महाराष्ट्र संस्कृतीचा विजय असो!

0

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार शिगेला पोहचला असून सर्वत्र ‘विजय असो’चा नारा निनादत आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या अस्तित्वासाठी झगडत असतांना अतिशय खालच्या पातळीची टीका केली जात आहे. लाग, शरम वेशीवर टांगून ज्येष्ठ नेत्यांवर कठोर शब्दात टीका होतांना दिसत आहे; यात एकही पक्ष मागे नाही. सुसंस्कृत असलेल्या महाराष्ट्राची ही संस्कृती नक्कीच नाही. पूर्वीच्या राजकारणात दिवसा टीका केली तर रात्रीचे भोजन नेते दिलखुलासपणे सोबत घेत असत. मान, मर्यादेच्या चौकटीत महाराष्ट्राचे राजकारण आजपर्यंत होते, मात्र काही हवश्यांच्या हवाश्यामुळे या संस्कृतीला डाग लावण्याचे काम केले आहे. सत्ताधारी, विरोधक सोबत हिंडत असत, आता ते चित्र नाही. अधिवेशनाच्या पूर्वसंधेला चहापाण होत असे त्यात ‘विकासा’चे राजकारण होर्इ, मात्र आता तर चहापानावर बहिष्कार टाकणे ही प्रथाच दृढ झाली आहे. असो जळगावच्या एका घटनेने मात्र ही संस्कृती अजूनही जीवंत असल्याचे दाखवून दिले आहे. झाले असे की, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार हे रविवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर जळगाव लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी त्यांचे आशीर्वाद घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. मुळात स्मिता वाघ या ज्या परिवारातून राजकारणात आल्या त्या परिवराची शिकवणच संस्कृतीला धरुन आहे आणि त्याचेच दर्शन स्मितातार्इंनी उपस्थितांना करुन दिले.
लोकसभेच्या रणधुमाळीत सत्ताधारी-विरोधकांमध्ये विखारी टीका होत असताना भाजप उमेदवार स्मिता वाघ यांनी शरद पवारांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतल्याने काही स्वार्थी लोकांनी लागलीच उलट सुलट चर्चांना सुरूवात देखील केली मात्र वडिलधाऱ्या व्यक्तिचे चरणस्पर्श करणे हीच आपली खरी संस्कृती असून त्यांचाच धागा स्मितातार्इंनी गुंफला आहे.
रविवारी सकाळी शरद पवार यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी जळगाव जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी तिथे उपस्थित होते. विशेष म्हणजे भाजापाध्यक्ष जेपी नड्डा देखील जळगावला येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी भाजप उमेदवार स्मिता वाघ विमानतळावर होत्या. त्यांच्या सोबतीला शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील देखील होते. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्याआधी शरद पवार यांचे आगमन झाल्यावर वडिलकीच्या नात्याने स्मिता वाघ यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. दोघांमध्ये काही मिनिटांची चर्चा देखील झाली. सध्याच्या आरोप प्रत्यारोपांच्या काळात विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांची भेट सुखद धक्का नक्कीच देवून महाराष्ट्र संस्कृतीचे येथे दर्शन झाल्याने सहाजिकच महाराष्ट्र संस्कृतीचा विजय असो असेच म्हणाले लागले.

Leave A Reply

Your email address will not be published.