जळगावात होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा

0

जळगाव:-अठराव्या लोकसभा निवडणुकीचा माहौल तयार झाला असून सर्वत्र प्रचाराला सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी प्रयत्न केले जात असून दि. 9 मे रोजी मोदींची सभा होण्याची शक्यता आहे. भुसावळ किंवा जळगाव येथे या सभेचे नियोजन सुरु आहे. अद्यापही एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नसला तरी पक्षाकडून प्रचार सभांचे नियोजन सुरु झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या रावेर मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे व जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ यांचा अर्ज दि. 25 रोजी दाखल होणार असून त्यानंतर प्रचार शिगेला पोहचणार आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपविरुद्ध शिवसेना (उबाठा) असा संघर्ष होणार असून रावेरमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार गट) असा सामना रंगणार आहे. महायुती आणि महाआघाडी यांच्यातर्फे वरिष्ठ नेत्यांच्या सभांचे नियोजन सुरु असून रविवारी राष्ट्रवादीने शरद पवार यांची सभा जामनेरात आयोजित केली होती. भाजप मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेरात या सभेला चांगला प्रतिसाद लाभला.
भारतीय जनता पक्षातर्फे रावेर व जळगावसाठी वरिष्ठ नेत्यांच्या सभांचे नियोजन करण्यात येत असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची मागणी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभांचे नियोजन सुरु झाले आहे. शिवसेनेकडून पारोळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वा आदित्य ठाकरे यांची सभा होवू शकते.

भाजप झाला अधिक सावध
जळगाव मतदारसंघात भाजपाला शिवसेनेकडून जोरदार धडक देण्याची तयारी सुरु झाली असून भाजप देखील जशास तसे उत्तर देण्याच्या तयारीत असून थेट पंतप्रधान नद्र मोदी यांची सभा घेवून वातावरण निर्माण करण्यात येणार आहे. जळगावात यापूर्वी मोदींची सभा झाली आहे. आता भुसावळात सभा घ्यावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.