मुंबई;- असंख्य हिंदी-मराठी चित्रपटांचे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली. नितीन देसाई यांनी कर्जत येथील त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलं. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचं कारण समजू शकलेले नाही. .
नितीन चंद्रकांत देसाई यांचा जन्म दापोली येथे झाला होता. कला दिग्दर्शक, प्रॉडक्शन डिझायनर, निर्माता असा त्यांचा प्रवास होता. अनेक चित्रपटांच्या निर्मितीत त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं.
नितीन देसाई यांच्या आत्महत्येमुळे सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी नितीन देसाई यांनी आयुष्याला पूर्णविराम दिला. नितीन देसाई यांचा कर्जत येथे एनडी स्टुडिओ आहे. याच स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेतला. स्टुडिओतील कर्मचाऱ्यांना नितीन देसाईंनी आत्महत्या केल्याची आढळून आलं. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.
चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कला महाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. १९८७ सालापासून त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली. ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटामुळे ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले होते.
लगान (2001), देवदास (2002), जोधा अकबर (2008), प्रेम रतन धन पायो (2015) या चित्रपटांचे सेट त्यांनी तयार केले होते.त्याचबरोबर बालगंधर्व, हरिश्चंद्राची फॅक्टरी, यासारख्या अनेक चित्रपटासाठी त्यांनी सेट तयार केले होते.
त्यांच्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत आशुतोष गोवारीकर, विधु विनोद चोप्रा, संजय लीला भन्साली या दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं होतं.
त्यांनी कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि तीनदा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.
2005 मध्ये त्यांनी कर्जतला एनडी स्टुडिओ सुरू केला होता.
भव्यदिव्य सेट, अनोखं कला दिग्दर्शन यासाठी त्यांची ओळख होती.
मुंबईतल्या प्रसिद्ध लालबाग राजा गणपतीचा देखावा ते साकारायचे.