दहा जणांना शस्त्रसाठ्यासह अटक; शिरपूर पोलीसांची कारवाई…

0

 

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलिसांनी हाडाखेड चेक पोस्ट येथे सापळा रचत एका चारचाकी गाडीतून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिरसाठ यांना दि.२३ फेब्रुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलिसांनी हाडाखेड चेक पोस्ट येथे सापळा रचला. या सापळा दरम्यान माहिती मिळालेली इर्टिगा कार क्र. एम.एच ०४ एफ.झेड २००४ इंदोरकडून धुळ्याकडे जात असतांना दिसली. पोलिसांनी तात्काळ संबंधित कार अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तलवारी, गुप्ती त्याचबरोबर चाकू असे धारदार शस्त्र पोलिसांना आढळून आले आहेत.

पोलिसांनी कारवाईदरम्यान दहा जणांच्या मुसक्या देखील आवळल्या आहेत. या कारमध्ये १२ तलवारी, २ गुप्ती, १ चॉपर, १ बटनचा चाकू, १ फायटर असा इर्टिगा कारसह एकंदरीत सहा लाखांहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पकडलेल्या दहाही जणांकडून जप्त केलेल्या भल्यामोठ्या शस्त्रसाठ्यामुळे त्यांचा काही मोठा घातपाताचा बेत होता का? या अनुषंगाने पुढील तपास शिरपूर तालुका पोलीस करीत आहेत.

याप्रकरणी सतपाल गिरधर सोनवणे, किरण नंदलाल मराठे, विकास देवा ठाकरे, सकाराम रामा पवार, सचिन राजेंद्र सोनवणे, राजू पवार, अमोल शांताराम चव्हाण, संतोष नामदेव पाटील, विशाल ठाकरे, विठ्ठल सोनवणे यांच्या विरुद्ध शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड,अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस निरीक्षक ए एस आगरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस स्टेशन चे सा. पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, जाकीररोद्दीन शेख, चतरसिंग लखा खसावद, पवन रामचंद्र गवळी, संजय सुर्यवंशी आरिफ पठाण, संदीप शिंदे, रोहिदास पावरा, योगेश मोरे, संतोष पाटील, इसरार फारूकी आदींनी कारवाई केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.