देवा पुन्हा लहानपण दे, ते दिवस पुन्हा येणे नाही : आ. राजू मामा भोळे

गेल्या वर्षी महापालिकेत तुरटी पासून बनवलेल्या पर्यावरण पूरक गणरायाची स्थापना माझ्यासाठी अविस्मरणीय : माजी महापौर जयश्री महाजन

0

 

माझ्या आठवणीतला गणेशोत्सव

 

सुरेश दामू भोळे (राजूमामा भोळे), आमदार, जळगाव

जयश्री महाजन, माजी महापौर, जळगाव

 

शब्दांकन : राहुल पवार

 

 

लहानपणी गणपती बसवण्याचा आनंद हा अत्यंत अविस्मरणीय असा होता. लहानपणी खाऊसाठी मिळालेल्या पैशाने खाऊ न घेतात ते पैसे जमवून आम्ही गणपतीचं डेकोरेशन करण्यासाठी प्रयत्न करायचो. आम्ही लहानपणी एक गोणपाट मातीच्या पाण्यात भिजवून त्याला माठावर काड्यांच्या साह्याने उभं करायचो. त्यावर बाजूला गहू टाकून शेतीसारखं वातावरण निर्माण करायचो. ते दिवस फार विलक्षण असे होते, ते पुन्हा येणार नाही. त्यामुळे बालपणीचा गणेशोत्सव हा अविस्मरणीय असा आहे. त्यामुळे देवाला पुन्हा लहानपण दे देवा, अशी मागणी करावीशी वाटते, अशी आठवण जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा भोळे) यांनी सांगितली.

ते श्री गणरायाच्या सायंकाळच्या आरतीसाठी लोकशाहीच्या कार्यालयात उपस्थित होते. दैनिक लोकशाहीच्या कार्यालयात दरवर्षीप्रमाणे शहरातील उच्चपदस्थ व्यक्तींच्या हातून श्री गणरायाची सायंकाळची आरती करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये काल आरतीला त्यांच्यासह माजी महापौर जयश्री महाजन, सार्वजनिक गणेश गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे सपत्नीक उपस्थित होते.

आठवणीतला गणपती याबद्दल आपले विचार कथन करताना आमदार भोळे पुढे म्हणाले, गणरायाच्या आगमनाने एक फार मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण होते. गणरायाच्या आगमनाने सर्व विघ्न दूर होतात. मात्र फक्त गणपती उत्सव आनंदाने मनवावा एवढाच त्यामागचा उद्देश नाही. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यापूर्वी समाजाच्या ऐक्यासाठी गणेशोत्सव सार्वजनिक रित्या साजरी करण्याची प्रथा पाडली. यातून समाजाला एकत्रित करत स्वातंत्र्यासाठी त्यांच्या विचारांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले गेले. गणपतीही बुद्धीची देवता आहे. त्याचप्रमाणे गणपतीही आदर्श देवता देखील आहे. आपण हा विचार करायला हवा की आधी नमन गणरायालाच का, कारण गणरायाने एक आदर्श घालून दिला आहे. सर्वप्रथम विश्वाला प्रदक्षिणा घालण्यापूर्वी आई-वडिलांना प्रदक्षिणा घातल्या यातून आई-वडिलांप्रती आदर व्यक्त करण्याची भावना गणरायामुळे रुजू झाली. समाजातील सर्वांनीच आपल्या आई-वडिलांचा आदर करायला हवा, त्यांचं सांगितलेलं ऐकायला हवं. यातूनच सांस्कृतिकता अधिक बहरेल आणि गणेशोत्सवाचा उद्देश साध्य होईल.

यावेळी लोकशाहीच्या कार्यालयात श्री गणरायाच्या आरतीसाठी माजी महापौर व नुकत्याच आपल्या कार्यकाळातून नियुक्त झालेल्या माजी महापौर जयश्री महाजन यादेखील उपस्थित होत्या. त्यांनी आठवणीतील गणपती या विषयावर आपले विचार कथन करताना सांगितले, माझा लहानपणापासूनच गणेशोत्सव आनंदातच झाला आहे. मात्र गेल्या वर्षी म्हणजे सन 2022 मध्ये मी महापौर पदी विराजमान झाल्यावर महानगरपालिकेमध्ये सर्वप्रथम प्रदूषणमुक्त असा तुरटी पासून बनवलेल्या गणरायाची स्थापना माझ्या व माझे पती सुनिल महाजन यांच्या हस्ते करण्यात आली. या मानाच्या गणरायाची स्थापना करण्याचा मान आम्हा दोघांना मिळाला. हा माझ्यासाठी अत्यंत अविस्मरणीय असा क्षण आहे. मी आजवर शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असताना आमच्या संस्थांच्या माध्यमातून तिथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सोबत गणेशोत्सव साजरा केला आहे. मात्र महापालिकेतील हा अनुभव माझ्यासाठी अत्यंत वेगळा असा होता. यावेळी लेझीम खेळत मोठ्या उत्साहाने मी व माझे पती सुनील महाजन यांनी पर्यावरण पूरक गणरायाची स्थापना करण्याचा घेतलेला अनुभव विलक्षण असा होता.

Leave A Reply

Your email address will not be published.