नाथाभाऊ आणि रोहिणी टीकेच्या चक्रव्युहात..!

0

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा निवडणुक चौथ्या टप्प्यात होत असून १३ मे रोजी मतदान होत आहे. शनिवार आणि रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा जळगाव जिल्हा दौरा झाला. रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या घटक पक्षातर्फे निवडणूक प्रचाराचा माहोल तयार होऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपचे संकट मोचक ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात शरद पवारांच्या उपस्थितीने राष्ट्रवादी काँग्रेस सह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचा लक्ष वेधून घेणारा मेळावा झाला. मंत्री गिरीश महाजनांवर टीकेची झोड उठवली. तर खडसेंच्या भाजपातील घरवापसी बाबत महाराष्ट्रातील भाजपमध्ये उत्साही वातावरण नाही. उलट पक्षी त्यांच्या घरवापसीला विरोधच होतोय. खडसे म्हणतात, “भाजपच्या वरिष्ठांनीच घरवापसीचा प्रस्ताव दिला..” पण घर वापसी रखडण्याचे कारण काय? ऐन निवडणुकीच्या काळात एकनाथ खडसे जाहीरपणे रक्षा खडसेंच्या प्रचार करीत नाहीत. गुप्तपणे निवडणूक प्रचारात त्यांचा सहभाग दिसून येतोय. परंतु ज्यांनी महाराष्ट्रात भाजप रुजविला, वाढविला आणि भाजपला मानाचे स्थान मिळवून दिले, त्या एकनाथ खडसेंची अवस्था आज चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यू सारखी झालेली आहे. पडत्या काळात एकनाथ खडसेंना ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने साथ दिली, ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने आमदारकी सुद्धा दिली, त्या राष्ट्रवादी काँग्रेसची खडसे अशा पद्धतीने साथ सोडतील असे वाटले नव्हते. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या टीकेच्या रडारवर खडसे आहेत.
एकनाथ खडसेंची कन्या रोहिणी खडसेंनी सुद्धा वडिलांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. वडील एकनाथ खडसेंची घरवापसी होत असली तरी रोहिणीने मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्या राष्ट्रवादी प्रदेश महिला अध्यक्षा आहेत. त्यांच्याकडे सुद्धा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते वक्रदृष्टीने पाहत आहेत. रोहिणी खडसे कडून, “मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार..” असे जाहीरपणे सांगितले जात असतानाच कार्यकर्त्यांतील संशय हा रोहिणीसाठी चिंतेचा विषय बनला आहे. वास्तविक पाहता रोहिणीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्रीराम पाटील यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. मुक्ताईनगर मतदार संघात श्रीराम पाटलांना लीड मिळवून देण्यासाठी त्या प्रचारात उतरलेलया आहेत. मतदार संघ त्या पिंजून काढत आहेत. भाजपच्या उमेदवार त्यांच्या भावजाई रक्षा खडसे यांनी रोहिणी खडसेंनी भाजपात यावे, असे केलेले वक्तव्य प्रसिद्ध होते आणि मी कदापी भाजपात प्रवेश करणार नाही, असे जाहीरपणे वक्तव्य रोहिणीने करून त्यांचे विधान खोडून काढले. निवडणूक काळात भाऊजाई नणंदेचा हा संवाद मतदारसंघात चर्चेचा विषय बनला आहे. एकीकडे वडिलांची घरवापसी, दुसरीकडे भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे या भावजाईमुळे रोहिणी खडसेंना तारेवरची कसरत करावी लागते आहे. त्यात जामनेरच्या सभेत दस्तुरखुद्द शरद पवार यांच्या उपस्थितीत रोहिणी खडसेंनी व्यक्त केलेली नाराजी, ही सुद्धा चर्चेचा विषय बनली आहे. एकंदरीत एकनाथ खडसे यांची घरवापसी कन्या रोहिणी खडसेसाठी त्रासदायक ठरत आहे, एवढे मात्र निश्चित. परंतु गेल्या दहा वर्षाच्या राजकीय अनुभवाने रोहिणी खडसे मात्र राजकारणात परिपक झाले आहेत, असेच म्हणावे लागेल…!

 

Leave A Reply

Your email address will not be published.