रावेर लोकसभा उमेदवारी राष्ट्रवादीकडूनही दे धक्का..!

0

लोकशाही संपादकीय लेख 

गेल्या अनेक दिवसांपासून रावेर लोकसभेसाठी उमेदवारीच्या शोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही जळगाव प्रमाणेच सक्षम उमेदवार देण्याच्या तयारीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले रावेरचे उद्योगपती श्रीराम पाटील यांनी काल अचानक भाजपमधील राजीनामा ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांना राष्ट्रवादीतर्फे रावेरची उमेदवारी दिली जाते, असे संकेत प्राप्त झाले आहेत. असे असले तरी अद्याप श्रीराम पाटलांच्या नावाची अधिकृत घोषणा राष्ट्रवादीतर्फे झालेली नाही. त्यामुळे अजूनही या उमेदवारीचा तिढा सुटलेला दिसत नाही.

दरम्यान रावेर लोकसभेसाठी इच्छुक असल्याने श्रीराम पाटील पुण्यात ठाण मांडून बसले होते. राष्ट्रवादीत उमेदवारी मिळावी म्हणून श्रीराम पाटलांनी नुकतेच केलेल्या भाजप प्रवेशाचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश घेतल्याचे वृत्त आहे. जरी श्रीराम पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असला तरी अद्याप त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा मात्र झालेली नाही. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांच्याशी बातचीत केली असता, या संदर्भात उद्योगपती श्रीराम पाटलांच्या नावाची जोरदार चर्चा असून अधिकृत घोषणा प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्यामार्फत करून लवकरच रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवारीचा तिढा सुटेल, अशी शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उद्योगपती श्रीराम पाटील यांनी त्यांच्या वाढदिवशी पत्रकार परिषद घेऊन जर एखाद्या राजकीय पक्षाने रावेर लोकशाहीची उमेदवारी दिली तर रावेर लोकसभेची निवडणूक लढवण्याची माझी इच्छा आहे. अन्यथा आगामी विधानसभेची निवडणूक कोणत्या पक्षातर्फे उमेदवारी मिळो अथवा न मिळो, अपक्ष म्हणून आमदारकीची निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. तथापि लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच श्रीराम पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आपण भाजपमध्ये बिनशर्थ प्रवेश केल्याचेही सांगितले होते. परंतु रावेर लोकसभेची जागा महाविकास आघाडीच्या कोट्यातून त्यांचे घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे मिळाली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे उमेदवारीचा शोध सुरू होता.

सुरुवातीला आमदार एकनाथ खडसे यांच्या नावाची जोरदार चर्चा चालू होती. खडसेंनी सुद्धा लोकसभेची जागा लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. तथापि एकनाथ खडसेंनी ऐनवेळी नकार दिल्याने तसेच त्यांची भाजपमध्ये घर वापसी होणार असल्याने त्यांचे नाव मागे पडले. दरम्यान भुसावळमध्ये माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. संतोष चौधरींच्या समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला होता. परंतु ते नाव सुद्धा मागे पडले. भाजपतर्फे तिकीट न मिळालेले जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांना राष्ट्रवादीतर्फे गळाला लावण्याचा प्रयत्न झाला. परंतु ते शक्य झाले नाही. त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट रवींद्र पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.

तथापि एकनाथ खडसे आणि रवींद्र पाटील यांचे मैत्रीचे संबंध पाहता अॅड रवींद्र पाटील यांचेही नाव मागे पडले. त्यानंतर उद्योगपती श्रीराम पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आणि त्याला जवळ जवळ मूर्त स्वरूप आल्याचे कळते. कारण भाजपचा त्याग करून श्रीराम पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांची उमेदवारी पक्की समजली जाते आहे. प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या श्रीराम पाटलांच्या उमेदवारीला पाठिंबा असल्याचे कळते. काल पुण्यात रावेर लोकसभा उमेदवाराबाबतची घोषणा होणार होती. तथापि पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांचा श्रीराम पाटलांच्या नावाला विरोध दर्शवल्याने श्रीराम पाटलांचे उमेदवारीची अधिकृत घोषणा होणे बाकी असल्याचे कळते. उद्योगपती श्रीराम पाटलांना रावेर लोकसभेची उमेदवारी मिळाली तर रक्षा खडसे आणि श्रीराम पाटील यांच्यात काट्याची टक्कर होऊ शकते हे यापूर्वीच आम्ही याच सदरातून आमचे मत व्यक्त केले होते…!

Leave A Reply

Your email address will not be published.