शेळी पालन करून मिळवा लाखोंचे उत्पन्न

0

 

महाराष्ट्रात ८.४३ दशलक्ष शेळ्या आहेत. भारतामध्ये महाराष्ट्राचा शेळ्यांच्या संख्येत पाचवा क्रमांक लागतो व १५ लाख कुटुंबे शेळीपालन करतात.
दूध, मांस, लोकर, कातडी व खत या महत्वाच्या गोष्टी शेळीपासून मिळतात. शेळी वेगवेगळ्या हवामानात जगू शकते. तिच्या खाद्याचा व इतर गरजांचा विचार केल्यास ती थोड्या खर्चात भरपूर उत्पादन देऊ शकते.

शेळ्यांच्या विविध जाती
विविध रंगाच्या व आकाराच्या शेळ्या महाराष्ट्रातील निरनिराळ्या भागात आढळतात. महाराष्ट्रात प्रामुख्याने उस्मानाबादी व संगमनेरी या जातीच्या शेळ्या आहेत.
भारतामध्ये प्रामुख्याने बीटल, जमुनापरी, सिरोही बारबेरी, कच्छी, सुरती इ. शेळ्या दुधासाठी पाळल्या जातात. या जातींपासून प्रत्येक दिवशी सरासरी एक ते दोन लिटर दूध मिळू शकते.थंड हवामानात शेळ्यांच्या विशिष्ट जातीपासून पश्मिना व मोहेर नावाची उत्तम प्रकारची लोकर मिळू शकते.

उस्मानाबादी शेळी :
या जातीच्या शेळ्या उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, सोलापूर, औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात.
कोरड्या हवामानात त्यांची चांगली वाढ होत असल्याने अवर्षणप्रवण क्षेत्रात त्यांची जोपासना चांगल्या प्रकारे होते.
उस्मानाबादी जातीच्या शेळ्या रंगाने पूर्ण काळ्या असून शेळ्यांना कानावर पांढरे ठिपके किंवा पोटाच्या खालील भागावर तपकिरी पट्टा आढळतो.
शेळ्यांना पाठीमागे बाकदारपणे वळणारी किंवा इतर आकारातील शिंगे आढळतात तसेच काही प्रमाणात बिनशिंगाच्या शेळ्याही असतात.
सर्वसाधारण शेळ्यांमध्ये जुळी करडे देण्याचे प्रमाण ५० ते ६० टक्के आढळते. परंतु जास्त प्रमाणात जुळी करडे मिळण्यासाठी निवड पद्धतीचा उपयोग केल्यास
७० ते ७५ टक्के शेळ्या जुळी करडे देऊ शकतात. दहा टक्के शेळ्यांना तीन करडे तर १-२ टक्के शेळ्यांना तीन पेक्षा जास्त करडे मिळतात.
उस्मानाबादी शेळीचा सर्वेक्षणाद्वारे सर्वांगीण अभ्यास महात्मा फुले कृषि विद्यापीठात पूर्ण झाला आहे. ही जात मटणासाठी चांगली आहे.

संगमनेरी शेळी :
या जातीच्या शेळ्या अहमदनगर, नाशिक व पुणे या जिल्ह्यात आढळतात. संगमनेरी शेळ्या रंगाने पांढऱ्या असून काही शेळ्या पांढरट तपकिरी
तसेच काळ्या, काळ्याबांड्या, तांबड्या बांड्या आहेत. या शेळ्यांना पाठीमागे बाकदारपणे वळणारी किंवा इतर आकारातील शिंगे आढळतात.
तसेच काही प्रमाणात बिनशिंगाच्या शेळ्याही असतात. सर्वसाधारण शेळ्यांमध्ये जुळी करडे देण्याचे प्रमाण ३० ते ४० टक्के आढळते.
जातिवंत पैदासीचे बोकड वापरल्याने त्यांच्या वजन वाढीमध्ये १२ ते १५ टक्के सुधारणा झाल्याचे आढळून आलेले आहे. संगमनेरी शेळीसाठी अखिल भारतीय
समन्वीत संगमनेरी शेळी संशोधन प्रकल्प व संगमनेरी शेळी जतन प्रकल्प महात्मा फुले कृषि विद्यापीठात कार्यरत आहेत. ही जात दूध व मांस या दुहेरी उद्देशाने वापरली जाते.

