वात्सल्याचा गोदाई वंदन सोहळा…!

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

सारं विश्व व्यापून आहे. आईची महत्ता यथार्थपणे सांगायचे झाल्यास ‘पृथ्वीची क्षमता आणि पाण्याची रसता पहावयाची असेल तर, ती ‘आई’ जवळच आहे. ‘आई ‘ हेच वात्सल्याचे धन…!

ही प्रस्तावना मांडण्याचे कारण की, विवरा (ता.रावेर) च्या माजी शिक्षिका गोदावरी वासुदेव पाटील यांचा मातृत्व वंदन सोहळा 7 डिसेंबर 2022 रोजी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात साजरा होणार आहे. मातोश्रीचा वाढ दिवस म्हणून त्या निमित्त हा सोहळा नाही तर आईच्या ऋणात राहून आगळा वेगळा आणि समाजासाठी प्रेरक ठरावा या दृष्टिकोनातून त्यांचे पुत्र सुभाष, डॉ. उल्हास पाटील आणि कन्या प्रमिला या बहीण भावंडांनी आयोजित केलेला हा सोहळा आहे.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय क्षेत्रातील एक प्रथितयश प्राप्त नाव ज्यांनी शून्यातून आपलं विश्व उभं केलेलं व्यक्तिमत्व. मातोश्री गोदावरी पाटील यांच्या ‘मातृ वंदन’ सोहळ्या निमित्त त्यांच्या जीवन प्रवासातील जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि आपल्या मुलाचं आयुष्य घडवितांना दिलेली झुंज विलक्षण प्रेरणादायी तर आहेच पण पेरलेल्या संस्काराचा वस्तुपाठ देखील आहे. शिक्षण आणि परिश्रमाच्या संस्कारातून यशाला कशी गवसणी घालता येते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांच्या अपत्यांनी समाजामध्ये मिळविलेला लौकिक होय. खान्देशच्या मातीचा गुणधर्मच मोठा आगळा वेगळा आहे.

जिद्द, परिश्रम हीच पार्श्वभूमी…
गोदावरी पाटील यांची लग्नाआधी आणि नंतरची स्थिती लक्षात घेता कोणतेही आर्थिक किंवा कौटुंबिक प्रभाव नसताना त्यांनी स्वतः चे शिक्षण त्यानंतर शिक्षिका म्हणून मिळविलेली नोकरी त्यांची जिद्द आणि परिश्रमाचे फलित आहे. एक आदर्श माता, उत्कृष्ठ शिक्षिका आणि या प्रवासात आलेली आव्हाने पेलताना त्याच्यातील स्त्री शक्तीची प्रचिती येते. विशेषतः अकाली पती निधनाने निर्माण केलेला अंधार दूर सारत आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षणापर्यत पोहचविण्यासाठी केलेली धडपड ही आदर्श मातेच्या लौकिकाचे अप्रतिम उदाहरण ठरावे. केवळ आपल्या मुलांनाच घडविले नाही तर आपल्या शाळेतील व सानिध्यात आलेल्या मुलांना ही घडविले. त्यांनी विवरे गावातील महिलांना अल्प बचतीचे महत्व ही पटवून दिले. अल्पबचतीसह, कुटूंब नियोजन, किसान शाळा अशा विविध क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटविला. म्हणून त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अध्यपनाचे काम करीत असताना हजारो विद्यार्थ्यांना सुसंस्कारित केले.

आदर्शवत विचार आणि कृती ही..
त्यांनी आपल्या नातवंडांना आपला समग्र जीवनपट एका प्रदीर्घ पत्राच्या माध्यमातून उलगडून दाखविला आहे. या अपेक्षेने की, जे विचार मूल्य व संस्कार मी माझ्या मुलांमध्ये रुजविले ते पुढील पिढीतही संक्रमित व्हावेत. त्या जीवनाच्या व्याख्येबद्दल पुढे म्हणतात, जीवन एक शाळा आहे, जीवनाच्या शाळेत आपण नित्य काहीतरी शिकत असतो, जीवनात ध्येयालाच देव मानले पाहिजे. ध्येय रहित जीवन हे जीवनच नव्हे. एक ग्रामीण शिक्षिका व सर्व सामान्य कुटूंबातील असून ही त्यांच्या विचारांची उंची प्रगल्भ आहे. अशा या मातेला शतशः वंदन…

इंद्राची सत्ता, कुबेराची संपत्ती सारं काही एका आई पुढे तुच्छ ठरतात कारण ‘माये विना दैवत नाही दुजे’. एका उर्दू शायरने आईची महती विशद करताना म्हटले आहे. “चलती फिरती आँखोसे अजां देखी है, मैने जन्नत तो नही देखी है माँ देखी है…! ”

– सुरेश उज्जैनवाल, पत्रकार तथा जिल्हाध्यक्ष व्हाईस ऑफ मीडिया, महाराष्ट्र

Leave A Reply

Your email address will not be published.