खड्डे चुकवण्याच्या नादात साईडपट्टीच्या ड्रेनेजला धडकला ट्रक, वाचा सविस्तर

0

मोरगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क

मोरगांव (Morgaon) ता.रावेर, सविस्तर वृत्त असे की, जवळच असणाऱ्या भोकरी पुलाजवळ बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर आज सकाळी 8:30 ते 9:00 वाजेच्या दरम्यान बऱ्हाणपूर कडून रावेर कडे येणाऱ्या ट्रक क्रमांक MP-07HB-8932 वरील ड्रायव्हर रस्त्यावर असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांना चुकाविण्याच्या प्रयत्नात भोकरी ता. रावेर येथील भोकर नदीच्या पुलावर सदर ट्रक चालकाचे स्टेरिंग वरील नियंत्रण सुटून सदरचा ट्रक पुलावरून जात असतांना, रोडाच्या साईड पट्टीला असणाऱ्या ड्रेनेज मध्ये जाऊन धडकला. सुदैवाने कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झालेली नाही.

परंतु रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांना चुकविण्याच्या नादात ह्या महामार्गावर अशा छोट्या-मोठ्या घटना होणे तसेच छोटे-मोठे अपघात होणे हे नित्याचेच होऊन बसले आहे. सदरचा रस्ता हा महामार्ग म्हणून केंद्र सरकारने घोषित करून जवळ-जवळ दहा वर्षांचा कालावधी लोटला आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र कुठेही कामास सुरुवात झालेली दिसत नाही. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)गेल्या वर्षी जळगाव येथील जाहीर सभेमध्ये दिवाळीनंतर बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाच्या कामास सुरुवात होईल व मी उद्घाटनाला येईल. असे प्रत्यक्ष आश्वासन दिलेले होते. परंतु तेव्हापासून आता दुसरी दिवाळी येण्याची वेळ झाली तरी, सुद्धा अजून काहीच सुरुवात नाही. तसेच दोन महिन्यांपूर्वी रावेर लोकसभेच्या लोकप्रिय खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये प्रत्यक्ष रक्षाताई खडसे यांनी रावेर लोकसभा हद्दीतील बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाच्या दुरुस्तीसाठी काही निधी केंद्राकडून मिळाल्याचे सांगितले होते व त्यामध्ये या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन दिलेले होते.

अजूनही दुरुस्ती किंवा डागडुजी झालेली दिसत नाही. यावरून असे दिसून येते की, लोकप्रतिनिधी नुसतीच आश्वासने देऊन जनतेला खुश करण्याचे काम करीत आहेत. या रस्त्याने दिवसा गाडी चालविणे ठीक आहे. परंतु रात्री गाडी चालवीत असताना वाहनधारकास जीव मुठीत धरून गाडी चालवावी लागते. कारण समोर केव्हा भला मोठा खड्डा येईल किंवा समोरचा वाहनधारक खड्डे चुकविण्याच्या नादात केव्हा आपल्या वाहनावर आदळेल हे सांगता येत नाही. या ठिकाणी केव्हा मोठा अपघात होईल हे नाकारता येणार नाही. तरी संबंधित रस्त्याचा प्रश्न लोकप्रतिनिधींनी तसेच शासन व प्रशासन यांनी त्वरित दखल घेऊन मार्गी लावावा. व वाहनधारकांची होणारी गैरसोय व खड्ड्यांमुळे होणारे छोटे मोठे अपघात यावर काहीतरी आळा घालावा अशी मागणी जोर धरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.