नव्या नवरीची सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

हिंगोली;  सासरी होणारा छळ व लग्नाला न पाठवल्यामुळे तालुक्यातील मौजा येथे अंगावरील हळद वाळण्यापूर्वीच सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा सासरच्या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

कळमनुरी येथील इंदिरानगर भागातील पल्लवी कऱ्हाळे (वय19) या तरुणीचा विवाह दि. 25 मार्च रोजी हिंगोली तालुक्यातील मौजा येथील नागोराव टारफे यांच्यासोबत झाला होता. विवाहानंतर सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या पल्लवीला अवघ्या दहा दिवसांतच सासरच्या छळाला सामोरे जावे लागले.

तुला स्वयंपाक येत नाही आम्ही मुलाचे दुसरीकडे लग्न केले असते तर हुंडा जास्त मिळाला असता. त्यामुळे आता तुझ्या माहेर वरून फ्रिज, शिलाई मशीन घेऊन येण्याचा तगादा सासरच्या लोकांनी लावला.

अवघ्या दहा दिवसांतच सुरु झालेल्या छळाची माहिती पल्लवीने माहेरी दिली होती. मात्र माहेरची आर्थिक परिस्‍थिती बेताची असल्याने व काही दिवसांपूर्वीच लग्नाचा खर्च झाल्यामुळे पल्लवीच्या सासरच्या मंडळींची मागणी मुलीच्या कुटुंबियांना पूर्ण करता आली नाही.

पल्लवीच्या माहेरी विवाह सोहळा असल्यामुळे तिचा चुलत भाऊ तिला घेण्यासाठी मौजा येथे गेला होता. मात्र तिच्या सासरच्या मंडळींनी तिला पाठवले नाही. सासरी होणारा छळ व लग्नाला न पाठवल्यामुळे पल्लवीने घरी कोणी नसताना बुधवारी त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी पल्लवीची आई सुनीता केशव कऱ्हाळे यांनी बासंबा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून नामदेव किसन टारफे, किसन टारफे, निर्मलाबाई टारफे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, उपनिरीक्षक सुरेश भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मगन पवार यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.