भाजप माझे तिकीट बदलणार नाही!

0

स्मिता वाघ यांचा विश्वास : प्रचाराला झाली सुरुवात
जळगाव – जळगाव लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आता बदलली जाणार नाही, असे मत पक्षाच्या उमेदवार माजी आमदार स्मिता वाघ यांनी व्यक्त केले. उमेदवारी बदलाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर त्यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले.

जळगाव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांनी आपला प्रचारही जोरदारपणे सुरू केला आहे. परंतु त्यांच्या उमेदवारीबाबत नाराजी असल्याची चर्चा पक्षांतर्गतच सुरू झाली आहे. माजी खासदार ए. टी. पाटील उमेदवारीसाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीतही भाजपने स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहिर केली होती, परंतु ऐनवेळी रद्द केली होती.

याबाबत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार स्मिता वाघ म्हणाल्या, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी प्रचाराला सुरुवात केली आहे, मी लोकांपर्यंत पोहोचते आहे. आपल्या जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोक म्हणताहेत पक्षाने लोकसभेची उमेदवारी देऊन तुम्हाला न्याय दिला आहे. आपण जिल्हा परिषद अध्यक्ष असताना जिल्ह्यात कामे केली आहेत. आपण पाणीपुरवठ्याच्या साडेपाचशे योजना मंजूर केल्या, साडेपाचशे अंगणवाड्या मंजूर केल्या, प्रत्येक गावापर्यंत घटकापर्यंत पोहोचून आपण कामे केली आहेत, केलेली कामे लोक विसरत नाहीत, त्यामुळे त्याची आठवणही जनतेला आहे, त्यामुळे त्या-त्या गावात भेटीला गेल्यावर नागरिकच झालेल्या कामाची आठवण करून देत आहेत.

जळगाव लोकसभेच्या उमेदवारी बदलाबाबत त्या म्हणाल्या, जळगाव लोकसभेचे तिकीट बदलले जाणार नाही, आमचे नेते गिरीश महाजन यांनी चार पाच दिवसांपूर्वीच सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत जळगाव लोकसभेचेे तिकीट बदलले जाणार नाही, उमेदवारी अर्ज दाखल होईपर्यंत हे चालणारे चक्र आहे, प्रत्येकाला आपली उमेदवारीची इच्छा असते. त्यामुळे व्यक्ती बोलत असतात. परंतु ही राष्ट्रीय पार्टी आहे, एकदा निर्णय बदलला म्हणजे दरवेळी तसेच होईल असे काही नसते. माझ्या मते जळगाव लोकसभेचे तिकीट बदलण्याची आता कोणत्याही परिस्थितीत बदलण्याची दुरान्वये शक्यता नाही.

‘ते’ पक्षासोबतच!
जळगाव लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले माजी खासदार ए. टी. पाटील यांची माझी भेट झाली आहे, त्यांचे व आपले बोलणे झाले आहे, त्यांनी सांगितले आहे, की ताई मी तुमच्या सोबत आहे. ते ज्यावेळी दहा वर्षे खासदार होते. त्यावेळी त्यांच्या प्रचाराची धुरा आम्ही सांभाळली आहे, त्यांच्या सोबत आम्ही होतो, मला विश्वास आहे, ए. टी. नाना पक्ष सोडून कुठेही गेले नाहीत. त्यामुळे आताही ते महायुतीसोबतच राहतील, पार्टीसोबतच तसेच आपल्या सोबत राहतील

Leave A Reply

Your email address will not be published.