ब्रेकिंग ! रावेरमधून श्रीराम पाटलांना उमेदवारी

शरद पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जागा वाटपाचा तिढा सुटला असून आज तिसरी यादी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी 10 जागा सुटल्या असून त्यापैकी 7 उमेदवारांची घोषणा पक्षाकडून आधीच करण्यात आली होती. आज तिसरी यादी जाहीर करुन पक्षाने आणखी दोन उमेदवारांची घोषणा केली. शरद पवार गटाकडून  साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना आणि रावेरमधून श्रीराम पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

आज शरद पवार गटानं लोकसभा निवडणुकांसाठी तिसरी यादी जाहीर केली आहे. यासंदर्भात ऑफिशिअल ट्विटर हँडलवरुन ट्वीट केलं आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे  उद्योगपती श्रीराम पाटील  यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. पुणे येथे पक्षाचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील जळगाव जिल्ह्यातील माजी आमदार सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे आदी उपस्थित होते.

तब्बल सहा तास चर्चा झाल्यानंतर श्रीराम पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले. श्रीराम पाटील हे जळगाव जिल्ह्यातील उद्योजक आहेत. अत्यंत सामान्य परिस्थितीतून त्यांनी उद्योजक होण्यापर्यंत भरारी घेतली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी तयारी दाखवली होती. पक्षाच्या बैठकीत चर्चा करून सर्वानुमते त्यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात आले. रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सून खासदार रक्षा खडसे यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.