य व्हायला वेळ लागणार नाही, अशी भूमिका जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांनी लोकशाहीच्या कार्यालयात व्यक्त केली. ते आरतीसाठी सायंकाळी उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार राजू मामा भोळे म्हणाले, स्वप्नातल्या जळगाव साध्य करण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. माझं शहर स्वच्छ, सुंदर कसं राहील यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. एक नागरिक म्हणून शिक्षण, आरोग्य मिळावं ही प्रत्येकाची अपेक्षा असते. मात्र आपल्याला देखील त्या दृष्टीने छोटी का असेना, मात्र पावले उचलावी लागतील. हे देखील नागरिकांनी लक्षात घ्यावे. बदलाची सुरुवात ही स्वतःपासून झाली तर लवकर यश साध्य होईल.

मी एक आमदार म्हणून माझी भूमिका मांडत असतो. मात्र एक सामान्य नागरिक म्हणून देखील मी तन-मन-धनाने स्वप्नातलं जळगाव साध्य करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या पावसाळ्यात वृक्ष लागवड करण्याचा प्रयत्न करून आपण आपलं जळगाव हिरवगार करण्याचा प्रयत्न करू. यातून प्रत्येकाला सकारात्मक असा परिणाम पाहायला मिळाला, तरच स्वप्नातला जळगाव साध्य होईल, असे ते म्हणाले.

जळगावच्या माजी महापौर जयश्री महाजन यांनी देखील स्वप्नातील जळगाव या विषयावर आपलं मत व्यक्त केलं. त्या म्हणाल्या स्वप्नातील जळगाव ही संकल्पना विचारात घेतली तर माझं शहर स्वच्छ, सुंदर, हिरवगार अशीच संकल्पना डोळ्यासमोर येते. यासाठी नागरिकांनी देखील हातभार लावणे गरजेचे आहे.

प्रत्येक नागरिकाने आपल्या घरातील कचरा घंटागाडीतच टाकावा आवश्यक त्या ठिकाणी झाडे लावावी यातून आपण आपलं व्यक्तिगत योगदान देऊन शहराच्या सौंदर्यात भर पाडू शकतो. मी समाजाचं काहीतरी देणं लागतो. ही भूमिका प्रत्येकाने जपायला हवी.  स्वप्नातलं जळगाव साध्य करण्यासाठी जळगाव शहरात नवनवीन उद्योग, नवे प्रकल्प यायला हवेत. ज्यामुळे शहरातील युवक हे नोकरीसाठी बाहेर न जाता त्यांना शहरातच आपली भूमिका बजावता येईल. जर तसं झालं तर युवकांसाठी जन्मभूमी आणि कर्मभूमी एकच राहील या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत.

मी देखील माझ्या शैक्षणिक क्षेत्रातून व्यक्तिगत योगदान देणार आहे. गरजूंना वैद्यकीय मदत त्यांची शिक्षणातील आर्थिक कमकुवतता दूर करण्यासाठी प्रयत्न करेन. युवा पिढीला स्थिर करण्यासाठी मी माझ्या व्यक्तिगत माध्यमातून प्रयत्न करेल. आम्ही आमच्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून सातत्याने या दृष्टीने प्रयत्न आधीपासून करत आहोत. मात्र स्वप्नातील जळगाव साध्य करण्यासाठी हे प्रयत्न आम्ही वाढवू, अशी भूमिका जयश्री महाजन यांनी घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.