श्रावणात ‘शिवामूठ’ का वाहिली जाते ?; जाणून घ्या पूजाविधी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

श्रावण मास हा पूजाअर्चेचा महिना समजला जातो. हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला खूप महत्व आहे. श्रावणात महिन्यातील प्रत्येक सोमवारी महादेवाचे पूजन केले जाते. याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्त्व हिंदू ग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले आहे.

शिवामूठ वाहण्याची परंपरा

श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानले गेले आहे. याचे एक कारण म्हणजे श्रावण महिन्याला शंकराच्या उपासनेचा महिना मानला जातो. श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा, पवित्र आणि शुभ मानला जातो. श्रावण मास सुरू असून श्रावणी सोमवारी शिवपूजनानंतर शिवामूठ वाहण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत आहे. श्रावणात शिवामूठ का वाहिली जाते. या शिवामुठीचे काय महत्व आहे. हे जाणून घेऊया.

‘शिव मूठ’ला विशेष महत्व

श्रावण महिना महादेवाचा सर्वात आवडता महिना मानला जातो. या संपूर्ण महिन्यामध्ये जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे शिवाची जास्तीत जास्त आराधना केली पाहिजे. शिवाची पूजा षडोपचार पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. पण त्याचबरोबर महादेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक क्षणाला त्याची आराधना करायला हवी. यामुळं आपल्याला अनेक कष्टातून मुक्ती तर मिळेलच पण आपल्याला अशक्य वाटणाऱ्या इच्छाही त्याच्या आराधनेनं पूर्ण होऊ शकतात. श्रावणात शिवलिंगावर अभिषेक केला जातो हे तर सर्वज्ञात आहे पण, आपल्याला हे माहित आहे का की, अभिषेकाबरोबर शिवाला शिव मूठही वाहिली जाते. श्रावणात ‘शिव मूठ’ला विशेष महत्व आहे.

शिवास्त वाहण्याचे व्रत

लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात. ह्या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास करावा. श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामूठीचे महत्त्वही वेगळे आहे. श्रावणात शिवलिंगाची पूजा करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस यापैकी एकेका धान्याची एक मूठ वाहिली जाते. म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची एक मूठ असा हा क्रम असावा. ही मूठ वाहताना ‘नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।। ‘ हा मंत्र म्हणावा. पाच वर्षांनंतर व्रताचे उद्यापन करावे. यथाविधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन, भेटवस्तू, दक्षिणा देऊन ह्या व्रताची समाप्ती होते.

शिवामूठ वाहण्याचे महत्त्व

प्रत्येक मुलीला वाटते की, आपण जेव्हा सासरी जातो, तेव्हा त्या घरातले आवडते व्यक्तिमत्त्व बनावे. सासरच्या माणसांची माया वाढवण्यासाठी श्रावणात एक सण म्हणजे वसा आहे. तो वसा केल्याने सासुरवाशीण आपल्या सासरच्या माणसाची आवडती बनते. तो वसा म्हणजे शिवामूठ. प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा… माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू-सासरा, दिरा-भावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा, असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी. शक्यतो उष्टे खाऊ नये. सायंकाळी आंघोळ करून महादेवाला बेलपत्र वाहावे. ही शिवमूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो. ती प्रत्येक महिलेने वाहावी, असे सांगितले जाते.

शिवामूठ: पहिला आठवडा – तांदूळ

शिवामूठ: दूसरा आठवडा – तीळ

शिवामूठ: तिसरा आठवडा – मूग

शिवामूठ: चौथा आठवडा – जवस

 

शिवामूठ दान का करतात?

काहीही दान केल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते, मग ते ज्ञान असो वा अन्न, हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. मूठभर असले तरीही ते देता आले, याचे गृहिणीना समाधान मिळते. मूठ-मूठ करून काही अन्नधान्य मिळाले, याचे घेणाऱ्याला समाधान, असा दुहेरी लाभ या व्रत-वैकल्यांमधून होताना दिसतो. ज्यांना शिवालयात जाणे काही कारणाने शक्य नसेल त्यांनी घरीच शिवामूठ वाहावी. शंकराचे नामस्मरण करून ती काढावी आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना द्यावी, असे सांगितले जाते.

पूजा विधी 

सोमवारी शिव मंदिरामध्ये जावून शुद्ध आसनावर बसावं आणि शिवलिंगाला अभिषेक करावा. १०८ बेलांवर रामाचं नाव लिहून वाहावेत. अभिषेकासाठी गायीचंच दूध असावं. पहिले दूध अर्पण करावं. मग सुगंधित अत्तरानं पिंडीला स्नान घालून गुलाल लावावा. त्यानंतर गंगाजलानं महादेवाचा अभिषेक करावा. मध अर्पण करावं. संपूर्ण शिवलिंगाला फुले, बेलपत्र तसंच गुलाल, बुक्का, चंदन अर्पित करून श्रृंगार करावा. पिवळं पितांबर शिवलिंगावर चढवावं. माता पार्वतीची ओटी भरावी आणि संपूर्ण शिव परिवाराला जल अर्पित करावं.

Leave A Reply

Your email address will not be published.