मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
आज शेअर बाजार चांगलाच तेजीत होता. BSE सेन्सेक्स 493 अंकांच्या वाढीसह 67481 च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 134 अंकांपेक्षा जास्त वाढीसह 20,268 च्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टीने प्रथमच 20269 च्या पातळीला स्पर्श केला. आज सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 17 शेअर्स वाढीसह आणि 13 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 31 शेअर्स वाढले तर 19 शेअर्समध्ये घसरण झाली.
तेजीमागे घटक
जागतिक सकारात्मक संकेत, सप्टेंबर तिमाहीत भारताची अपेक्षेपेक्षा चांगली 7.6 टक्के जीडीपी वाढ आणि पाच राज्यांतील निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराने उच्चांक गाठला. विशेष म्हणजे सलग चौथ्या सत्रात बाजार वधारला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स 500 हून अधिक अंकांनी वाढून 67,499 वर पोहोचला. तर निफ्टी 50 ने नवीन विक्रमी उच्चांक नोंदवत 142 अंकांच्या वाढीसह 20, 270 च्या वर झेप घेतली. त्यानंतर सेन्सेक्स 492 अंकांनी वाढून 67,481 वर बंद झाला. तर निफ्टी 134 अंकांनी वाढून 20, 267 वर स्थिरावला.
ऑटो वगळता इतर क्षेत्रीय निर्देशांकांनी हिरव्या रंगात व्यवहार केला. कॅपिटल गुड्स, एफएमसीजी, मेटल, पॉवर आणि रियल्टी प्रत्येकी 1 टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप निर्देशांक 1 टक्के तर स्मॉलकॅप निर्देशांक 0.4 टक्क्यांनी वाढला.