व्यवस्थापन
उसाचे पाचट किंवा गवत वापरून केलेले छप्पर, ऊन वाऱ्यापासून आडोसा होण्याइतपत ४ फुटाची भिंत व त्या ठिकाणी चाऱ्यासाठी गव्हाणी व पाण्याचा हौद इत्यादी
सोयी असलेला गोठा शेळ्यांकरिता उत्तम होय. प्रत्येक शेळीची बंदिस्त जागा १२-१५ चौ. फुट व मोकळी जागा २५ चौ. फुट असावी.
एक लिटरपेक्षा जादा दूध देणाऱ्या शेळ्यांना प्रतिदिनी हिरवा चारा ३ ते ४ किलो, वाळलेला चारा १ किलो आणि १५० ते २५० ग्रॅम खुराक देणे आवश्यक आहे.
शेवरी, अंजन, हादगा, बाभूळ, सुबाभूळ, बोर, वड, पिंपळ इत्यादी झाडांचा पाला व शेंगा शेळीला आवडतात. शेळीस दर दिवशी ३ ते ४ लिटर पाणी पिण्यास लागते.योग्य आहार, पालन पद्धती व पैदास शास्त्रीयदृष्ट्या करणे महत्त्वाचे आहे. शेळ्यांना गुटगुटीत व वजनदार करडे मिळण्यासाठी गाभण काळातील शेवटचे ६-८ आठवडे जादा खुराक व सकस चारा द्यावा.

करडांची जोपासना
शेळीपासून निरोगी करडे जन्मन्यासाठी शेवटच्या गाभण काळात तिची विशेष काळजी घेणे जरुरीचे असते.
करडे जन्मल्यानंतर नाळ कापणे, नख्या कापणे व १ तासाच्या आत आईचे पहिले दूध (चीक) पाजणे महत्त्वाचे असते. करडाला पहिल्या आठवड्यात
वजनाच्या १०% दूधाची गरज असते. करडे जन्मानंतर पुरेसे दूध नसल्यास करडांस दुसऱ्या शेळीचे दूध पाजावे.एक महिन्यानंतर ती चारा खाऊ लागतात,
अडीच महिन्यानंतर दुधाचे प्रमाण कमी कमी करत जाऊन ३ महिन्यानंतर दूध पाजण्याचे थांबवावे. दूध पाजणे बंद केल्यावर त्यांच्या चारा पाण्याची विशेष काळजी घेणे जरुरीचे आहे.

शेळ्यांचे रोग
शेळ्यांच्या पुष्कळशा आजारांची लक्षणे ही सारखीच दिसतात. बऱ्याच वेळा आजारांचे योग्य निदान होण्याअगोदर शेळ्या दगावतात व इतर जवळपासची
जनावरे संसर्गाने आजारी पडतात. त्यासाठी शेळ्यांना रोग झाल्यावर तो बरा करण्यापेक्षा तो होऊ न देणे अधिक चांगले म्हणून शेळ्यांना ठरल्यावेळी रोगप्रतिबंधक
लस व जंतनाशक औषधे द्यावीत. तसेच शेळ्यांना गोचीड व पिसवा यापासून त्रास होऊ नये म्हणून डेल्टामेथ्रीन हे रसायन असलेले (उदा. ब्युटॉक्स) द्रावण गोठ्यात व शेळ्यांच्या अंगावर फवारावे.

रोगप्रतिबंधक लस टोचण्याचे नियोजन
फऱ्या, लाळ-खुरकुत, पीपीआर या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी या रोगांची लस टोचून घेणे आवश्यक आहे. शेळ्यांच्या मोठ्या कळपांसाठी दरवर्षी क्षय,
जोन्स इ. रोगांचे व गर्भपाताचे परीक्षण करणे आवश्यक असते आणि ज्या शेळ्या संसर्गजन्य असतील त्यांना कळपातून काढून टाकावे.
जंताचा प्रकार जंतनाशकाचे नाव
सर्वसाधारणपणे ऋतु बदलताना जंत निर्मुलन करावे. वर्षातुन किमान तीन वेळा जंत निर्मुलन करणे गरजेचे आहे.

साभार गुगल

 

Leave A Reply

Your email address will not be published.