यशस्वी होण्यासाठी बाबासाहेबांच्या जीवनमुल्यांचा अंगीकार करावा: जिल्हाधिकारी अभिजित राऊत

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती जिल्हा नियोजन भवन जळगाव येथे आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमात समाज कल्याण विभागाच्या विविध योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास महाविद्यालयीन विद्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचारांचा व जीवनमुल्यांचा अंगीकार करावा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले. राकेश पाटील, उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, यांनी वैधता प्रमाणपत्र समितीच्या कामकाजाच्या बदलेल्या स्वरुपाबददल माहिती दिली. प्रा. शमिबा पाटील, सदस्य, नाशिक विभागीय तृतीयपंथीय कल्याण व हक्क समिती यांनी बाबासाहेबांच्या कार्याबाबत विचार व्यक्त करुन तृतीयपंथीयांना त्यांचे हक्क मिळण्यासाठी सर्व समाज घटकांकडून सहकार्यांची अपेक्षा व्यक्त केली.

प्रा. संजीव सोनवणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान दिले. मुलींचे शासकीय वसतीगृह जळगाव येथील विद्यार्थीनींनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील काही प्रसंग पथनाटयाव्दारे सादर केले. या कार्यक्रमास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत तसेच धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनोद ढगे यांनी तर आभार प्रदर्शन आर. डी. पवार वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.