महाराष्ट्र प्रतिबंधित गुटख्याची अवैद्य वाहतूक शिरपूर तालुका पोलिसांनी रोखली

0

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील हाडाखेड येथील तपासणी नाक्यावर एका वाहनातून १२ लाखांचा गुटखा व चारचाकी वाहन असा एकूण २२ लाखांचा मुद्देमाल शिरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी चालकाविरूद्ध शिरपूर (Shirpur) तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. ०३ एप्रिल रोजी शिरपूर तालुका पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुरेश शिरसाठ (Suresh Shirsath) यांना दिल्लीहून (Delhi) धुळ्याकडे जाणाऱ्या एका चार चाकी वाहनातून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील हाडाखेड येथील तपासणी नाक्यावर सापळा लावला असता, पोलिसांनी एच.आर.५५.एएल ०५२६ या संशयित वाहनाला थांबवून चालकाला गाडीत असलेल्या मालाबद्दल विचारणा केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. पोलिसांनी ते वाहन तालुका पोलिस स्टेशनला आणून त्याची तपासणी केली असता, त्यात महाराष्ट्रात प्रतिबंध असलेल्या गुटख्याचे बॅाक्स आढळले.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी के.एच. बाविस्कर यांच्यासमक्ष पडताळणी केली असता, त्यात ४० बॅाक्समध्ये गुटखा आढळून आला. पोलिसांनी १२ लाखांचा गुटखा व १० लाखांचे वाहन असा एकूण २२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिसात वाहन चालक सुशीलकुमार अयोध्या प्रसाद (वय २४, रा. दिल्ली) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी अन्साराम आगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुरेश शिरसाठ, उपनिरीक्षक संदीप पाटील, पोलिस नाईक संदीप ठाकरे, कॅान्स्टेबल संतोष पाटील, योगेश मोरे, रणजित वळवी, मनोज पाटील यांनी केली. तपास उपनिरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.