ST बस रस्त्यावर ! पण गाव खेड्यापासून लांब..

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे बंद असलेली एसटी आता हळूहळू रुळावर येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संपकरी एसटी कर्मचारी आता कामावर रुजू होत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस एसटी पूर्ण क्षमतेने धावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परंतु ग्रामीण प्रवाशांची नाळ जुळलेल्या एसटीच्या एक-दोन फेऱ्या वगळता अनेक गाव खेड्यात ‘लालपरी’ पोह्चलीच नसल्याने आणखी काही दिवस ग्रामीण प्रवाशांना ‘लालपरी’ची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर कामबंद आंदोलन चालू केले होते. या काळात अनेक कर्मचाऱ्यांवर एसटी प्रशासनाकडून निलंबन, बडतर्फ, बदलीच्या कारवाया करण्यात आल्या. कारवाई होत असल्याचे पाहून अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपवली होती. आपल्यावरही कारवाई होऊ नये यासाठी काही संपकरी कर्मचारी संपातून बाहेर निघून कामावर रुजू झाले होते.

यादरम्यान अनेक वेळा प्रशासनाकडून संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचा ‘अल्टिमेट’ देण्यात आला. परंतु, प्रकरण न्यायालयात चालू असल्याने संपकरी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम होते. याकाळात एसटीला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटकाही सहन करावा लागला. शेवटी मुंबई उच्च न्यायालयानेच संपकऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचा आदेश दिला. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची कामवार रुजू करून घेण्यासाठी धावपळ झाली. कर्मचारी कामावर रुजू होत असल्याने आगारातील एसटींचीही संख्या वाढत गेली.

अनेक ठिकाणी एसटीच्या फेऱ्याही पूर्ण क्षमतेने चालू झाल्या. परंतु ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी अजून लालपरी पोहचलीच नसल्याने एसटीशी नाळ जुळलेल्या ग्रामीण भागातील एसटी प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. अशावेळी त्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.