शेअर बाजारात विक्रम; ‘या’ शेअर्समध्ये मोठी वाढ

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जीएसटी संकलन, जीडीपी वाढीचे आकडे आणि विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्रदीपक विजयाचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. आज सोमवारी शेअर बाजारात जोरदार खरेदी दिसून आली. निफ्टी 20600 च्या वर ट्रेड करत आहे. आज शेअर बाजार विक्रमी पातळीवर उघडला. BSE सेन्सेक्स सुमारे 900 अंकांच्या वाढीसह 68,435 वर उघडला आणि निफ्टी पहिल्यांदा 20,601 वर उघडला. बाजाराला देशांतर्गत आणि जागतिक संकेतांचा पाठिंबा मिळत आहे. निफ्टीमध्ये अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स वाढले आहेत.

प्री-ओपन सत्रात जोरदार वाढ झाल्यानंतर, भारतीय शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक निफ्टी सकाळी 9.15 वाजता नवीन विक्रमी उच्चांकावर उघडला. निफ्टी 276.40 अंकांच्या किंवा 1.36 टक्क्यांच्या वाढीसह 20,600 च्या पातळीवर उघडला. निफ्टीवरील अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, एसबीआय आणि एल अँड टी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ दिसून आली.

दुसरीकडे बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 882.38 अंक किंवा 1.31 टक्क्यांच्या उसळीसह 68,363.57 च्या पातळीवर उघडला. बाजार उघडताच जवळपास 2194 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 259 शेअर्स घसरणीसह उघडले, तर 119 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. विदेशी गुंतवणूकदारांकडून वाढत्या खरेदीमुळे शेअर बाजारात सकारात्मक वातावरण आहे. गेल्या आठवड्यात विदेशी गुंतवणूकदारांनी 10593 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.