आता लढाई ‘मैदाना’त,पुतण्याचा काकांना धक्का !

चाळीस वर्षांची परंपरा खंडित : काकांनी मार्ग शोधला

0

पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबात पडलेली फूट यानंतर होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लोकसभेच्या गेल्या तीन निवडणुकांमध्ये सुप्रिया‘ताईं’साठी राबलेले अजित’दादा’ आता त्यांच्या पराभवासाठी इरेला पेटले आहेत. पक्ष, चिन्हापाठोपाठ आता अजित पवारांनी मैदानही मारल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला प्रचारसभेसाठी नवे मैदान शोधावे लागले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघावर शरद पवारांचे अनेक दशकांपासून वर्चस्व आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची अंतिम सभा शरद पवार ख्रिश्चन कॉलनीमधील मैदानात घेतात. गेल्या 40 वर्षांपासून यात खंड पडलेला नव्हता. मात्र यंदा शरद पवारांना प्रचाराची अंतिम सभा ख्रिश्चन कॉलनीमधील मैदानात घेता येणार नाही. कुटुंबासोबत दुपारचे जेवण आणि त्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधन ही परंपरा शरद पवारांनी 40 वर्षांहून अधिक काळ सुरू ठेवली. यंदा मात्र तसे घडणार नाही. ख्रिश्चन कॉलनीमधील मैदान एका खासगी ट्रस्टच्या मालकीचे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हे मैदान सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी बूक केले आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवार या मैदानात सभा घेतील. अजित पवारांनी ख्रिश्चन कॉलनीमधील मैदान बूक केल्यामुळे शरद पवारांनी नव्या मैदानाचा शोध सुरू केला. त्यांचा शोध कसब्यात संपला. कसब्यातील जुन्या मोरगाव रोड परिसरात असलेल्या मैदानात शरद पवारांची सभा होईल. या सभेनंतर सुळेंच्या प्रचाराची सांगता होईल.

शरद पवारांच्या विचारसरणीवर ठाम असलेले कार्यकर्ते नव्या मैदानात जमतील. तुतारी वाजवणाऱ्या माणसाला असलेला भरघोस पाठिंबा नव्या मैदानात दिसेल, असा विश्वास कर्जत-जामखेडचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवारांनी व्यक्त केला. ‘आमचा पक्ष आणि चिन्ह चोरीला गेले आहे. त्यानंतर आता 40 वर्षांपासून सांगता सभा होत असलेले मैदान आमच्याकडून हिसकावण्यात आले आहे. पण पवार साहेबांचे विचार मानणारा माणूस अद्यापही साहेबांसोबत आहेत. तो हिसकावून घेता येणार नाही, याची त्यांना कल्पना नाही,’ असे रोहित पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.