न्यायमूर्ती चंद्रचूड देशाचे पुढील सरन्यायाधीश होणार

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश (Chief Justice of the Supreme Court) यु. यु. ललित (Uday Umesh Lalit) यांनी आज सकाळी न्यायाधीशांची बैठक बोलावली होती. या बैठकीत ललित यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सरन्यायाधीशपदी न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (DY Chandrachud) यांच्या नावाची घोषणा केली आहे. न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे 50 वे सरन्यायाधीश असतील. त्यांच्या नावाची शिफारस सरकारकडे करण्यात आली आहे.

देशाचे सरन्यायाधीश यूयू ललित आपला उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस करणार आहेत. आज ते न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांना एक पत्र सुपूर्द करतील.ज्यामध्ये त्यांना देशाचे पुढील सरन्यायाधीश बनवण्याबाबत माहिती देण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या अन्य न्यायाधीशांच्या उपस्थितीत त्यांना हे पत्र सुपूर्द करण्यात येणार आहे. याशिवाय न्यायमूर्ती यूयू ललितही याच प्रकरणात कायदा मंत्रालयाला पत्र लिहून न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस करणार आहेत. विधी आयोगाने CJI यांना त्यांच्या उत्तराधिकारीच्या नावाची शिफारस करण्यास सांगितले होते. न्यायमूर्ती यूयू ललित 8 नोव्हेंबरला सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होत आहेत.

कोण आहेत न्या. चंद्रचूड?

न्या. चंद्रचूड यांचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. ते एका मराठी कुटुंबात जन्मले त्यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड हे भारताचे सरन्यायाधीश होते. आई प्रभा चंद्रचूड या शास्त्रीय गायिका आहेत. धनंजय चंद्रचूड यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले आहे. त्यानंतर ते नवी दिल्लीतही शिकत होते. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी गणित आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी घेतल्यानंतर याच विद्यापीठातून ते LLB झाले. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून LLM ही पदवी मिळवली. तसंच त्यांना हार्वर्ड विद्यापीठाने न्यायशास्त्र विषयाचा जोसेफ बेले पुरस्कार देऊन गौरवले. न्यायशास्त्र या विषयात त्यांनी पीएचडीही केली.

बॉम्बे हायकोर्टात वकिली करत असताना चंद्रचूड यांनी रिझर्व्ह बँक, ONGC, अनेक केंद्रीय आस्थापना, मुंबई विद्यापीठ यांच्यासह अनेक महत्त्वाच्या संस्थांची बाजू मांडली. मार्च 2000 मध्ये बॉम्बे हायकोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ऑक्टोबर 2013 ते अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती झाले. मे 2016 ला ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.